‘फीट’ आणि प्रथमोपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
Health_1  H x W





आरोग्यासंदर्भात अनेक बाबींचा ऊहापोह आपण गेले अनेक आठवडे करत आहोत़ व्यक्तिगत आजारपण कोणत्या स्वरुपात आणि कुठे अनुभवायला येईल सांगता येत नाही. अशावेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण कुठेही कमी पडता कामा नये. ‘हे विश्वचि माझे घर’ असे केवळ बोलण्यापुरते मर्यादित राहू देऊ नका. ते आचरणात आणायला हवे. कुटुंब आपली काळजी घेतंच असतं, पण घराबाहेर आपल्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास मदत करणारं कुणीतरी हवंच. आपल्याला कोणी मदत करावी, असं जेव्हा वाटतं तेव्हा आधी आपण कोणालातरी मदत केलेली असली पाहिजे़.


बाहेर अनुभवायला येणारी एक गोष्ट म्हणजे चक्कर येणे. अचानकपणे कोणाला तरी चक्कर येते आणि गोंधळ सुरु होतो. ही चक्कर कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुषाला येऊ शकते. त्याची कारणं भिन्न असू शकतात़ अशावेळी आपलं मन शांत ठेवावं. चक्कर येणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आणि आपण कोण आहोत, वयोगट कोणता हे ध्यानात घ्यावे. सामाजिक संकेत पाळणे हे फार महत्त्वाचे आहे़ आपण पुरुष असाल आणि तरुण/तरुण स्त्रीला चक्कर आल्यास एका स्त्रीच्या मदतीनेच पुढाकार घ्यावा. मुळात चक्कर येण्याआधी काहीतरी घडलेलं असतं. त्याचं कारण बहुतांशी शारीरिक आणि मानसिकदेखील असू शकतं.


रुग्ण चक्कर येण्याआधी खालीलपैकी एक कारण सांगू शकेल -
- रुग्णाला डोकं हलकं वाटू शकतं.
- प्रचंड थकवा जाणवतो़
- काहींना आधी मळमळत असतं.
- त्वचा गळून गेल्यासारखी अथवा पिवळी पडल्यासारखी वाटते़
जर एखाद्याला चक्कर येत असेल तर -
- त्याने लगेच खाली झोपावे.
- डोके गुडघ्याकडे न्यावे़
- डोके गुडघ्याकडे हृदयापासून खाली नेल्यास रक्तप्रवाह मेंदूच्या दिशेने प्रवाहित होतो.

या काही साध्यासोप्या बाबी आहेत ज्या आपल्याला प्रथमोपचारात माहीत असायला हव्यात़. हे चक्कर येत असताना रुग्णाच्या मदतीने करता येईल. परंतु, चक्कर येऊन व्यक्ती बेशुध्द पडली असेल तर -
- रुग्णाचे डोके खाली येईल, अशा स्थितीत ठेवावे आणि थोडे वर उचलून ठेवावे. रक्तप्रवाह मेंदूकडे जायला मदत होईल
- आणि घट्ट कपडे असतील तर थोडे सैल करावेत. थोडा वारा घालावा़.
- त्या व्यक्तीया तोंडावर गळ्यावर थंड पाणी मारा किंवा कपड्याने पुसा.


पॅनिक(उद्विग्न, भावनाशील) होऊ नये़. वरील प्रयत्नांनी थोडा वेळ गेल्यावर व्यक्तीला थोडं शुद्धीत आल्यासारखं वाटतं. त्याला धीर द्यावा. शांतपणे त्याच्याशी संवाद साधावा. त्याला आहे, त्या परिस्थितीत बसू द्या. झोपू द्या. काही खायची-प्यायची बळजबरी करु नका. बर्याचदा डॉक्टरकडे नेल्यास फार उत्तम चक्कर येण्याची कारणे व्यक्तिगणिक वेगळी असू शकतात. बाहेर पडताना एका पेपरवर आपले नांव, आजाराची केस हिस्ट्री, तसेच इर्मजन्सी नंबर असे लिहून ठेवावेत, जेणेकरुन प्रयोग करण्यात लोकांचा डॉक्टरांचा वेळ जाणार नाही. तुमचे प्राण वाचतील़ अनेेक केसेसमध्ये योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. जीव अमूल्य आहे, तो वाचवलाच पाहिजे. आणखीन एक चिंताजनक आजार म्हणजे - ‘फीट येणे.’ फीट कधीही कुठेही येऊ शकते. अशावेळी स्नायू एकदम घटट आणि कडक होतात व त्यानंतर झटके येऊ लागतात़ कधीकधी अशी व्यक्ती रुग्ण जीभ चावू शकतो वा श्वास घेणे थांबवू शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडू शकतात. खूप जास्त प्रमाणात लाळ गळू लागते वा तोंडातून फेस येऊ लागतो.


‘फीट’च्या बाबतीत फार काळजी घ्यावी लागते. जर रुग्णाने श्वासोच्छवास थांबवला, तर ते चांगले लक्षण नाही. अशावेळी विलंब न करता ताबडतोब डॉक्टरकडे धाव घ्यावी. त्वरित उपचारासाठी काही पद्धती आहेत.
- रुग्णाजवळच्या सर्व वस्तू दूर करा व त्याच्या डोक्याखाली मऊ उशी द्या.
- रुग्णाने श्वास घेणे थांबवले तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वासमार्ग उघडण्याचा प्रयत्न करा.
- स्वत: शांत राहा व रुग्णाला मदत करा.
- दारं खिडक्या उघडून रुग्णाला मोकळी हवा मिळू द्या.
- रुग्णाच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
- बहुतेक ‘फीट’ ही थांबून थांबून परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्थेत येते.
‘फीट’ आलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूस कसे वातावरण हवे?
- त्या व्यक्तीच्या भोवती गर्दी करु नका.
- रुग्णाला पाणी पाजू नका. जबरदस्ती करुन पाणी पाजण्याचा प्रयत्न केल्यास पाणी श्वासनलिकेत जाऊन रुग्ण गुदमरु शकतो.
कांदा/चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैरसमज आहे.
- फीटमुळे होणारी त्याच्या हातापायाची थरथर जबरदस्तीने थांबवू नये.

