नोकरदारांना ‘हक्काचा डब्बा’ देणारे हेमंत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020   
Total Views |
hemant lohgaonkar_1 




अनेक लोक कामानिमित्त बाहेर राहतात, किती तरी दिवस घरापासून दूर असतात. तेव्हा घरच्यांची ओढ तर सतावत असते, पण त्याचबरोबर घरच्या जेवणाची आठवणसुद्धा येत असते. लोकांची हीच अडचण दूर करण्याचा ध्यास नगरच्या हेमंत लोहगावकर यांनी घेतला आहे.


जेवण कोणत्याही प्रकारचे असो, ताटातला पदार्थ खाताना त्याच्या चवीने माणूस तृप्त झाला की, जेवण बनवणार्‍याची मेहनत सार्थकी लागली असे म्हणतात. अगदी बाहेर असलो तरीही खाण्याचा दर्जा आणि चव उत्तमच असली पाहिजे, असा काही जणांचा आग्रह असतो. आज अनेक लोक नोकरी किंवा इतर कारणांमुळे आपल्या घरापासून दूर राहतात. अशावेळी घरगुती जेवणाचे हाल तर होतातच, शिवाय खाण्याचा दर्जा वगैरे चोचले पूर्ण करण्यासाठी अनेकांना वेळही मिळत नाही. काही लोक चविष्ट जेवण मिळावे म्हणून छोट्या खाणावळीपासून ते मोठमोठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पालथी पाडतात. अशा लोकांसाठीच हेमंत लोहगावकर यांनी ‘माय टीफिन’ची सुरुवात केली.

आई-वडील सतत कामानिमित्त बाहेर असायचे, यामुळे शाळेत असतानाच हेमंत यांना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली होती. स्वयंपाकाच्या आवडीमुळे त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते, पण त्याकाळी या क्षेत्रात फारशी मागणी नव्हती. वडिलांचा नकार असल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही, पण २० वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी आपली इच्छा त्यांनी पूर्ण केली. हॉटेल मॅनेजमेंट तर करता आले नाही; पण जेवणाचा व्यवसाय मात्र करून दाखवला.

स्वतःही ते नोकरी करू लागले. त्यावेळी त्यांना कामाच्या निमित्ताने महिन्यातील २० ते २२ दिवस बाहेर राहावे लागायचे. कामानिमित्त भारतभर प्रवास व्हायचा. त्यामुळे सतत बाहेरचे जेवण जेवायला लागायचे. सतत बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना खाद्य व्यवसायाची कल्पना सुचली. आपल्यासारखे अनेक लोक कामाच्या निमित्ताने घरापासून दूर राहतात; आपल्याप्रमाणे त्यांनाही घराच्या जेवणाची आठवण येत असणार, असा त्यांनी विचार केला. अशा लोकांची अडचण दूर करण्यासाठी जन्म झाला ‘माय टीफिन’चा..

व्यवसायाची पहिली पायरी अर्थात सर्व्हे. यासाठी त्यांनी जवळजवळ तीन वर्षं फिरून लोकांच्या नेमक्या गरजा जाणून घेतल्या. मुंबई, जळगाव, कानपूर, बंगळुरू, दिल्ली अशा शहरांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. वेगवेगळ्या खानावळी, हॉटेल्समध्ये जाऊन माहितीतल्या लोकांना ते भेटले. या दरम्यान, त्यांनी जवळपास ३३२ मेसना भेट देऊन तेथील माहिती घेतली. त्याचबरोबर तिथे येणार्‍या सुमारे पाच हजारांहून अधिक व्यक्तींशी त्यांच्या आवडीनिवडीबद्दल चर्चा केली. जे करायचं ते चांगलंच करायचं, असा ध्यास त्यांनी घेतला होता. व्यवसायातील अडचणी, लोकांना काय आवडतं, कोणत्या पद्धतीचं आवडतं, कच्चा माल कुठे मिळेल अशा सर्व गोष्टींचा अंदाज त्यांनी घेतला. या सगळ्यात त्यांना उपयोगी पडला तो स्वानुभव!

२० वर्षांच्या नोकरीमध्ये भारतभ्रमण करत असताना, हेमंत यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे महाराष्ट्राचे पदार्थ सगळीकडेच मिळत नाही. भारतात इतर ठिकाणी काय तर महाराष्ट्रातील हॉटेल्समध्येही मराठी पदार्थांचा दुष्काळ असतो. पंजाबी, साऊथ इंडियन, चायनिज पदार्थांचा अक्षरश: मारा असतो. थालीपीठ, बिरडं, मोदक, पुरणपोळी, अळूचं फदफदं असे मराठमोळे पदार्थ सहसा हॉटेलमध्ये मिळत नाहीत. लोकांची ही गरज हेमंत लोहगावकर यांनी व्यवसायानिमित्ताने हेरली.

गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही, असं त्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं. गुणवत्ता आणि स्वच्छतेबद्दल ते इतके आग्रही होते की, त्यांनी जेवण बनवल्या जाणार्‍या किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. आपण खात असलेले पदार्थ हे कशा प्रकारे तयार होतात हे ग्राहक स्वतःदेखील पाहू शकतो. या संकल्पनेमुळेच ग्राहक चवीबरोबर त्यांच्या स्वच्छ किचनकडेसुद्धा आकर्षित होतात. यामुळेच ‘माय टीफिन’ला ‘बेस्ट हायजिन’ पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या या सेवेला ‘आयएसओ’ मानांकनसुद्धा मिळाले आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळणारी ही महाराष्ट्रातील प्रथम आणि एकमेव टीफिन सेवा आहे. उत्कृष्ट चव आणि उत्तम गुणवत्ता यामुळेच ‘माय टीफिन’ची झपाट्याने वाढ होत गेली.

५० डब्यांपासून या व्यवसायाची सुरुवात झाली आणि आता हा व्यवसाय रोजच्या १५० ते २०० डब्यांपर्यंत पोहोचला आहे. ५० ते ५२ ग्राहकसंख्या, आता ७० हजारांच्या घरात गेली आहे. भविष्यात तरुणांना या व्यवसायात आणण्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा येथे ‘फ्रँचायजी’ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘फ्रँचायजी’च्या माध्यमातून त्यांना नोकरी देणारे व्यावसायिक घडवायचे आहेत. मराठी तरुणांनी व्यवसायात उतरावं, मराठी उद्योजकता वाढावी यासाठी ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहेत. या सगळ्यासोबतच त्यांनी स्वतःच ‘रेस्टोरेंट’ सुरु करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे.

घरापासून दूर असणार्‍या नोकरदारांना स्वच्छ, पोषक आणि चविष्ठ जेवण देण्याचे काम हेमंत लोहगावकरांच्या ‘माय टीफिन’मधून केले जाते. भविष्यात व्यवसायक्षेत्रात येऊ इच्छिणार्‍यांनीही हेमंत लोहगावकरांच्या या व्यवसायगुणांचा आदर्श घेतला पाहिजे.





@@AUTHORINFO_V1@@