कालजयी तत्त्वज्ञान मांडणारे आधुनिक ॠषी : विनोबा भावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |

vichar vimarsh_1 &nb


विनोबाजींच्या शतकोत्तर जन्मशताब्दी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांचे शाश्वत विचार आणि आजचे समाज वास्तव याचा तुलनात्मक मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.


महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, साहित्याचा प्रवाह सातत्याने प्रवाहित असल्याचे आपण पाहत आहोत. विशिष्ट टप्प्यावर स्थिरावलेल्या धर्म जीवनात महाराष्ट्रातील संत साहित्याने वेगवेगळे राजनीतिक-सामाजिक-सांस्कृतिक वळण देण्यास साहाय्य केलेले आहे. बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत सुमारे ४०० वर्षांच्या कालावधीत अनेक संतांची मांदियाळी महाराष्ट्रात निर्माण झाली. एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेल्या विनोबा भावे, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज अशा महान व्यक्तिमत्त्वांचे आध्यात्मिक, सामाजिक विचार भारताच्या जन मनामध्ये पाझरत गेले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महान ग्रंथ निर्माण झाले. १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ प्रसिद्ध केला. स्वातंत्र्य लढ्याला अनुकूल असा गीतेचा आविष्कार लोकांसमोर आला. तरुण वयापासून अखंड अनुसंधान आणि सामाजिक कार्यातून आलेल्या अफाट अनुभवाच्या चिंतनातून ‘गीतारहस्य’ सारखा महान ग्रंथ निर्माण झाला. या ग्रंथाला लोकमान्य टिळकांनी ‘श्री भगवत गीता रहस्य’ अथवा ‘कर्मयोग शास्त्र’ असे नाव दिले. हा ग्रंथ हिंदूंच्या जीवनविषयक, नीतीविषयक आणि धर्मविषयक तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवणारा ग्रंथ आहे. आयुष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी ‘गीतारहस्य’मध्ये तात्त्विक आधार सापडतो. परंतु, माणसाची आध्यात्मिक भूक ही प्रचंड असते. त्याला तात्त्विक भूक पूर्ण झाल्यानंतर आत्मिक भूक पूर्ण करण्याची ही गरज तितक्यात निकडीने भासत असते. तात्त्विक आधाराने माणसांचे समाधान होत नाही. त्याला आत्मीय आधारसुद्धा हवा असतो. समाजाची ती चिरंतन गरज असते. अलौकिक आध्यात्मिक तत्त्वज्ञान असलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ची अनुभूती ज्ञानदेवाने करून दिली. त्याचाच विसाव्या शतकातील आविष्कार म्हणजे विनोबा यांची ‘गीताई’. तत्त्वज्ञानाच्या विराट अंतरंगामध्ये अत्यंत वात्सल्याने घेऊन जाणारी ‘गीताई’. आपल्या लहानग्यांशी आईचा जसा संवाद असतो तितकीच सरळता विनोबाजींनी रचलेल्या ‘गीताई’मध्ये अनुभवता येते. लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’नंतर २० वर्षांनी विनोबांनी लिहिलेली ‘गीताई’ वाचकांच्या हाती आली. जनमानसाच्या बुद्धीला वात्सल्याची अनुभूती मिळाली. टिळकांच्या पाठोपाठ महात्मा गांधीं, विनोबा भावे यांनीही राजनैतिक-सामाजिक कार्यासाठी गीतेचा आधार घेतला होता. गीतेचा प्रभावी आविष्कार आजूबाजूला दिसत असल्याने मोठ्या संख्येने जनमानस गीतेकडे आकृष्ट झाला. या गोष्टीचा प्रभाव भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा संघर्ष जोरदार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात झाला होता.



