‘प्रेग्नन्सी अ‍ॅट १० किल्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020   
Total Views |


Pregnancy _1  H
 


खुनी, खुनी, खुनी... गर्भपात करू नका, याचे परिणाम वाईट होतील. नरकात जाल. धर्माच्या विरोधात काम करत आहात. खुनी, खुनी. जणू काही सगळ्या धर्माचे जगणे-मरणे त्यांच्यावरच अवलंबून होते. ऑगस्ट २०२०ची ही ब्राझीलची घटना. कोण होते हे लोक?



ब्राझीलमधील धार्मिक तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले गाव. गावात येशू, मर्सी, पाप-पुण्याच्या गोष्टी क्षणाक्षणाला स्मरल्या जातात. त्या गावात एक दहा वर्षांची निरागस पोर. ती तिच्या वृद्ध आजीसोबत राहायची. ती आठ वर्षांची असतानाच एका ३३ वर्षीय वासनांधाने तिच्यावर बलात्कार केला. हा राक्षस दुसरा, तिसरा कुणी नव्हता, तर तिचाच काका होता. त्याने या बालिकेला धमकी दिली की, कुणाला सांगितले तर तुला मारून टाकीन. पण, वयाच्या दहाव्या वर्षी या मुलीच्या पोटात दुखू लागले. काही केल्या तिला बरे वाटले नाही. मुलीची तब्येत खालावत चाललेली. तिचे दुखणे वाढल्यावर शेवटी गावाबाहेरच्या दवाखान्यात नेण्यात आले, तिथे कळले की, ही चिमुकली गरोदर आहे. हे सगळ्यांना अनेपक्षित होते. चौकशीअंती मुलीच्या नराधम काकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पण, त्या निष्पाप मुलीचा काय दोष? ती तर स्वत:च एक बालक होती. तिच्या आजीने मुलीचा गर्भपात करायचा निर्णय घेतला.


 
मुलीला हॉस्पिटलमध्ये आणले गेले. ब्राझीलच्या कायद्यानुसार काही अटीशर्तीनुसार गर्भपाताला मान्यता आहे. जर गरोदर स्त्रीच्या जीवाला किंवा गर्भाला धोका असेल किंवा गर्भातल्या जीवाची वाढ होत नसेल, अशा वेळी इथे स्त्री गर्भपात कायद्याने करू शकते, अन्यथा नाही. इतरवेळी ब्राझीलमध्ये गर्भपात करणे धर्माच्या विरोधात आहे. असो. दहा वर्षांच्या पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले आहे, तिचा गर्भपात होणार आहे हे समजताच, काही धर्माचे नव्हे तर अधर्माचेच ठेकेदार तिथे पोहोचले. त्यांनी हॉस्पिटलला धमकावण्यास सुरुवात केली, गर्भपात करू नका, तर दुसरीकडे एक टोळके त्या मुलीच्या घरी गेले. आपल्या नातीसाठी अश्रू ढाळणार्‍या त्या आजीला या टोळक्याने धमकावले. “गर्भपात थांबवा, अन्यथा पाप करत आहेस. परिणाम वाईट होतील.”


 
त्याच दरम्यान, ‘ब्राझिलियन नॅशनल कॉन्फरन्स ऑफ बिशप’चे अध्यक्ष वाल्मर ऑलीव्हैर म्हणाले की, “लैगिक हिंसा भयानकच आहे. पण, त्यामुळे गर्भपात हा न्यायिक ठरवता येत नाही. गर्भपातासमर्थनार्थ उठणारा आवाज हा माणुसकीवर प्रश्नचिन्ह उमटवत आहे. शांत बसू नका.” थोडक्यात यांचे म्हणणे आहे की, बलात्काराने बळजबरीने माता होऊ पाहणार्‍या त्या बालिकेचा गर्भपात होणे ही हिंसा आहे आणि मानवतेवर प्रश्नचिन्ह उमटवते. काय बोलावे? दहा वर्षांची चिमुकली. तिचे दुःख, तिच्या वेदना, तिची कोवळी स्वप्ने, तिचे भवितव्य, याबाबत या वाल्मर ऑलीव्हैरला आणि त्या गर्भपाताविरोधात धिंगाणा घालणार्‍या त्या टोळक्याला काही देणे-घेणे नाही, असे वाटते. समाजाची धारणा करणारा तो धर्म, माणसाला जीवन देणारा तो धर्म आणि माणसाला माणूस म्हणून जगवणारा तो धर्म असतो. मग या बालिकेला गर्भपातासाठी दोषी ठरवणारे हे लोक स्वतःला ‘धर्मनिष्ठ’ कोणत्या तोंडाने बोलतात?


 
असो, पण याच वेळी ब्राझीलमध्ये ‘प्रो चॉइस’ ग्रुपच्या कार्यकर्त्याही हॉस्पिटलजवळ पोहोचल्या. त्यांचे म्हणणे की “बाळ जन्मावे की जन्मू नये, हा त्या आईचा अधिकार आहे.” त्यांनी त्या दहा वर्षांच्या मुलीला समर्थन दिले. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर प्रश्न उभा केला. व्यक्तिस्वातंत्र्याचा, समतेचा जयघोष करणार्‍या पाश्चात्त्य संस्कृतीचा हा दुसराही चेहरा या घटनेने पाहायला मिळाला.


 
‘ब्राझिलियन पब्लिक सिक्युरिटी इयरबुक २०१९’च्या अहवालानुसार २०१८ साली ब्राझीलमध्ये प्रत्येक तासाला चार ब्राझिलयन बालिकांवर बलात्कार झाला, ज्यांचे वय १३ वर्षांपेक्षा कमी होते, तर, ‘बीबीसी’च्या अहवालानुसार ब्राझीलमध्ये दरदिवशी सहा मुलींचा गर्भपात केला जातो. ज्या १० ते १४ वर्षे वयोगटातील होत्या आणि त्याही बलात्कार पीडित होत्या. आज ब्राझीलमध्ये गर्भपातसमर्थकांच्या प्रेग्नन्सी अ‍ॅट १० किल्स’ या हॅशटॅगने समाजात वादळ उभे केले आहे. माझ्या मते, रूढी, परंपरा जपा हो. पण, माणसाच्या जगण्यापेक्षा त्या मोठ्या असतात का? ब्राझीलमधीलच काय, जगभरातील कोणत्याही बलात्कार पीडित बालिकेचे दुःख, वेदना या ‘ब्लॅक लाईव्हस मॅटर’इतकेच वेदनादायी आहे.
 

@@AUTHORINFO_V1@@