साहेब आहेत कुठे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2020   
Total Views |


Uddhav Thackeray_1 &



मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्म यांच्या पायावर या राज्यात प्रादेशिक पक्षाच्या रूपाने शिवसेनेची स्थापना झाली. स्थापनेपासून दुसर्‍यांदा शिवसेना राज्यात सत्तेवर आहे. सध्याच्या काळ तमाम रयतेची सेवा करण्याचा आणि काळजी घेण्याचा काळ आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई बाहेर पडायला तयारच नाहीत, असे दिसून येत आहे. या राज्यात मुख्यमंत्री यांच्यासाठी मुंबई व परिसर, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी पुणे या व्यतिरिक्त शहरे नाहीत काय? अशी शंका येत आहे. मागील एक ते दीड महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नाशिक दौर्‍यावर येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्याचवेळी नेमका हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आणि कोरोना काळात पावसाळी वातावरणात बाहेर पडलो तर उगीच पडसे नको, म्हणून मुख्यमंत्री महोदय कदाचित नाशिकला आले नाहीत, असे सर्वसामान्यांचे मत आहे. पावसामुळे हवाई मार्ग अडथळा व सुरक्षा याचे कारण मुख्यमंत्री दौरा रद्द होण्यामागे दिले गेले. तेव्हापासून लांबलेला ठाकरे यांचा नाशिक दौरा अजूनही झालेला नाही. सध्या नाशिकमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.


स्थानिक लोकप्रतिनिधी आपापल्या परीने समस्या मांडत आहेत. प्रशासन आपल्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या सर्वात मुख्यमंत्री यांनी नाशिकमधील स्थितीचा आढावा घेतला हे मात्र काही ऐकिवात नाही. राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री नाशिक जिल्ह्यात आहेत. शिवसेनेचे खासदार नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अशा स्थितीत मुख्यमंत्री यांना नाशिक नावाच्या जिल्ह्याचा विसर पडला आहे काय, असा प्रश्न समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे नाशिक हा आपला प्रांत नाही, असा काहीसा समज मुख्यमंत्र्यांचा झाला आहे काय? की, सरकारमधील तीन पक्षांनी आपापले जिल्हे वाटून घेत राज्याचे आपापसात त्रिभाजन केले आहे? त्यामुळे साहेब आहेत कुठे, हा सवाल आता नाशिककर नागरिक विचारत आहेत. 
 
प्रशासनाची कार्यक्षमता


शासन आणि प्रशासन ही राजकीय व्यवस्थेची दोन महत्त्वाची अंगे आहेत, हे लोकप्रशासनात नेहमीच शिकविले जाते. मात्र, शासन हे प्रशासनावर कायम आपला अंकुश ठेवून असते. असे दिसून येते. मात्र, सध्या नाशिकमध्ये स्थिती वेगळीच दिसून येत आहे. शासन हे पाच वर्षांचे आहे. प्रशासन हे अविरत आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे आणि सुश्रुषा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या भावनेतून जिल्हा प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी नाशिकमधील स्थिती येथे येत आजवर जाणून घेतलेली नाही. तेव्हा प्रशासकीय प्रमुख जरी येत नसले तरी, आपण जनतेचे सेवक आहोत, तेव्हा आपण आपली सेवा बजावणे आवश्यक आहे. याच धारणेतून जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. नाशिकमध्ये सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करणेकामी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनची मोठी समस्या निर्माण होत आहे. तेव्हा, नाशिक जिल्हाधिकारी यांनी उद्योगांसाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून वेळप्रसंगी तो कोरोनाच्या रुग्णांना पुरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हा तसा पाहिला तर खूप धाडसी निर्णय आहे. यामुळे उद्योगसमूहांची खप्पा मर्जी होण्याचीही शक्यता असून, त्यातून नवीन काही वाद पुढे येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.


मात्र, तरीही जनसेवेसाठी हे धाडस नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने दाखविण्यात आले आहे. यातून प्रशासनाची कार्यक्षमता निश्चितच दिसून येते. मात्र, त्याचवेळी सर्वसामान्य नाशिककर नागरिकांना शासन काय करत आहे हा प्रश्नदेखील सतावत आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या कालखंडात बरेच दिवस एकही कोरोना रुग्ण नव्हता. मात्र, त्यानंतर मालेगाव आणि आता नाशिक शहरसह जिल्ह्यातील स्थिती हाताबाहेर जात आहे. तेव्हा प्रशासन जरी आपले कार्य करत असले. तरी, त्याला दिशा दाखविणारे शासन कुठे आहे. हा मोठा प्रश्न समोर येत आहे. राजकीय नेते नाशिकमध्ये येत केवळ बैठका घेत आहेत. त्यात प्रत्यक्ष पदावर असणार्‍या मोजक्याच नेत्यांचा सहभाग असतो. बाकी नेते हे त्यांचे मार्गदर्शक, वरिष्ठ या सदरात मोडणारे असतात. मुख्यमंत्र्यांना नाशिक राज्यात आहे की नाही, हेच माहीत आहे का? हा मोठा प्रश्न नाशिककर नागरिकांना आहे. तेव्हा प्रशासन आपली लोकसेवेची भूमिका चोख बजावत आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@