‘नाट्यमहर्षी’ इब्राहीम अल्काझी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020   
Total Views |
Alkazi_1  H x W




भारतात आधुनिक नाट्यसृष्टीचा पाया रोवणारे ‘नाट्यमहर्षी’ इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाने नाट्यसृष्टीच्या एका बहरलेल्या काळाचा अंत झाला. त्यांच्या या सोनेरी कारकिर्दीवर एक कटाक्ष टाकण्याचा हा प्रयत्न...



सुप्रसिद्ध नाट्य-चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ वाचलेल्या प्रत्येकालाच इब्राहीम अल्काझी म्हणजे जणू आपले नातेवाईकच भासतात. किंबहुना, ‘झिम्मा’ वाचलेल्या किंवा नाट्यसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना अल्काझींची वेगळी ओळख करून देण्याची गरज कधीच भासणार नाही. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून नेहमीच इब्राहीम अल्काझींकडे पाहिले गेले.


दि. १८ जुलै १९२५ मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. अल्काझी यांचे वडील सौदी अरेबियातील धनाढ्य व्यापारी होते, तर आई कुवेती होती. नऊ भावंडे असलेल्या अल्काझींचे बालपण पुण्यातील लाल देऊळ परिसरात गेलं. पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. बालपणापासूनच अरबी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी या भाषा त्यांना अवगत होत्या. शालेय शिक्षण पुण्यात आणि मराठीतून झाल्यामुळे शेवटपर्यंत मराठी रंगभूमीबद्दल आणि कलाकारांबद्दल त्यांचा जिव्हाळा कायम राहिला.


१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात गेले. अल्काझींनी मात्र भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर सुलतान बॉबी पद्मसी यांच्या नाटक ग्रुपबरोबर काम सुरू केले. बीएचा अभ्यास पूर्ण करून ‘रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट’ या अग्रगण्य संस्थेमध्ये रंगभूमी विषयक रीतसर अव्वल शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले.


१९४०च्या दरम्यान नाटकांच्या ओढीने ते मुंबईत आले होते. नाट्यवेडाने झपाटलेले अल्काझी अल्पावधीतच उत्तम अभिनेते म्हणून परिचित झाले. १९४०-५०च्या दशकात त्यांनी नाट्यसृष्टीत वेगवेगळे प्रयोग केले. यासाठी त्यांना प्रतिष्ठित ‘बीबीसी ब्रॉडकास्टिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इब्राहीम अल्काझींनी भारतीय रंगभूमीला शेक्सपिअर आणि ग्रीक नाट्यकृतींशी ओळख करून दिली. या परदेशी कलाकृती त्यांनी भारतीय रंगमंचावर नुसत्या आणल्याच नाहीत, तर त्या इथे रुजवल्यासुद्धा! त्यांच्या या अनोख्या धाडसी प्रयोगांमुळे भारतीय रंगभूमीचा कायापालट झाला. ग्रीकच्या शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रिक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटके त्यांनी भारतीय रंगभूमीवर आणली.


कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट’ या नाट्यसमूहासोबत काम करण्यास सुरुवात केली. एम. एफ. हुसैन, एफ. एन. सुझा, एस. एच. रझा, अकबर पद्मसी, तय्यब मेहता यांसारखे मोठे कलाकार या नाट्यसमूहात सहभागी होते. याच कलाकारांनी नंतर अल्काझींच्या नाटकांतून काम केले. त्यांच्या नाटकांसाठी नेपथ्याची जबाबादारी पार पाडली. अभिनयासोबतच त्यांनी नाट्य दिग्दर्शनास सुरुवात केली होती. दिग्दर्शन सुरू असतानाच त्यांनी १९५३ मध्ये ‘थिएटर बुलेटीन’ सांगणारे मासिक काढण्यास सुरुवात केली. या मासिकातून भारतभरातील नाट्यसृष्टीत घडणाऱ्या घडामोडींची माहिती दिली जायची. या सगळ्या बरोबरच त्यांनी ‘स्कूल ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स’ची स्थापना केली. ‘बॉम्बे नाट्य अकादमी’चे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम सांभाळले.


१९६२ मध्ये त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची अर्थात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या संचालक पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. सलग १५ वर्षे ते ‘एनएसडी’च्या संचालकपदी विराजमान होते. इतका प्रदीर्घ काळ या पदावर असणारे अल्काझी एकमेव संचालक होते. वयाच्या ५०व्या वर्षी अल्काझींनी ‘एनएसडी’च्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिल्लीत त्यांनी पत्नी रोशन अल्काझी यांच्याबरोबर आर्ट हेरिटेज सुरू केलं. त्यामध्ये त्यांच्या कलाकृती, फोटो यांचा संग्रह आहे. भारतीय नाट्यसृष्टीचा एक सोनेरी कालखंड त्यांच्या या संग्रहालयाच्या कुपीत जपून ठेवला आहे.

‘एनएसडी’चे संचालक असतानाच्या काळात त्यांनी जवळपास ५० पेक्षा जास्त अजरामर नाटकं केली. गिरीश कर्नाड यांचे ‘तुघलक’, धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ या लोकप्रिय नाटकांची निर्मिती त्यांनी केली. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यामध्ये नसिरुद्दीन शाह, ओम पुरी यांचा समावेश आहे. ‘एनएसडी’मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये विजया मेहता, ओम शिवपुरी, बलराज पंडित, मनोहर सिंह, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सुहास जोशी, बी. जयश्री, जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.


भारतीय नाट्यसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या इब्राहीम अल्काझींनी भारतातील अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले. नाट्यसृष्टीतील आजीवन योगदानासाठी त्यांना २००४ मध्ये ‘रूपवेध प्रतिष्ठान’चा पहिला ‘तन्वीर’ पुरस्कार मिळाला. १९६६ मध्ये ‘पद्मश्री’, १९९१ मध्ये ‘पद्मभूषण’ या भारत सरकारच्या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. २०१० मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार त्यांना दोनदा लाभले. त्याही पलीकडे त्यांचे अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशीप प्रदान करण्यात आली होती.


भारतीय नाट्यक्षेत्राला ‘मॉडर्न थिएटर’ची ओळख करून देणारे रंगधर्मी इब्राहीम अल्काझी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९५व्या वर्षी (४ ऑगस्ट, २०२०) दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय नाट्यसृष्टीच्या एका सोनेरी कालखंडाचा अस्त झाल्याची भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली.





@@AUTHORINFO_V1@@