मुक्यांचे रुदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |


Mumbai Rains_1  

 


सातत्याने तीन दिवस अमर्याद बरसणार्‍या पावसाने मुंबईची नेहमीप्रमाणे त्रेधातिरपिट उडविली आणि मुंबईच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या. सध्याचा पाऊस म्हणजे अनियमित असतो. बरसला तर अमर्याद बरसतो आणि थांबला तर घशाला कोरड पाडतो आणि महापालिकेला पावसाळ्यातच पाणीकपातीची उपाययोजना करावी लागते. मुंबईची ‘तुंबई’ होण्याची अनेक कारणे आहेत. ठेकेदाराने न केलेली नालेसफाई आणि विक्रमी बरसलेला पाऊस ही कारणे आहेतच, पण मनमानीपणे झालेली बांधकामे हे महत्त्वाचे कारण आहे. या बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह अडला जातो आणि मग तो सारी बंधने तोडून स्वतःचा मार्ग अवलंबतो. सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. पण, स्वार्थ आणि त्यापोटी होणारे अतिक्रमण हा त्या बुद्धीला लागलेला कलंक आहे. सुधारणा हा माणसाचा स्वार्थ झाला आणि त्यासाठी होणारे अतिक्रमण हा कलंक झाला. अमर्याद लोकसंख्येमुळे माणसे जंगलात अतिक्रमण करू लागली. त्यामुळे जंगलातले प्राणी मनुष्यवस्तीत शिरकाव करू लागले. वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधा देता याव्यात म्हणून समुद्रात भरावाचे अतिक्रमण होऊ लागले. त्यामुळे समुद्राच्या पाण्याने आपल्या मर्यादा सोडून वस्तीत घुसण्याचा प्रयत्न केला. अजूनपर्यंत गिरगाव चौपाटीवर उंच उसळणार्‍या लाटांचे तांडव पाहायला मिळत होते. पण, आता समुद्राच्या पाण्याचा थयथयाट लोकांना अनुभवायला मिळाला. समुद्राच्या पाण्याने वस्तीत शिरकाव केला म्हणून पावसाचे पाणी अडले गेले आणि त्याने जनजीवन विस्कळीत केले. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शिरलेले पाणी हे त्यापैकी एक उदाहरण आहे. आपत्कालीन उपचारासाठी असलेल्या सुविधा पाण्याच्या वेढ्यात पडल्या, तर उद्या संकटकाळी कुठे धाव घ्यायची, याचा बोध अशा आपत्तीपासून घेणे आवश्यक आहे. कांदिवलीचा डोंगर कोसळणे आणि पेडररोडमध्ये भूस्खलन होणे समजू शकते. पण, दहिसरमध्ये खिडकीतून घरात पाणी शिरून झालेले नुकसान आणि त्यावेळी त्या कुटुंबीयांची झालेली केविलवाणी अवस्था म्हणजे बुद्धिजीवी प्राण्याने स्वार्थासाठी केलेल्या अतिक्रमणाचे फलित म्हणता येईल. या प्रसंगापासून आताच बोध न घेतल्यास मुक्यांच्या रुदनापासून मुंबई समुद्रात कधी बुडेल हे सांगता येत नाही.
 
हतबलता...


पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई महापालिकेने पाणीकपात जाहीर केली. ऐन पावसाळ्यात बुधवार, दि. ५ ऑगस्टपासून एकदम २० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘लॉकडाऊन’मध्ये थोडी अधिक शिथिलता देत काही नियमांच्या अधीन राहून बुधवारपासूनच मुंबईतील सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, हे दोन्ही मुहूर्त हुकले. मंगळवारपासून धुवाँधार पाऊस सुरू झाल्याने आणि मुंबईच्या रस्त्यांना तलावाचे स्वरूप आल्याने पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या चावीपर्यंत कर्मचारी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी पाणीकपात जाणवली नाही. उलट मुंबईच्या सखल भागातून चार दिवसांच्या पावसात १,७१४ कोटी लीटर पाण्याचा उपसा करण्यात आला. तुलनात्मक विचार केल्यास ८,०४६ दशलक्ष लीटर एवढी जलधारण क्षमता असणार्‍या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या चार दिवसांत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केवढा हा विरोधाभास आहे पाहा. एकीकडे पाणी नाही म्हणून पाणीकपात करायची आणि ज्या पाण्यामुळे तहान भागवायची तेच पाणी निरुपयोगी म्हणून बाहेर उपसून टाकायचे. भविष्यकालीन उपयोगी पडावे म्हणून हेच पाणी साठवण्याचे नियोजन आतापासूनच हवे. दुसरीकडे टाळेबंदीमुळे आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या दुकानदारांना मंगळवारी आणि बुधवारी पडलेल्या पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. बुधवार, दि. ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने उघडण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, मुहूर्ताच्या दिवशीच पावसाचे पाणी दुकानांत शिरून तेथील मालाचे मोठे नुकसान झाले. ‘लॉकडाऊन’मुळे मागील चार महिन्यांपासून व्यवसाय नसतानाही दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते यांनी बेजार झालेल्या व्यापार्‍यांच्या चिंतेत यामुळे आणखीच भर पडली. तसे पाहता मागील महिन्यांपासून बहुतांश व्यापार्‍यांनी दुकाने उघडली असली तरी गिर्‍हाईक नसल्याने त्यांना तोटा सहन करूनच दुकान चालवावे लागत आहे. त्यातून काहीसा दिलासा म्हणून बुधवारपासून या व्यापार्‍यांना दरदिवशी दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, पहिल्याच दिवशी या व्यापार्‍यांना वरुण राजाच्या अवकृपेमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. खराब मालाच्या ढिगार्‍याकडे पाहत परिस्थितीपुढे हतबलता व्यक्त करण्याव्यतिरिक्त त्यांच्यापुढे पर्याय नाही, हेच सध्याचे वास्तव आहे.
 
 

- अरविंद सुर्वे

 
@@AUTHORINFO_V1@@