'आदिवासी दिवसा'च्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020   
Total Views |


in_1  H x W: 0



उद्या, दि. ९ ऑगस्ट. जागतिक आदिवासी दिवस. या दिवसाबद्दल विचार करताना १२ ऑक्टोबर हा दिवस अनायसे आठवतो. कारण, दि. १२ ऑक्टोबर हा अमेरिकेने ‘कोलंबस दिन’ म्हणून साजरा करण्याचे प्रयोजन केले. मात्र, त्याच वेळी युरोपियन आणि अमेरिकन तसेच काही आफ्रिकी देशांतील आदिवासी बांधवांनी या दिवसाला ‘आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. दरवर्षी १२ ऑक्टोबर दिवस आला की पाश्चात्त्य देशात द्विधा उडे. कारण, कोलंबस हा आक्रमणकर्त्यांचा मानबिंदू. त्याच्यामुळेच पाश्चिमात्त्य आक्रमणकार्‍यांना गुलामगिरीसाठी नवनवीन प्रदेश मिळाले होते. या नवनवीन प्रदेशावर साम-दाम-दंड-भेद वापरून पाश्चिमात्त्य संधीसाधूंनी जगातल्या बहुतांश भागाला गुलाम केले होते. जिथे गेले तेथील रहिवाशांच्या क्रूर कत्तली केल्या. अगदी क्रूरपणे स्वत:चे अस्तित्व, स्वत:चे वर्चस्व तेथील लोकांवर लादले. अर्थात, समता, बंधुता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा नारा आता युरोपियन देशांनी किंवा अमेरिकन देशांनी कितीही दिला तरी इतिहास कुठे विसरला जातो? क्रूरपणे हिंस्रपणे समुदायाच्या केलेल्या कत्तली, अत्याचार अमेरिकेतील अणि युरोपातील, आफ्रिकेतील ही आदिवासी समुदाय विसरलेला नाही. त्यामुळे त्यांनी ‘कोलबंस दिना’ला विरोध केला.

मग हा तिढा कसा सोडवायचा? तर मग संयुक्त राष्ट्राने नव्वदच्या दशकात जागतिक स्तरावर एक परिषद घेतली आणि ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ घोषित केला. अर्थात, या परिषदेमध्ये सर्वसाधरण पिचलेला वनवासी बांधव गेला का? नाही तर ‘मूळनिवासी’च्या नावाने समस्त आदिवासी समाजाच्या दु:खावर आपली भाकर भाजणारेच गेले असतील. कारण, त्यानंतर ‘कोलंबस दिवसा’चा विरोध सारून ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ मानला गेला.
या दिवसाबाबत भूमिका स्पष्ट करताना म्हटले गेले की, जगात जिथे-जिथे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींवर अत्याचार झाले. त्यांच्या समुदायाची लोकसंख्या धोकादायकरित्या कमी झाली. त्या देशामध्ये आदिवासींना हक्क आणि न्याय, सुविधा, दर्जा मिळवून देण्यासाठी या ‘आदिवासी दिवसा’ची स्थापना केली गेली. जगातील १९५ देशांपैकी ९० देशांना यासाठी केंद्रबिंदू मानले गेले. या ९० देशांमध्ये पाच हजार आदिवासी समुदाय आहे. संयुक्त राष्ट्राने असे घोषित केले की, या समुदायांना सुरक्षा आणि सक्षम बनवण्यासाठी या दिवसाचे महत्त्व असावे. आपले जुलमी साम्राज्य वाढवताना युरोपियन देशांनी खरोखरच कितीतरी देशातील स्थानिकांवर अत्याचार केले होते. अमेरिकेचेही चित्र काही वेगळे नाही. तेथील कृष्णवर्णीय काही वेगळे नाहीत. पण, त्यांच्यावरही असेच दुय्यम नागरिकत्व थोपवले गेले. त्यामुळे या देशांसाठी आणि त्यांनी प्रताडित केलेल्या आदिवासी समुदायांसाठी ‘जागतिक आदिवासी दिन’ संयुक्तिकच आहे.


मात्र, ‘आदिवासी दिना’निमित्त संयुक्त राष्ट्राच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही विघातक लोकांनी निशाणा साधला तो भारतावर आणि भारताच्या विविधतेतून समरस असलेल्या एकात्मतेवर. आदिवासींच्या हक्काची लढाई आणि प्रयत्न केले गेले पाहिजेत, असे जेव्हा संयुक्त राष्ट्राने घोषित केले. तेव्हा त्या ९० देशांमध्ये भारताचेही नाव होते. पण, या अजेंड्यामध्ये भारताचे नाव टाकणे चुकीचेच होते आणि आहे. कारण, भारतात कुणीही मूलनिवासी नाही आणि भारतामध्ये सध्या कुणा बाहेरून आलेल्या समुदायाचे राज्यही नाही. भारतात काश्मीर ते कन्याकुमारी ते गुजरात ते प. बंगाल हे केवळ भारतीयच आहेत. वनवासी हे मूलनिवासी आणि ग्राम, नगर, शहरवासी हे मग कोणते निवासी? अर्थात, जगाच्या पाठीवर ‘जागतिक आदिवासी दिवससाजर्‍या करणार्‍या कुणाकडेही याचे उत्तर नाही. प्रत्यक्षात जगभरात काही समुदाय सोडले, तर वनवासी समाजाने कात टाकली आहे. जागतिक प्रवाहात समाज सामील झाला आहे. जागतिक स्तरावर ‘आदिवासी दिवस’ साजरा करताना जर समुदायाच्या कल्याणाची दिशा मिळणार असेल तर चांगलेच. पण, ‘जागतिक आदिवासी दिवसा’च्या नावावर जगभरातल्या विविध समुदायांमध्ये आपापसात द्वेषभावना वाढीस लागून त्याची परिणती हिंसेत होईल, असे केले जात असेल, तर या दिवसाचा विचार वेगळ्या अंगाने करायला हवा. माणूस म्हणून आम्ही सगळे एक आहोत. मानवी संस्कृती ही शाश्वत मानवी मूल्यांची आधारभूत आहे. या संकल्पनेबद्दल जागतिक आदिवासी दिवस’ काही सांगेल का?

@@AUTHORINFO_V1@@