‘आधीच हौस, त्यात पडला पाऊस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020   
Total Views |


Uddhav thackeray_1 &

 
 

सध्याच्या घडीला राज्यात दोन मुद्दे कायम चर्चेत येत आहेत. एक म्हणजे, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरे म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घरात बसून राहणे. ठाकरे यांनी राज्याचा दौरा करावा, असा सूचना वजा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर कुठे मुख्यमंत्री महोदय यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यामुळे आपल्या स्व-चालक भूमिकेतील पुणे दौर्‍यानंतर मुख्यमंत्री महोदय गुरुवारी (दि. ६) नाशिकला येतील, असेही सांगितले जात होते. परंतु, हवामान खात्याने पावसाच्या दिलेल्या ‘हायअलर्ट’मुळे पुन्हा एकदा त्यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. ९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आता त्यानंतरच नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
राज्यात पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण राज्यभर कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. मुंबईत तर दिवसागणिक रुग्णसंख्या हजारोंनी वाढत होती. प्रथम जिल्ह्यातील मालेगावमध्ये वेगाने वाढणारी संख्या आता नाशिक शहरात आटोक्याबाहेर जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाशिक दौरा करत स्थिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या. शरद पवार यांनीदेखील नाशिकमध्ये प्रशासकीय बैठक घेत स्थिती जाणून घेतली. मात्र, प्रशासन प्रमुख असलेले मुख्यमंत्री अजून मुहूर्त शोधत आहेत. आधी कोरोनामुळे घरात राहून राज्याचा गाडा हाकणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौर्‍याला आता पावसाचे निमित्त प्राप्त झाले आहे, असे दिसते. त्यामुळेच त्यांचा अधिकृत दौरा प्राप्त होऊ शकला नाही.
 
ही सर्व स्थिती पाहता, ‘आधीच हौस त्यात पडला पाऊस’ असेच म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. मुख्यमंत्री जसे कार चालवत पंढरपूर आणि पुण्याला गेले, तसे ते रस्ता मार्गे नाशिकला येऊ शकतात. केवळ पावसाच्या भीतीने किंवा हवामान खात्याच्या इशार्‍यामुळे त्यांनी आपला दौरा पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया नाशिककर नागरिक व्यक्त करत आहेत.
 
मानवतावादी धोरण
 


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना उपचारात प्रभावी ठरू शकणार्‍या प्लाझ्मा थेरपीचा विचार करून भारतीय जैन संघटना १५ ऑगस्टपर्यंत पाच हजार प्लाझ्मा दात्यांची माहिती संकलित करून शासनाला सुपूर्द करणार आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेने प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेच्या माध्यमातून चळवळ सुरू केली आहे.


कोरोनाच्या संसर्गापेक्षाही लोकांमध्ये कोरोनाविषयी भीतीच जास्त निर्माण झाली आहे. कोरोनामधून आपण बाहेर पडू शकतो, यावर नागरिकांचा विश्वास बसणे आवश्यक आहे. भारतीय जैन संघटना राज्यातील विविध गावांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने विविध कामे करीत आहे. प्लाझ्मा थेरपीने कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतात. या थेरपीवर केंद्र व विविध राज्य सरकारांतर्फे सध्या संशोधन सुरू आहे. मात्र, या कालावधीत कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घेण्याची संमती या रुग्णांकडून घेतली जात आहे. या कालावधीत प्लाझ्मादाते शोधले जात असून, या दात्यांच्या माध्यमातून विनाविलंब उपचार होऊन कोरोना रुग्णांना जीवदान मिळू शकते.

 
प्लाझ्मादान करणार्‍या व पात्र असणार्‍या पाच हजार व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांची संमतीपत्रे मिळवून ते शासनाच्या सुपूर्द करण्याचा निर्णय ‘बीजेएस’मार्फत घेण्यात आला आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व राज्य प्रभारी नंदकिशोर साखला यांनी दिली.


नाशिकमध्ये कोरोना काळात अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सेवा कार्य करण्यात आले. मात्र, संघटनेच्या माध्यमातून डाटा संकलित करून प्रशासनास सहकार्य करण्याचे हे उदाहरण नक्कीच आशादायक आहे.


एकीकडे मुख्यमंत्री घरात बसून काम करत असताना दुसरीकडे विविध संस्था आपले सामाजिक दायित्व निभावत आहेत. हे नक्कीच आशादायी असले तरी, शासनाच्या दृष्टीने स्पृहणीय असे नक्कीच नाही, असे वाटते.

भगवान महावीर, ऋषभदेव यांसारख्या महान विभूतींच्या शिकवणुकीचा आदर्श समोर ठेवत जैन संघटना मानवतावादी कार्याचा वस्तुपाठ निर्माण करत आहे. जैन संघटनेचे हे कार्य शासन प्रशासन विविध सामाजिक संस्था यांच्यासाठी नक्कीच पथदर्शक असे आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@