शरीराची हाक ऐका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
Health_1  H x W




आपले शरीर आपल्याला नेहमी पुढे येणार्‍या धोक्याची सूचना देत असते. आपण तिकडे दुर्लक्ष करतो. जर आपण आपल्या शरीराची भाषा समजून घेऊ शकलो, ऐकू शकलो तर आपण सहज निरोगी राहू शकतो. आपली चेतनाशक्ती ही कायम जागरूक असते. वेळोवेळी आपल्याला सावध करत असते. जसे आपण जेव्हा आगीजवळ हात नेतो, तेव्हा नैसर्गिकरित्या तो मागे ओढला जातो. खूप तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ गरम गरम खायला आपल्याला आवडतात खरं आहे ना! जेव्हा आपण खूप गरम किंवा खूप गार पदार्थ खातो, तेव्हा आपले तोंड बंद होत नाही ‘हाsssss...' असा सहजच आवाज येतो. तिखटाचं ही तसंच ‘संssss...' असा आवाज आपोआप निघतो. नाकातून, डोळ्यातून पाणी येतं, कानातून वाफा निघतात, घाम येतो. हे सर्व शरीराचे मिळालेले संकेत आहेत की, हे पदार्थ हानिकारक आहेत. आपण लक्ष देत नाही आणि खातोच. तसंच दातात काही अडकले असेल तर जीभ वारंवार त्या ठिकाणी जाऊन ते काढायचा प्रयत्न करते. डोळे थकले की आपोआप बंद होतात आणि बोटं नकळत त्यावरुन फिरु लागतात. बोटाला काही लागलं की ते आपोआप तोंडात जात यावरून सहज लक्षात येतं की, शरीर बाह्य किंवा आंतरिक त्रास दूर करण्याचा स्वतः प्रयत्न करीत असते. आपण त्यावेळी लक्ष देऊन शरीराची भाषा समजून घेऊन त्याला हवे ते केले, तर शरीराची स्वतःची ताकद आपोआप बरं होण्याची आपल्याला अनुभवास येते. त्यासाठी शरीराला थोडा वेळ देणे गरजेचे आहे.


बघा, ताप येण्यापूर्वी एक-दोन दिवस आधी अशक्तपणा जाणवतो. थकल्यासारखं, उदास वाटतं. झोपून राहावं, उठू नये असं वाटतं, पण तरीही आपण तिकडे लक्ष न देता औषध घेतो आणि आपलं काम करत राहतो. खरं म्हणजे शरीराच्या नैसर्गिकरित्या बरं होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणून आपण रोगाच्या दिशेने पाऊल टाकतो. याउलट औषध न घेता, गरम पाणी पिऊन पूर्ण आराम करून रसाहारावर राहिलो तर आपण ठणठणीत बरे होतो. पण, आज थांबायला वेळ कुणाला आहे? झटपट बरे होण्याच्या नादात औषध घेतो आणि झटपट जातो! पटतंय का? बर्‍याच वेळा आपल्याला खायची इच्छा नसते, पण समोर चमचमीत पदार्थ पाहून स्वतःला रोखू शकत नाही, हो ना? काही पदार्थ खाल्ल्यावर जळजळतं किंवा पोट फुगते, गॅसेस होतात. शरीर सूचित करत असते हे पदार्थ घातक आहेत. तिकडे आपण लक्ष देत नाही आणि पुढे जाऊन अल्सरसारखे आजार होतात. आज आपण बघतो आहोत मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे अचानक नाही उद्भवत. हळूहळू शरीरात साठत जाणार्‍या दूषित घटकांमुळे होतात, उद्भवतात. आपण वेळोवेळी आपल्याला होणारे त्रास दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, दुर्लक्ष करत असतो आणि परिणामांचा विचारच करत नाही. बघा, पायात गेलेला काटा वेळेवर काढला नाही, तर तो जसं आत आत पोखरत जातो तसंच आहे. आपण आपल्या शरीराचा अभ्यास केला त्याच्याकडे नीट लक्ष दिले, वेळच्या वेळी पथ्यं पाळली, एखाद्या दिवशी पोटाला पूर्ण आराम दिला, शरीर स्वच्छ ठेवले (म्हणजे जाहिरातीतले साबण वापरू नव्हे बरं का, तर आंतरिक स्वच्छता शरीर आणि मन दोन्हीची) तर शरीर नेहमीच निरोगी राहील.


या सर्वाला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे, आपली जीवनशैली. निरोगी जीवन ही खूप मोठी देणगी आहे. आपण पाहिले योग्य प्रमाणात आहार, निद्रा, व्यायाम आणि पाणी घेतले, तर आपण आपले जीवन जगण्याचा आनंद घेऊ शकतो. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला विविध प्रकारच्या परिपूर्ण आहारांची परंपरा लाभली आहे. फक्त आपण त्याची जोपासना करण्यात कमी पडलो आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करून घेतली. हवामानानुसार, ऋतूंनुसार आहार घेतला, तर कधी आजारी ही पडणार नाही आणि प्रतिकारशक्तीही क्षीण होणार नाही. याकरिताच आपल्या पूर्वजांनी काही नियम घालून दिले होते. ऋतुमानानुसार आहाराची योजना केली होती. अजीर्ण झाल्यास अन्नपचन होत नसल्यास जेवणापूर्वी आल्या-लिंबाचा रस सैंधव मीठ, ओवा आणि हिंग घालून तयार केलेले पाचक पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. लसणीची एक पाकळी कानदुखी, डोकेदुखी, दातदुखी दूर करण्यासाठी मदत करते. हेच आलं, लिंबू, ओवा, हिंग, लसूण, लवंग ‘पेनकिलर’चेही उत्तम काम करतात. बाळाचं पोट दुखत असेल तर ओवा खाऊन नाभीच्या ठिकाणी आणि बाजूला नुसती फुंकर घातली तरी बाळाला बरे वाटते. आज आपण फक्त ‘व्हिटॅमिन्स’वरच भर देतो, पण शरीरासाठी इतरही घटक महत्त्वाचे आहेत हे लक्षातच घेत नाही. म्हणून ज्यांना सहज शक्य असेल त्यांनी परिपूर्ण आहार घ्यावा. कसा तो पुढील लेखात पाहू.



- सीता भिडे





@@AUTHORINFO_V1@@