मनी आनंद, भुवनी आनंद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


असंख्य हिंदू जनांच्या हृदयात विराजमान प्रभू श्रीरामाच्या मंदिरनिर्मितीची घटना पिढ्यान् पिढ्यांच्या दडपशाहीवर मात करणार्‍या भारतभूच्या स्वत्त्वाचे किंवा कालजयी श्रद्धेचे प्रकटीकरण असून, हे मंदिर हिंदूंच्या ओळख व अस्मितेला चिरंजीवित्त्व देणारे ठरेल. अशा श्रीराम मंदिरनिर्मितीचा मनी आनंद, भुवनी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
 

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्राच्या जन्मस्थळी पवित्र अयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या पायाभरणीला ‘नव्या भारताच्या अभ्युदयाचा शुभशकून’ म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. कारण, असंख्य हिंदू जनांच्या हृदयात विराजमान प्रभू श्रीरामाच्या मंदिरनिर्मितीची घटना पिढ्यान्पिढ्यांच्या दडपशाहीला विरोध करणार्‍या, त्यावर मात करणार्‍या भारतभूच्या स्वत्त्वाचे किंवा कालजयी श्रद्धेचे प्रकटीकरण आहे. परिणामी, मंदिरनिर्मितीची ही अभिमानास्पद, गौरवास्पद, कौतुकास्पद आणि ऐतिहासिक घटना युगानुयुगे देशाला शक्तिशाली करेल, तसेच निरंतर चिरंतन स्वाभिमानाची प्रेरणा देत राहील. तथापि, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिराची निर्मिती एकाएकी होत नसून त्याचा अत्यंत संघर्षमय इतिहासदेखील आहे. परकीय आणि स्वकीय डाव्या इतिहासकारांनी हयातभर भारताला पराजयाचाच इतिहास असल्याचे लिहिले. शक, कुषाण, हूण, अरब, तुर्क, मुघल तथा ब्रिटिशांच्या आक्रमणाने देश पराभूत झाल्याचे त्यांनी सातत्याने सांगितले. पण, भारतविरोधी किंवा हिंदुविरोधी इतिहासकारांनी लिहिलेला, सांगितलेला, छापलेला, बोललेला हा इतिहास अर्धवट असून केवळ इथल्या जनमानसाच्या खच्चीकरणासाठीच प्रसारित केल्याचे अनेक घडामोडी व प्रसंगांवरून स्पष्ट होते. तरीही एक खोटे शंभरदा सांगितले की, त्याचा प्रभाव जनतेवर पडतोच पडतो, तसाच या मंडळींच्या बनवाबनवीचा परिणामही देशवासीयांवर झालाच. मात्र, श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन या पराभूत नि हीन भावनेने ग्रासलेल्या देशाचा युगांत आणि भारतीयत्व, हिंदुत्वाभिमानी देशाचा युगारंभ करणारे ठरले.

 

 


