नवीन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |


CA_1  H x W: 0



कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करावा, यासंबंधी थोडक्यात मार्गदर्शन करणारा हा लेख...


 
जेव्हा आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रामुख्याने आपण व्यवसायासाठी लागणारा पैसा, योग्य दरात मिळणारी जागा यांच्याविषयी विचार करतो, पण काही आणखी सामान्य वाटणार्‍या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करतो. जर आपण उद्योजक आहात आणि एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर प्रथमतः आपण कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करू इच्छिता, हे ठरविणे गरजेचे आहे. हा निर्णय घेताना मला असे वाटते की, आपण हाच व्यवसाय करायचा का ठरवला याची तीन प्रमुख कारणे प्रथम लिहून काढा. हे विचार तुम्हाला तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकवण्यासाठी मदत करतील.

 
एकदा का आपण हा निर्णय घेतला, तर व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला कशाकशाची आवश्यकता आहे, याची आपण प्रथम ‘चेकलिस्ट’ करायला हवी. या ‘चेकलिस्ट’मध्ये तुमचे त्या क्षेत्रातील ज्ञान, लागणारे मनुष्यबळ, भांडवल, उत्पादन किंवा सेवा, आवश्यक कौशल्य, व्यवसायाचे ठिकाण, ग्राहक, प्रतिस्पर्धी, बाजारपेठ, आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची आवश्यकता आणि अर्थातच लागणारा पैसा या गोष्टींचा समावेश होतो. सुरुवातीच्या टप्प्यात ‘चेकलिस्ट’वरील सर्व ‘चेकबॉक्स’ टीक केले जातीलच, असे कदाचित होणार नाही. परंतु, यामुळे भविष्यकाळात आपण काय केले आहे आणि काय करणे अपेक्षित आहे, याचा अंदाज मात्र नक्कीच घेता येईल.
 
आपली ‘चेकलिस्ट’ पूर्ण झाल्यावर आपल्याला आपल्या व्यवसायातील तज्ज्ञाशी संपर्क साधण आवश्यक आहे. मित्र, नातेवाईक, मित्रांचे नातेवाईक, नेटवर्किंग क्लब्स, चर्चासत्रे इ. सारख्या विविध पद्धतींद्वारे मार्गदर्शकांची माहिती मिळवता येऊ शकते. तज्ज्ञांशी चांगली चर्चा होणेही आवश्यक आहे. कारण, यामुळे आपल्याला व्यवसायातील आव्हाने, मिळणारे फायदे, बाजाराची रचना, प्रतिस्पर्ध्यांची ताकद याचा अंदाज लावता येतो. जर तज्ज्ञ तुमच्या अगदी जवळचा असेल तर आपण आपली ‘चेकलिस्ट’देखील त्यांना दाखवू शकता आणि काही महत्त्वाच्या बाबी अनावधानाने राहून तर गेल्या नाहीत ना याचा पडताळा घेऊ शकता. याव्यतिरिक्त आपण पुढील तीन महिने, सहा महिने, एक वर्षाच्या कालावधीसाठी आपल्या कामाचे योग्य नियोजन केले पाहिजे. लक्षात असू द्या तुमचे ध्येय प्रत्यक्षात अंमलात आणण्याजोगे, साध्य करण्याजोगे व मोजमाप करण्याजोगे असणे आवश्यक आहे.


 
उदाहरणार्थ - आपल्या व्यवसायाचा ‘सेटअप’ करण्यासाठी सहा महिन्यांचे नियोजन केले असताना आपण पहिल्या तीन महिन्यांतच पाच लाखांची उलाढाल करण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. एकदा आपण आपला व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला खालील बाबींची काळजी घ्यावी लागेल. जसे की, आपण केलेल्या प्रत्येक खर्चाची, उत्पन्नाची, गुंतवलेल्या वेळेची नोंद करणे. व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच घेतलेली खबरदारी कोणत्याही व्यवसायाला दीर्घकाळ टिकवण्यासाठी मोठी भूमिका बजावते. शासकीय नियमांचे दिलेल्या वेळेत पालन करणे ही बाबसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.

 
आपण व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी किती खेळते भांडवल आवश्यक आहे, हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल. तीन महिन्यांच्या खेळत्या भांडवलाची आगामी तरतूद आपल्याला आर्थिक गोष्टीची चिंता न भासू देता आपल्याला आपल्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यास मदत करते. तसेच कोणत्याही व्यवसायात टिकण्यासाठी प्रभावी सेल्स धोरण असणे आवश्यक आहे. परिणामकारक सेल्सवर लक्ष केंद्रित करणार्‍या काही गोष्टी म्हणजे सेवेची गुणवत्ता, मार्केटिंग, ठराविक स्तरापर्यंतचा धोका पत्करणे, जलद व अचूक निर्णय घेणे, पॉकेट फ्रेंडली डिस्काऊंट देणे, व्हाऊचर, चांगली आफ्टर सेल्स सर्व्हिस या बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण केलेलं नियोजन योग्य पद्धतीने परिणाम देते आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीनंतर त्याचा अंदाज घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण त्यात आवश्यक सुधारणा करू शकाल.
 
नवउद्योजकांसाठी सर्वात महत्त्वाचा मूलमंत्र म्हणजे, आपल्या व्यवसायाला वेळ देणे आणि संयमाने त्याची जडणघडण करत जाणे. एक हजार दिवसांच्या नियमात असे म्हटले आहे की, पहिल्या ३३३ दिवसांत आपल्याला व्यवसायाकडून मोठी आशा असते, पण परिणाम कमी जाणवतो. तर पुढील ३३३ दिवस म्हणजे सर्वात महत्त्वाचा कालावधी असतो, ज्यामध्ये कर्मचार्‍यांना पगार पण द्यावा लागतो, व्यवसाय होतो, मात्र ना नफा होत, ना तोटा! अंतिम ३३४ दिवसांत व्यवसाय पूरक होत जातो आणि हळूहळू आणि हळूहळू त्यात वाढत होत जाते. म्हणूनच आपला व्यवसाय जोपर्यंत किमान एक हजार दिवस तग धरत नाही, तोपर्यंत आपण त्या व्यवसायाला अर्धवट सोडू नये. या एक हजार दिवसांमध्ये चांगले-वाईट दिवस, कठीण प्रसंग येतच राहतील, पण त्यादरम्यान आपण हा व्यवसाय सुरू करताना लिहिलेली तीन कारणे आपण पुन्हा पुन्हा वाचत राहावीत, तिच आपणास अधिक चांगला व्यवसाय करण्याची प्रेरणा देत राहतील. व्यवसाय विविध कारणांमुळे टिकून राहतो. त्यातील काही महत्त्वाची कारणे म्हणजे सातत्य, संयम, परिश्रम आणि स्वतःवर असणारा दृढविश्वास. नुसते ज्ञान असून चालत नाही. खरे यश आहे मिळवलेले ज्ञान वापरून पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात आहे.
 

- सीए अश्विनी राजश्री सोनावणे

@@AUTHORINFO_V1@@