
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अनंतात विलीन
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी: देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी पार्थिवास अग्नीडाग दिला. त्यापूर्वी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
देशाचे १३ वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर भारतीय लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपासून ते कोमात होते, अखेर ३१ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मंगळवारी त्यांचे पार्थिव दिल्लीतील १०, राजाजी मार्ग या शासकीय निवासस्थानी आणण्यात आले, मात्र त्यांना मृत्यूपूर्वी कोरोनाचीही लागण झाल्याने त्यांच्या तसबिरीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबियांनी पीपीई कीट परिधान केले होते.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १०, राजाजी मार्ग या मुखर्जी यांच्या निवासस्थानी त्यांच्या तसबिरीस पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांच्या तसबिरीस पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधानांनी मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत आणि कन्या शर्मिष्ठा यांचे सांत्वन केले.
देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, वायुसेनाप्रमुख एअरचीफमार्शल आरकेएस भदौरिया आणि नौदलप्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनीदेखील माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीदेखील प्रणब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉ. सिंग यांच्या पत्नीदेखील उपस्थित होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, अधीररंजन चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी. राजा यांनीदेखील श्रद्धांजली अर्पण केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ऑनलाईन बैठकीत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळले. यावेळी मंत्रिमंडळाने शोकप्रस्ताव संमत केला.
त्यात म्हटले की, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या निधन झाले, त्याविषयी मंत्रिमंडळ शोक व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनामुळे देशाने प्रतिष्ठीत नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. भारताचे १३ वे राष्ट्रपती असणाऱ्या प्रणब मुखर्जी यांना प्रशासनाचा अद्वितीय अनुभव होता. त्यांनी परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते. प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रसेवेविषयी मंत्रिमंडळ त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.