नागपूरकरांना तुकाराम मुंढेंचा अलविदा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |
Tukaram Mundhe_1 &nb




राज्य सरकारतर्फे मुंढेंची नवी बदली रद्द

नागपूर : नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बदलीनंतर नागपूरकरांना भावपूर्ण निरोप दिला आहे. मुंढेंच्या बदलीचा घोळ राज्य सरकारकडून निस्तारेनासा झाला आहे. त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सचिव पदावर बदली करण्यात आली होती. ती बदली पुन्हा रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या मुंढे यांच्याकडे तूर्त कुठलाही पदभार नाही मात्र, शुक्रवारी सकाळी मुंबईला रवाना होणाऱ्या या अधिकाऱ्याला निरोप देताना नागपूरकरही भावूक झाले. मुंडेंनीही फेसबूक पोस्ट लिहून नागपूर शहर व पालिकेला अलविदा केला आहे.
 
 
ते म्हणतात, “गुडबाय एनएमसी, थँक यू नागपूर!. नुकतेच कोरोना विषाणूच्या संक्रमणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रति असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.”
 
 
“नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.”, असे मुंढे म्हणाले.
 
 
“जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला गुड बाय आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल थँक यू. अलविदा...!”, असे म्हणत त्यांनी नागपूरकरांचा भावूक शब्दांत निरोप घेतला.
 
 
मुंढे ज्यावेळी मुंबईला जाण्यासाठी निघाले त्यावेळी नागपूरमध्ये त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. नागपूरकरांना त्यांनी हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला. गुरुवारपासूनच त्यांना निरोप व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस फौजफाटाही सज्ज होता.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@