१९१६ रोजी विनोबा भावे महात्मा गांधींना भेटले. विनोबा भावे आपल्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनासंदर्भात सांगतात की, लहानपणापासूनच त्यांना बंगाल व हिमालयाचे आकर्षण होते. बंगालचे ‘वंदे मातरम’ आणि हिमालयातील ‘ज्ञानयोग’ त्यांना आकर्षित करीत होते. वयाच्या विसाव्या वर्षी विनोबाजींची पावले महात्मा गांधी यांच्या आश्रमाकडे वळली. गांधींच्या संपर्कामध्ये आल्यावर त्यांना आतून जाणू लागले की, बंगालचे ‘वंदे मातरम’ आणि हिमालयातील ‘ज्ञानयोग’ त्यांना एकाच ठिकाणी मिळत आहे. गांधीजींच्या जवळ त्यांना हिमालयाची शांती आणि पश्चिम बंगालची क्रांती यांची एकत्र अनुभूती येत होती. गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव विनोबाजींवर होता. गांधीजी म्हणत की, ईश्वर सत्य आहे. परंतु, विनोबाज या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते की, सत्यच ईश्वर आहे आणि या सत्याचा शोध घेण्याकरिता त्यांनी आपला अखंड जीवनाचा यज्ञ केला. धर्म सुधारणा करणार्‍या बहुतेकांनी केवळ धार्मिक पोस्टमनचे काम केले, असे मार्मिक विधान विनोबाजींनी केलेले आहे. कारण, त्या काळामध्ये चमत्कार, कर्मठपणा यांना अनाठाई महत्त्व प्राप्त झाले होते. ग्रंथांचे, पोथी पुराणांचे पठाण केल्यावर लग्न लागेल, नोकरी मिळेल, मुलगा होईल अशा वाह्यात कल्पना रूढ झालेल्या होत्या. यातून भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानातून सांगितलेल्या खर्‍या धार्मिकतेचा-आध्यात्मिकतेचाच चुराडा होताना विनोबा भावे पाहत होते आणि यातूनच विनोबाजींचेे धर्म विषयात चिंतन, साम्ययोगाची संकल्पना, विज्ञान, धर्म आणि आध्यात्मिक यांचा समन्वय यासारखे विचार विनोबाजींच्या डोक्यात निर्माण होऊ लागले. विनोबाजींच्या या चिंतनातूनच ‘गीताई’, ‘भूदान चळवळ’, ‘सर्वोदय चळवळ’, ‘महात्मा गांधी तत्त्वज्ञान’, पवनार आश्रम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी विनोबाजींच्या कार्यकर्तृत्वातून साकारली. या अलौकिक कर्तृत्वामुळेच भारताचे आधुनिक ॠषी म्हणून विनोबाजींना संपूर्ण देश ओळखू लागला.


विनोबा भावे यांना फक्त भारतीय स्वतंत्र अपेक्षित नव्हते, तर त्यांना चारित्र्यवान भारत निर्माण करायचा होता. मनुष्याचे रोजचे सर्व व्यवहार हे सामाजिक असतात, असा त्यांचा विश्वास होता. ‘गीताई’ परंपरानिष्ठ धर्मांध झाली नाही तर मानवतेची तत्त्वज्ञान ठरली. कारण की, त्याची मूळ निर्मितीही मानवासाठी होती याची स्पष्टता असल्यामुळे ‘गीताई’ लिहूनही ते कधीही कर्मकांडात गुंतलेले दिसले नाही. याउलट भंगीकाम, कांचन मुक्ती सेवा मंडळ, भूदान यात्रा, असे अनेक क्रांतिकारी प्रयोग विनोबा भावे करू लागले. अगदी सरळ साधा विचार केला तरी आपल्या भूदान यात्रेमध्ये कोणत्याही पद्धतीची दंगल अथवा कायदा हातात न घेता गरिबांसाठी विनोबा भावे यांनी रोज कमीत कमी ३००एकर जमीन सरकारकडे जमा केली आहे. विनोबा भावे यांचा हा प्रयोग अलौकिकच म्हणावा लागेल. स्वातंत्र्यानंतर भूदान योजना या महान प्रयोगामुळे त्यांनी गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. तसेच, समाजामध्ये गरीब-श्रीमंत यांच्यामध्ये होणारा संघर्षही मोठ्या प्रमाणात कमी करण्यास आपले योगदान दिले आहे.