बहुतेक फीट आल्यानंतर थोड्या वेळाने थांबते. ‘एपिलेप्सी’ ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दरवेळी डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज नसते़ परंतु, पाच मिनिटांमध्ये न थांबल्यास डॉक्टरांना पाचारण करावे. उपचार करण्यात वेळ घालवू नये. ज्यांना फीट येण्याचा त्रास आहे, अशांनी कार्यालयात अथवा इतरत्र कल्पना देऊन ठेवावी. आपल्या इतर व्याधींविषयी माहिती चटकन मिळेल, अशी जवळ ठेवावी म्हणजे अज्ञात व्यक्तींना, डॉक्टरांना उपाय करणे सोपे जाते. आपल्याला शक्य तितकी उपाययोजना आपण करावी हे उत्तम!


पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत हरतर्हेच्या व्याधी व्यक्तीला होऊ शकतात़ त्याशिवाय मानवी चुकांमधून होणारे अपघात आहेत. नैसर्गिक आपत्ती आहेच. त्यामुळे जीव धोक्यात येण्याच्या अनेक घटना आहेत. अगदी जीव गेला नाही तरी वेदनांपासून मुक्तता तरी पीडित व्यक्तीला आपण देऊ शकतो ना? देवाने मनुष्याला दोन हात प्रदान केले आहेत. त्यातील एक हात मानवी मदतीसाठी असायला हवा. त्याला सहकार्य दुसऱ्या हाताने करावे. पाप-पुण्याच्या संकल्पना मानवी मनाशी निगडित आहेत. त्यामुळे एखाद्याला अडचणीत मदत करणं हे पुण्य आणि हे हातामार्फत होऊ शकतं.


पेचप्रसंगात अडकावं तसं ‘गुदमरणं’ हा प्रकार आहे़ घशात एखादी गोष्ट अडकली तर व्यक्ती कासावीस होते, पण एखादा माणूस गुदमरत असेल तर तो खोकत असेपर्यंत त्याल थांबवू नका. जर खोकून अडकलेली वस्तू बाहेर फेकली गेली नाही आणि रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला तर किंवा तो काळानिळा पडू लागला व तो बोलून सांगू शकत नसला, तर पटकन त्याला विचारा ‘तुमच्या घशात काही अडकले नाही ना?’ अशा परिस्थितीत गुदमरणारा माणूस डोके हलवून ‘हो’ म्हणू शकतो. पण तो बोलू शकत नाही. हा प्रश्न विचारणे अत्यावश्यक आहे. कारण, हृदयविकाराची लक्षणेदेखील गुदमरण्यासारखीच असतात़ पण त्यात रुग्ण बोलू शकतो. आपल्याला हे ओळखता आले पाहिजे की, रुग्ण गुदमरला आहे की त्याला हृदयविकाराचा त्रास सुरु झालाय. उपचाराची दिशा तुमच्यावर असेल जर तुम्ही हे ओळखू शकलात.


गुदमरलेल्या व्यक्तीला आपण प्रथमोपचार कसा देऊ शकतो?
- छातीवर दाब देणे. फक्त काही अतिदक्षता असेल तेव्हाच वापरा.
- रुग्णाच्या मागे उभे राहून तुमचे हात त्याच्या छातीच्या बाजूने हलकेहलके पुढे आणा.
- हातात हात एकात एक गुंतवा व अंगठ्याच्या भागाकडून रुग्णाच्या घशाच्या खाली व छातीवर दाबा.
- तुमचा जोर वाढवा व तुमचे हात बाहेरच्या बाजूला ओढा व वरच्या जबड्यावर आतबाहेर असा भार द्या़.
- ही पद्धत तोपर्यंत वापरा जोपर्यंत रुग्ण बेशुद्ध होत नाही वा जोरात अडकलेली वस्तू बाहेर पडत नाही.


हे सर्व करताना रुग्णाची शारीरिक आणि मानसिक अवस्था पाहा. त्याला धीर द्या. तुमच्या शब्दांमधून त्याचे मनोबल वाढेल. या संकटाला तुम्ही तोंड देऊ शकत नाही असे वाटले, तर रुग्णाला त्वरित डॉक्टरकडे नेणे उत्तम! उपरोक्त घटना कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच जीवनात कधीना कधी घडलेल्या असतात. मनुष्य अनुभवाने बरेच काही शिकतो. आपले मन खंबीर असेल, तर आपण कोणत्याही परिस्थितीतून निश्चितच राजमार्ग काढतो. म्हणून निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती ही काही काळासाठी असते. आपल्या अक्कलहुशारीने आपण त्यातून मार्ग काढावा. फावल्या वेळात नवीन-नवीन शिकून घ्यावे. कोणतेही ज्ञान कधीही फुकट जात नाही. संकटाच्या काळात कधी कुणाला त्याला उपयोग होईल, सांगता येत नाही.


- संजीव पेंढरकर


@@AUTHORINFO_V1@@