कोरोना कहर (भाग-२०) कॅल्केरिया कार्ब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
health 3_1  H x




होमियोपॅथीमध्ये एका रोगाला ठराविक अशी औषधे नसतात, तर रुग्णाच्या लक्षणांच्या आधारे प्रत्येक रुग्णाचे औषध ठरते. आजाराच्या नुसत्या नावावरून औषधे दिली जात नाहीत, तर आजारी माणसाच्या लक्षणे व चिन्हांचा अभ्यास करून मगच औषध निवडले जाते. कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजारात जेव्हा अनेक केसेसचा अभ्यास केला जातो, तेव्हा काही औषधे प्रामुख्याने उपयोगी पडतात असे दिसून येते. याच यादीतील एक औषध म्हणजे ‘कॅल्केरिया कार्ब.’ (Calcarea Carb)


‘कॅल्केरिया कार्ब’ हे औषध कॅल्शियम कार्बोनेटपासून बनते. (नैसर्गिक कॅल्शियम कार्बोनेट) या औषधाचा मुख्य प्रभाव. हा पचनसंस्था, चयापचय क्रिया शरीरातील विविध ग्रंथी, तसेच हाडे व त्वचा यांच्यावर होत असतो. शरीरातील सर्व संस्थांच्या कामात येणारा संथपणा हे त्याचे मुख्य लक्षण आहे. हाडांची वाढ व विकासही सदोष पद्धतीने होतो. रुग्णाचे वजन वाढून स्थूलपणा येते. कारण, चयापचय क्रिया मंदावून अन्नाचे मेदामध्ये रुपांतर होते व त्यामुळे पोटाची घेरी वाढते. पण, त्यामानाने हात व पाय बारीक दिसतात. स्थूलतेमुळे रुग्णाला अतिशय घाम येतो.


श्वसनसंस्थेतील श्लेष्मापटलावर या औषधाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ज्या रुग्णाला हे औषध लागू पडते, अशा रुग्णांमध्ये सर्दी लवकर होण्याची प्रक्रिया दिसून येते. थंड व दमट वातावरणात रुग्णाला सर्दी होते व ताबडतोब सर्दी वाढून छातीमध्ये कफ तयार होतो व छाती भरून येते. क्षयरोगाच्या प्राथमिक पातळीवरील लक्षणे दिसून येतात.


तापामध्ये रुग्णाला सर्दी होते. नाकपुड्या सुकून कोरड्या होतात. सर्दीला खूप दुर्गंधी येते. पिवळट रंगाचा घट्ट स्राव नाकातून बाहेर पडतो. रुग्णाला पदार्थाचा गंध म्हणजेच वास येत नाही. सतत शिंका येत राहतात. त्यानंतर रुग्णाचा घसा खवखवायला लागतो. साधारणपणे सकाळी घसा जास्त खवखवतो. थोडेसे काम केले तरी रुग्णाला धाप लागायला लागते. खोेकून छातीत दुखायला लागते. वेदना पुढून पाठीकडे जातात. रुग्णाला अशक्त वाटू लागते. मुख्यत्वे छातीमध्ये थकवा व अशक्तपणा जाणवतो. तापात रुग्णाला फार थंडी वाजते. शरीर आतून गरम वाटते. परंतु, बाहेर थंडी वाजते, घाम येतो व शरीर थंड पडते.


आजारपणात रुग्णाला फार भीती वाटू लागते. मुख्यत्वे मृत्यूचे भय वाटू लागते. कुठूनही इतरांच्या आजाराची बातमी कळली तर रुग्ण अजून घाबरतो. तब्येतीची अतोनात काळजी घेतो. त्याला असे वाटू लागते की, कुठूनही येऊन आजार आपल्याला पकडेल. आजारी पडला की, हा रुग्ण गर्भगळीत होऊन जातो. त्याला सतत कोणीतरी सोबत पाहिजे असते. लहान मूल तर आईला सोडतच नाही. सतत आईच्या कुशीत वा मांडीवर झोपून राहते. सतत असुरक्षिततेची भावना मनात असते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी हे लोक सतत इतरांवर अवलंबून असतात. आत्मविश्वास अतिशय कमी असतो. सतत काहीतरी वाईट होईल की काय, या भीतीमध्ये हे लोक वावरत असतात. यांना सतत इतरांच्या मदतीची गरज वाटत राहते. तापामध्ये तर खूप घाबरतात. तापामध्ये रुग्णाला गोड खावेसे वाटते किंवा अंडी खावीशी वाटतात.


खालील गोष्टींनी रुग्णास त्रास होतो. जसे की,थंड व कोरडी हवा, अंघोळीनंतर, हवेत होणार्‍या बदलांचा रुग्णास त्रास होतो. मुख्यत्वे गरम हवेतून जेव्हा थंड हवेचा बदल होतो, त्यावेळी रुग्णाला त्रास होतो. शारीरिक व मानसिक श्रमामुळे रुग्णास थकवा येतो. पौर्णिमा त्रासदायक ठरते. उभे राहण्याने त्रास होतो. तसेच खालील गोष्टींनी रुग्णाला बरे वाटते. जसे की, कोरड्या वातावरणात रुग्ण सुखावतो. दुखर्‍या भागावर झोपल्याने रुग्णाला आराम वाटतो. शिंका आल्यावर रुग्णाला सर्दीपासून थोडासा आराम मिळतो. खाण्यानंतर रुग्णाला हुशारी वाटते.


वरील प्रकारची लक्षणे रुग्णामध्ये आढळल्यास ‘कॅल्केरिया कार्ब’ हे औषध त्या रुग्णाला लागू पडते. ‘कॅल्केरिया कार्ब’ हे अतिशय विस्तृत लक्षणे असलेले औषध आहे. त्याची अतिशय थोडक्यात मी माहिती दिली आहे. पुढील भागात आपण कोरोनाच्या या साथीबद्दल आपण उपयुक्त माहिती पाहूया.
 (क्रमशः)



- डॉ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@