शीव रुग्णालयाचा अक्षम्य हलगर्जीपणा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020
Total Views |

sion hospital_1 &nbs


नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट; प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी


मुंबई :
कोरोना महामारीच्या संकटात मृत रुग्णांच्या अंत्यसंस्कारादरम्यान गडबड-घोटाळ्यांचे अनेक प्रकार उघडकीस येत असतानाच रविवारी शीव रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा एक खळबळजनक प्रकार समोर आला. एका अपघातग्रस्त तरुणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे न सोपविता त्याचे अंत्यसंस्कार थेट रुग्णालय प्रशासनानेच केल्याचे उजेडात आले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.


अंकुश गौतम सुरवाडे या २८ वर्षीय तरुणाचा गेल्या १५ दिवसांपूर्वी अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला उपचारासाठी शीव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सुरुवातील येथील कर्मचार्‍यांनी खाटा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांचा आहे. रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्यानंतर सुरवडे कुटुंबियांनी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडे ही व्यथा मांडली. कोळंबकर यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अपघातग्रस्त तरुणाला शीव येथील रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. मागील १५ दिवसांपासून या तरुणावर उपचार सुरु होते. या उपचारांना काही केल्या यश येत नसल्याने सुरवाडे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. उपचारादरम्यान अंकुश हा कोमामध्येही गेल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. कोमामध्ये असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे तीन वाजता अंकुश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाकडून काही वेळानंतर त्याच्या कुटुंबियांना ही बाब कळविण्यात आली. पहाटे अंकुशचे कुटुंबीय आणि त्याचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी मृतदेह पालिा असता त्याच्या पोटावर आणि कमरेवर चीर असल्याचे आढळून आले. यावेळी मृतदेहामधून मूत्रपिंड काढण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून याचा इन्कार करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येत असून यानंतर तो ताब्यात दिला जाईल असे रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. परंतु मृतदेह पुन्हा आमच्या ताब्यात आलाच नसल्याचे सुरवाडे कुटुंबियांचे म्हणणे आहे.



दुपारी मृतदेहाबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारण्यात आले असता आधी त्यांनी दुसर्‍याच एका रुग्णाचा मृतदेह आमच्याकडे सोपवला. मात्र तो मृतदेह आमचा नसून तो स्वीकारण्यासाठी आम्ही नकार दिला. यानंतर काही वेळानंतर अंकुशच्या मृतदेहासाठी विचारणा करण्यात आल्यानंतर चुकीने नावात बदल झाल्याने अंकुश यांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानंतर सर्वत्र गोंधळ माजताच रुग्णालय प्रशासनाने सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे समाधान न झाल्याने अखेरीस कुटुंबियांनी पुन्हा भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडे दाद मागितली. कोळंबकर यांनी सहकार्‍यांसह या सर्व प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने चुकीने हा प्रकार घडल्याची कबुली दिली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शीव येथील पोलीस ठाण्यात आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह कार्यकर्ते रात्री उशीरापर्यंत पाठपुरावा करत होते. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती दीपेश त्रिपाठी आणि गणेशराव यांनी दिली. याप्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आश्वासन अडिशनल सीपी ज्ञानेश्वर चव्हाण आणि डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी कालिदास कोळंबकर यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@