अशी ही कलियुगातील शबरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |


Urmila Chaturvedi_1 


श्रीराम मंदिरनिर्मितीसाठी गेल्या २८ वर्षांपासून निरंतर उपवास करणार्‍या ८१ वर्षीय आजीबाई उर्मिला चतुर्वेदी यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



॥नाही आला माझा राम, नाही पुरले माझे काम,
नाही आला मेघश्याम, नाही संपले माझे काम॥


 
त्रेतायुगातील शबरीची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी शबरीने वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली. त्रेतायुगातील परमेश्वराचा अवतार असणार्‍या रामांनी दर्शन देण्यासाठी स्वतः आपल्या घरी यावे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणार्‍या शबरीनेच भक्तीची खरी व्याख्या जगासमोर ठेवली. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणार्‍या या शबरीने जगाला दाखवून दिले की, निःस्वार्थ प्रेमाच्या जोरावर परमेश्वरालाही आपलेसे करता येते. देव भुकेला भावाचाअसे सर्वत्र प्रचलित आहे. शबरीचे जीवन पाहिल्यानंतर ही म्हण तंतोतंत खरी आहे, असे वाटते. रामाच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे खर्ची घालत आपली तपस्या निरंतर सुरू ठेवल्यानेच रामाची भक्त म्हणून शबरीची आज जगभरात ओळख आहे. शबरीने आपल्या निःस्वार्थ भक्तीने आणि निरंतर तपश्चर्येने तीन लोकांचा अवतार असणार्‍या रामालाही उष्टी बोरे खाण्यास भाग पाडल्याचा इतिहास आहे. रामभक्तांपैकी एक सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून शबरीची ओळख आहे. त्रेतानंतर द्वापरयुग लोटले. सध्या कलियुग सुरू आहे. तरीही शबरीची ओळख जगभरात कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या भक्तीचा महिमा गाताना शबरीची आजही आठवण काढली जाते, म्हणूनच बुधवारी दि. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याआधीही अशाच एका शबरीची आवर्जून आठवण काढली जात आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर या शहरातील विजयनगर येथे वास्तव्यास असणार्‍या ८१ वर्षीय उर्मिला चतुर्वेदी या आजीबाईंचा ‘कलियुगातील शबरी’ म्हणून आज सर्वत्र नावलौकिक असून, त्यांच्या या कार्याचे गोडवे सर्वत्र गायले जात आहेत. अयोध्येत पार पडणार्‍या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या शबरीची २८ वर्षांची तपश्चर्या फळाला येणार असून, वर्षानुवर्षे करत आलेल्या उपवासातून त्यांची अखेर सुटका होणार आहे. त्यांच्या या त्यागाची मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी दखल घेत अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. महत्त्वाच्या नेत्यांनीच त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याची दखल घेत कलियुगातील शबरीअसा त्यांचा उल्लेख केल्याने आजमितीस सर्वत्र त्या याच नावाने प्रसिद्धीस झाल्या आहेत.
 

 
उर्मिला चतुर्वेदी यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदूर येथे १ जानेवारी १९३९ साली झाला. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड होती. यासाठी पुराण, ग्रंथ, वेद आदींमधील ज्ञानाचे धडे घेण्यासाठी त्या लहानपणापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. चतुर्वेदी यांनी आपल्या जीवनात शिक्षणापेक्षाही अध्यात्मालाच महत्त्व दिले. अध्यात्माचा अभ्यास करणारी आपली ही आवड एके दिवशी आपले नावलौकिक करेल, असा विचार उर्मिला चतुर्वेदी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वप्नातही कधी केला नव्हता. अयोध्येतील ऐतिहासिक घटना यासाठी कारणीभूत ठरली. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढांचा हटवण्यात आल्यानंतर या जागेवर प्रभू श्रीराम मंदिरासाठी काम सुरू व्हावे, अशी इच्छा देशभरातील नागरिकांची होती. मात्र, दंगल उसळल्यानंतर या परिसरात कर्फ्यू तैनात करण्यात आला. राम मंदिरनिर्मितीचा मुद्दाही न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. आपल्याच देशात हिंदू धर्मीयांवर होणार्‍या या अत्याचाराविरोधात लढा उभारण्याचा निर्णय त्यावेळी चतुर्वेदी यांनी घेतला. राम मंदिराचा पाया रचल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही, अशी घोषणाच चतुर्वेदी यांनी केली. जोपर्यंत राम मंदिराचे भूमिपूजन होत नाही, तोपर्यंत फलाहार करून रामनामाचा जप करत उपवास करेन, अशी शपथ उर्मिला यांनी २८ वर्षांपूर्वी घेतली. आपल्या वयाच्या ५३व्या वर्षीच त्यांनी ही प्रतिज्ञा केली. १९९२ साली बाबरी मशिदीचा ढांचा पाडल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यानंतर हा प्रश्न सुटण्यास किती वर्षे लागतील याचे उत्तर अधांतरी असले तरी त्या आपल्या निर्णयावर कायम होत्या. अनेक लोकांनी नातेवाईकांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उर्मिला यांना बर्‍याचदा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला उपवास त्यांनी कायमच सुरू ठेवला. निरंतर २७ वर्षे उपवास केल्यानंतर २०१९ साली ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने प्रभू श्रीराम मंदिर निर्मितीचे आदेश दिल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याबाबचा निर्णय जाहीर होताच सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीशांसह यासाठी न्यायालयात बाजू मांडणार्‍या वकिलांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांनी शुभेच्छा दिल्या. अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करणार असल्याचे ऐकूनही त्यांनी आनंद व्यक्त केला. बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी उर्मिला चतुर्वेदी या दिवसभर राम नामाचा जप करणार आहेत. २८ वर्षांची त्यांची मेहनत फळाला आल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
 

- रामचंद्र नाईक

 

@@AUTHORINFO_V1@@