रत्नागिरीतून जीवंत खवले मांजर आणि मांडूळाची तस्करी उघड; जिल्ह्यातील आठ तरुणांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2020
Total Views |

pangoline _1  H

कोकणात छुप्या मार्गाने वन्यजीवांची तस्करी सुरूच 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी काजरघाटी परिसरात जीवंत खवले मांजर आणि मांडूळ सापाची तस्करी उघडकीस आणली. या प्रकरणी पोलिसांंनी रत्नागिरी जिल्ह्यातील आठ तरुणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अजूनही कोकणात खवले मांजर आणि मांडूळ सारख्या संकटग्रस्त प्रजातींची छुप्या मार्गाने तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. 
 
 
 
वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खवले मांजरांसह मांडूळ या सापाला मोठी मागणी आहे. राज्यातील कोकण पट्ट्यात खवले मांजरांचा अधिवास आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा तस्कर पैशांची आमिष दाखवून गावकऱ्यांकडून खवले मांजरांची शिकार करुन घेतात. अशीच घटना गुरुवारी रत्नागिरीतील जिल्ह्यातील काजरघाटी परिसरातून उघड झाली. दुपारी अडीचच्या सुमारास रत्नागिरी पोलिसांना काही इसम हे खवले मांजर आणि मांडूळ सापाच्या विक्रीकरिता काजरघाटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन काजरघाटी परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी त्याठिकाणी आलेल्या चार मोटार सायकलपैकी एका गाडीच्या फुटरेस्ट जवळ गोनपाटाच्या पिशवीत जीवंत खवल्या मांजर गुंडाळून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच दुसऱ्या गाडीवर बसलेल्या इसमाच्या मांडीवरील प्लास्टिकच्या पिशवीत एक मांडूळ जातीचा साप असल्याचे आढळले. 
 
 
 
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चारही मोटारसायकल वरुन आलेल्या आठ इसमांना अटक केली. या कारवाईत ताब्यात घेतलेले जीवंत खवले मांजर हे १४ किलो वजनाचे असून त्याची लांबी ४.९ फूट आहे. तर मांडुळ जातीचा साप, तपकिरी रंगाचा, त्यावर काळे ठिपके, त्याचे वजन ६०० ग्रॅम आणि लांबी २.६ फूट आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी अटक केलेले सर्व आरोपी हे रत्नागिरी जिल्ह्यात राहणारे तरुण आहेत. रंजीत सुरेंद्र सांवत (वय ३८, झाडगाव नाका), सुनिल अनंत देवरुखकर (वय ३४ पोचरी), ओमकार राजेश लिंगायत (वय २४ गुरववाडी, खानु मठ), दिपक दिनकर इंगळे (वय २४ रामु कणगवली) संदेश रामचंद्र मालगुंडकर (वय ३९ पामापुर धारेवाडी), दिनेश दत्ताराम मोंडे (वय २९ आढीवरे), प्रमोद वसंत कांबळे (वय ३९ कांबळेवाडी) लक्ष्मण बबन नाडे (वय ४९ धामणी) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई विशाल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अनिल लाड, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलिसांमधील कर्मचाऱ्यांनी केली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@