सुवर्ण दिन आज हा!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
Vijay joshi_1  





"अयोध्या" जिथे कधीच युध्द झाले नाही ती नगरी. पण आपलं दुर्दैव आपल्याला लढूनच तिथे हक्क मिळवावा लागला.


५०० वर्षाचा काळा इतिहास आता पुसला जाणार आहे.१९९० सालापासून हा लढा सुरु आहे. यासाठी न्यायालयीन लढाही द्यावा लागला, कासेवकांनी आत्मबलिदानही दिले. पण, आज राम भक्तांचा विजय झाला आणि तो सुवर्णक्षण समिप आला.


१९९० साली ऑक्टोबरमध्ये कारसेवकांचा एक जथ्था ठाण्याहून अयोध्येकडे रवाना झाला, मी ही एक कारसेवक म्हणून त्यात सामिल होतो. तेव्हा मी नुकताच सुरतहून परत ठाण्यात आलो होतो. कळव्यात रहात होतो आणि पातलीपाड्याला ‘गरवारे पेंन्टस्’ या कंपनीत नुकताच अधिकारी पदावर नोकरीला लागलो होतो. नोकरी नविनच म्हणजे कन्फर्मेशनही झालेले नव्हते. नुकतंच लग्न झालं होतं आणि माझा मुलगा सोहम तेव्हा फक्त दोन वर्षाचा होता. घरी वडिलधारं कोणीही नव्हतं. पण, अयोध्येची, रामजन्मभूमीची अनिवार ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.


पुष्पक एक्सप्रेसने अयोध्येसाठी प्रयाण करायचे होते. आम्ही सर्वजण कार्यालयात जमा झालो होतो. तेव्हा कार्यालय नाईक वाडीत होते. ठाण्याचे विद्यमान आमदार श्री.संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकूण नऊ जणं होतो. अॅ.श्री.सुभाष काळे, श्री.विद्याधर वैशंपायन, श्री.संजय घोलप, श्री.बेडेकर, श्री.खरे, कै.श्री.प्रदिप पुराणिक असे सर्वजण ठाणे स्थानकाच्या दिशेने निघालो. हातात "श्री राम" लिहिलेला भगवा झेंडा, कपाळावर "जय श्री राम" लिहिलेली फीत आणि तोंडाने श्री रामाचा जयघोष करत आम्ही ठाणे स्थानकात दाखल झालो.


माजी आमदार व सध्याचे भा.ज.प.चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री.मधु चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्याच गाडीतून मुंबईहून कारसेवकांचा एक जथ्था निघाला होता. आम्ही ठाण्यात त्याच गाडीत चढलो. पुढे प्रत्येक स्थानकात, कल्याण, इगतपुरी, नाशिक, जळगांव कारसेवक चढत होते आणि आमचे भव्य स्वागतही होत होते. स्थानकात कारसेवकांना निरोप द्यायला आलेले कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. "जय श्रीराम" या जय घोषाने अवघे वातावरण चैतन्यमय झाले होते.


सकाळी आम्हाला पक्षाकडून सूचना आली, की आपल्याला झाशीला उतरायचे आहे. त्यानुसार आम्ही झाशीला उतरलो. झाशी स्थानकाबाहेर मोठ्यासंख्येने आमच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमले होते. मोठ्या जल्लोशात आमचे स्वागत झाले. पण, आम्हाला पोलिसांनी अटक केली व जवळच्या एका पोलिस स्टेशनला नेण्यात आले. तिथे आमचे नांव व पत्ता याची नोंद करण्यात आली व राणी लक्ष्मीबाई या शाळेत स्थानबध्द करण्यात आले. आमची सर्व व्यवस्था, भोजन, चहा इ. तेथिल स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती, पण शाळेच्या आवारात आम्ही फिरत असू आवार मोठे होते. दिवसभर सतत रामनामाचा जप आणि भजन असा दिनक्रम होता.प्रचंडसंख्येने कारसेवकाना स्थानबध्द केले होते. शिवाय रोज स्थानिक कार्यकर्तेही उत्साहाने या भजनात सामिल होत असत. पुढे तीन दिवसांनी आमची स्थानबध्दतेतून सुटका झाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.


परत आल्यानंतर कंपनीतही माझे वरीष्ठ श्री.विश्वास नवरे, श्री.पि.टी.कुलकर्णी तसेच सहकारी श्री.रंजन गोटे, श्री.सुधिर जोशी, श्री.रामकृष्ण पुराणिक, श्री.अभ्यंकर व युनियन लिडर श्री.सदाशिव देशमुख यांनी माझं मनःपूर्वक स्वागत केलं, तसंच कौतुकही केलं. खरंतर माझी फारशी कोणाशी ओळखही नव्हती, मी नविनच होतो प्रोबेशन पिरीयेड सुरु होता. तरीही या कौतुकाचं मला नवल वाटलं आणि खूप आनंद झाला. पुढेतर आमच्या हेड ऑफिसपर्यंत, अगदी मा.श्री.चंद्रकांत गरवारे, कै.श्री.जयदीप गरवारे यांच्याही कानावर ही बातमी गेली आणि मला सर्वजण "आयोध्या जोशी" म्हणून ओळखू लागले. एकदा कै.श्री. जयदिप गरवारे कंपनीत आले असता, सर्वांशी ओळख करुन घेतांना ते म्हणाले "Are you Ayodhya Joshi?" खरंच खूप भरुन आलं आपली ही अशी नविन ओळख ऐकून.


घरी तर सोहम त्याच्या बोबड्या बोलाने "जय श्ली लाम", "मंदील वोही बनायेंगे", "ये तो बच एक झाकी हे." असं हातात एखादी लहानशी काठी घेऊन म्हणत असे.


आज खर्‍या अर्थानं कोठारी बंधूंना आदरांजली वाहिली जाते आहे आणि कारसेवकांचं व तमाम हिंदुंचं स्वप्न साकार होत आहे. माझ्या गरवारे पेंटस् मधले सहकार्‍यांनी फोन करुन, मेसेज करुन माझं आज अभिनंदन केलं तेंव्हा एक कारसेवक म्हणून माझे डोळे आनंदाश्रूंनी भरुन आले.


।।जय श्री राम।।



- विजय भगवंत जोशी
 
(शब्दांकन : नीलिमा जोशी)
@@AUTHORINFO_V1@@