‘भगवद्गीते’चे साधे सोपे सरळ तपशील पण सर्वांना समजेल, असे शुभम दर्शन घ्यायचे असेल तर विनोबाजींचा ‘गीता प्रवचन’ हा आणखी एक ग्रंथ वाचायला हवा. या ग्रंथाच्या निर्मितीमागची कथा खूपच रंजक आहे. १९३२मध्ये धुळ्याच्या कारागृहात असताना मध्ये अनेक देशभक्त, विचारवंत, प्रतिभावंत हेही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे शिक्षा भोगत होते. विनोबाजींनी गीतेवर प्रवचने द्यावीत, असा सत्याग्रहींनी आग्रह धरला. तुरुंगाच्या प्रमुख अधिकार्‍यांची परवानगी घेतली आणि धुळ्याच्या तुरुंगात २१ फेब्रुवारी ते १९ जून, १९३२ या कालावधीत प्रत्येक रविवारी एक याप्रमाणे १८ रविवारी १८ रसाळ आणि विद्वत्ताप्रचुर पण भावस्पर्शी प्रवचने झाली. पुढे ही प्रवचने ‘गीता तत्त्वज्ञान’ या नावाने प्रसिद्ध झाली. विनोबा भावे यांनी ‘मधुकर’ नावाचे नियतकालिक काढून लोकशिक्षणाचे कार्य केले. ‘मधुकर’मधील लेखांमध्ये त्यांच्या चिंतनाचा आधार भारतीय तत्त्वचिंतनाप्रमाणे ‘भगवद्गीता’ हाच आहे. विनोबाजींच्या ‘गीताई’ व ‘गीता प्रवचना’तील साधन समाज धारणेला पोषक ठरले. विनोबाजींची धर्म संकल्पना व्यापक होती. माणसामाणसांमधील विषमता दूर करून जात, भाषा, प्रदेश, शिक्षण, लिंग, वर्ण इत्यादीच्या सीमा ओलांडून जाणार्‍या विश्व धर्माची अपेक्षा विनोबाजी बाळगत होते. जुन्या काळाची मूल्ये ही आज जशीच्या तशी उपयोगी पडणार नाहीत. आज नवी मूल्ये निर्माण होतील. त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून युगानुकुल नवे स्वरूप विनोबाजींनी स्पष्ट केले होते. ११ सप्टेंबर, १८९५मध्ये त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यात झाला आहे. विनोबा भावे यांची आई भक्तीमार्गाचा अवलंब करणारी होती. गीता वाचावी, असे तिला मनापासून वाटे. पण, गीता संस्कृत भाषेत असल्याने, संस्कृतमधील गीता कशी समजणार? असे त्यांनी विनोबाला विचारल्यावर विनोबांनी आपल्या आईला मराठीमध्ये अनुवादित गीता आणून दिली. पण, त्या गीतेची मांडणी अत्यंत क्लिष्ट पद्धतीने असल्या कारणाने आईला ती गीता काही समजली नाही. तेव्हा, आईने लहानग्या विनोबांना सांगितले, “ही गीता वाचून मी काय करू? मला समजेल अशाच सोप्या मराठी भाषेत तूच गीता का लिहित नाहीस.” आईने उपस्थित केलेला प्रश्न नियतीने विनोबाजींकडून करून घेतला, असे म्हणावे लागेल. ‘गीता प्रवचन’ या माध्यमातून महाराष्ट्राला एक अद्भुत ग्रंथ प्राप्त झाला. विनोबाजींनी प्रामुख्याने सामाजिक-राजकीय जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. राजकारणात आवश्यक व पूरक असणार्‍या नीतिमत्तेचा त्यांनी पुरस्कार केला.