३० वर्षांपूर्वी अगणित श्रीरामभक्तांनी एकत्र येऊन अयोध्येतील श्रीराम मंदिरनिर्मितीचा संकल्प केला. अवघा देश या संकल्पाने भारला गेला नि आपल्या आराध्य दैवताची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी जागृत झाला. त्यानंतरच्या काळात सत्ताधार्‍यांच्या, ‘चिटपाखरूही उडू शकणार नाही’च्या धमकीला न जुमानता, सर्वप्रकारचे शासकीय-राजकीय अडथळे पार करत हजारो कारसेवक अयोध्येत दाखल झाले. इथेच मुल्ला मुलायमसिंह सरकारच्या आदेशाने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कोठारी बंधूंसह अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पुढे संपूर्ण भारतभरात अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळ हिंदूंच्या ताब्यात घेण्यासाठी व्यापक जनजागरण-धर्मजागरण मोहीम आखली गेली. सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेच्या माध्यमातून आसेतुहिमाचल संपूर्ण देशभर प्रत्येकाच्या मनाने एकच एक ध्येय निश्चित केले. त्यातूनच श्रीराम जन्मभूमीमुक्तीसाठी, राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी नि आपल्या संकल्पपूर्तीसाठी श्रीरामभक्तांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्राच्या अस्मितेवरील बाबरी ढांचारूपी शेकडो वर्षांचा कलंक जमीनदोस्त केला. ‘जय श्रीराम, रामलला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’च्या घोषणांनी आसमंत निनादला. हिंदुराष्ट्राच्या निस्तेज होत चाललेल्या सूर्याला श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातून पुन्हा लखलखत्या तेजाची झळाळी मिळाली. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनापासून ते आज श्रीराम मंदिरनिर्मितीपर्यंतच्या या प्रवासात कोट्यवधी जनसागराच्या श्रद्धा आणि भक्तीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि अनेकांच्या संघर्षाचा समावेश आहे. आजच्या मंदिरनिर्मितीची सुरुवात ५०० वर्षांपासून आधुनिक काळापर्यंत आणि थेट उच्च व सर्वोच्च न्यायालयात हिंदू समाजाने दिलेल्या प्रखर लढ्याच्या विजयाचा आणि श्रीरामासाठी हुतात्मा झालेल्या प्रत्येकाच्या गौरवाचा दिवस आहे. तसेच अयोध्येत केवळ श्रीराम मंदिराची निर्मिती होत नसून, रामराज्याच्या पुनःसंस्थापनेचा हा संकेत आहे. आज जागतिक पटलावर भारताची एक नवी प्रतिमा तयार झाली असून ती अधिकाधिक देदीप्यमान करणारी ही घटना आहे, म्हणूनच या मंदिरनिर्मितीचा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीदारी दसरा-दिवाळी-गुढी पाडव्यासारखा साजरा करायला हवा.

 


संपूर्ण देशाला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एका सूत्रात जोडणारा भारताच्या ज्ञात इतिहासातला प्रथम राष्ट्रपुरुष म्हणजे श्रीराम. सर्वोच्च लोकनायकाच्या रूपात श्रीरामाने रामराज्य काळात आपल्या प्रजाजनांचा आवाज ऐकला, त्यावर कृती करण्यास प्राधान्य दिले. मात्र, संकुचित, तथाकथित धर्मनिरपेक्षता, हिंदू घृणा, कट्टरतेचे लांगुलचालन हे मुद्देच स्वतंत्र भारताच्या राजकारणाचे वर्षानुवर्षे आधारस्तंभ झाले. अशाप्रकारच्या राजकारणाची मुळे खोलवर रुजली आणि तशी ती नसती तर श्रीराम मंदिराची निर्मिती याआधीच झाली असती. तरीही भारतीयांनी व हिंदूंनी राष्ट्रीय एकता-अखंडतेचे प्रतीक असलेल्या श्रीरामाच्या जन्मभूमीला बाबर व बाबरच्या आधुनिक वंशजांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी जोरदार लढा दिला. दरम्यान, राष्ट्र आणि श्रीरामाचे नाव पुसण्याची षड्यंत्रे गेल्या ७० वर्षांत अनेकदा रचली गेली. काँग्रेस, कम्युनिस्टांसारख्यांनी तर श्रीरामाचे अस्तित्व नाकारले आणि तसे प्रतिज्ञापत्रही न्यायालयापुढे सादर केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही अगदी कालपरवापर्यंत मंदिराला विरोध केला. पण, श्रीराम मंदिर निर्मितीची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी त्यातल्या कित्येकांवर कोलांटउड्या मारण्याची पाळी आली. श्रीरामाच्या रंगात देश रंगलेला असताना त्यांना आपण संदर्भहीन होऊ की काय, या भीतीने मंदिराच्या समर्थनाची भूमिका घ्यावी लागली. हा श्रीरामाच्या नावाचा आणि हिंदू समाज जागृत झाल्याचाच परिणाम आहे. तसेच आजची मंदिरनिर्मितीदेखील हिंदू जनजागृतीतूनच होत असून श्रीरामाने आपल्या भक्तांचा आवाज ऐकून हा सुवर्णयोग जुळवून आणल्याचे म्हणावे लागेल. असे हे मंदिर धर्मस्थापना आणि वाईटाच्या नाशाचे प्रतीक म्हणून उभे ठाकेल, तसेच हिंदूंच्या ओळख व अस्मितेला चिरंजीवित्त्व देणारेही ठरेल. अशा श्रीराम मंदिरनिर्मितीचा मनी आनंद, भुवनी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@