यंदाचे वर्ष हे विनोबाजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे वर्ष आहे. विनोबाजींनी प्रामुख्याने सामाजिक-राजकीय जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. राजकारणात आवश्यक व पूरक असणार्‍या नीतिमत्तेचा त्यांनी पुरस्कार केला. विनोबा भावे यांची भूमिका जशी आध्यात्मिक संताची आहे, तसेच दुसरीकडे शास्त्रज्ञाचीसुद्धा आहे. विज्ञानासंबंधी त्यांची मते स्पष्ट आहेत. ते म्हणतात की, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोघांत हे समान सत्य आहे. दोघेही सत्याच्या शोधात गुंतलेले असतात. विनोबा यांनी १९१६साली महात्मा गांधी यांची भेट घेतली. या तरुणाचे आध्यात्मिक चिंतन खूप खोल आहे, हे माणसे जोखण्यात वाक्बगार असलेल्या गांधीजींना पहिल्याच भेटीत जाणवले. त्यानंतर दोघांमध्ये अनेक वर्षे संवाद होत राहिला. महात्मा गांधी आणि विनोबा भावे या दोघांनाही गीतेची अंतःकरणापासून आवड होती. गीतेतील सिद्धांताच्या गहण आणि गुढ अरण्यात दोघांनी केवळ बौद्धिक सफर केली नाही तर जे आध्यात्मिक जाणिवेतून स्वतःच्या आचरणात आणण्याचे विविध प्रयोग या दोघांनी केले. गीता हे केवळ आचारण शास्त्र आहे. म्हणजेच, कर्मयोग आहे याचे स्पष्ट दर्शन या दोघांना झाले होते. गांधींनी सत्याग्रहासाठी गीतेचा उपयोग केला. तर, विनोबा भावेंनी गीतेचे नित्य नूतन तत्त्वज्ञान मधुर मराठी भाषेत पुन्हा सामान्य लोकांच्या ओंजळीत आणून ठेवले. त्याच नंतर विविध भाषांमध्ये भाषांतर होऊन देशाच्या सर्व व सामान्य जनतेपर्यंत गीतेचे तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या साध्या भाषेत पोहोचले. अत्यंत सामान्य व्यक्ती म्हणून जन्माला आलेल्या या दोघांनी याच जन्मामध्ये साधना आणि सत्यनिष्ठा याचा अवलंब करीत महानता संपन्न केली होती. त्यांचे जीवन एकमेकांमध्ये समरस झाले होते. दोघांच्या तत्त्वज्ञानाचा आणि जीवन परंपरेचा विचार करत असताना एकाला दुसर्‍यापासून वेगळे करून करणे फार अवघड होते. एकदा विनोबा भावे यांना एका व्यक्तीने सहज विचारले, “गांधीजींना ‘गांधी’ म्हणावं की ‘गांधीजी’ म्हणावं”. विनोबाजींनी उत्तर दिले की, “जर तुम्ही त्यांना फक्त व्यक्ती समजत असाल तर ते ‘गांधीजी’ आहेत. परंतु, तुम्ही त्यांना एक विचारांच्या रूपामध्ये मानत असाल तर त्यांना ‘गांधी’ म्हणा. गांधी माझ्यासाठी एक व्यक्ती नाही तर विचार आहेत.”


आजच्या वर्तमान काळामध्ये धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण हे तीनही क्षेत्रे परस्परांवर कुरघोडी करू लागलेली आहेत. मानवी मूल्यांची पायमल्ली, शोषण, भ्रष्टाचार, कटकारस्थाने आणि आर्थिक गैरव्यवहार यांची भयकारी रूपे गेल्या दोन दशकांपासून अनुभवता येऊ लागली आहे. परस्परावलंबी असल्याने धर्मकारण व राजकारण हे विषय अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. भौतिक आणि वैज्ञानिक प्रगती होऊनही माणूस, समूह सुखी राहिलेला नाही. हे कोरोना संक्रमण काळात समस्त मानवजातीच्या निदर्शनास आले आहे. विनोबाजींच्या साहित्यातील अध्यात्म व ईश्वरविषयक विचार कालसापेक्ष होते. काळाच्या मर्यादा विनोबाजींच्या साहित्याला आणि विचारांना कधीच नव्हत्या. त्यामुळे विनोबाजींच्या शतकोत्तर जन्मशताब्दी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांचे शाश्वत विचार आणि आजचे समाज वास्तव याचा तुलनात्मक मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे वाटते.

- अमोल पेडणेकर
@@AUTHORINFO_V1@@