लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या विचाराने कार्यरत सामाजिक संस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |


annabhau sathe_1 &nb

 


तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’, ‘गोवामुक्ती संग्राम’ या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचे आहे. माणूस जगला पाहिजे, माणुसकी जीवंत राहिली पाहिजे, न्याय जिंकला पाहिजे, अशी अण्णा भाऊंच्या विचारांची बैठक होती. त्या विचारांवर आज समाजात अनेक संस्था काम करत आहेत. त्यापैकी तीन संस्थांचा परिचय करून देत आहे.


जनार्थ संस्था, औरंगाबाद

 

अण्णा भाऊ साठे यांचे कार्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते पुढे घेऊन जात आहे. त्यापैकीच एक कार्यकर्ता कौशल्या गाडे. जिल्हा औरंगाबाद, तालुका ढोंले इथल्या कौशल्या गाडे यांचा जीवनसंघर्ष आणि त्यातून त्यांनी केलेले कार्यही हे महत्त्वाचे आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिका शोभावी असा कौशल्या यांचा संघर्ष. अण्णा भाऊंच्या विचारांनी प्रेरित होऊनच त्या आयुष्य जगत आहेत. किती संकटे उभी राहिली तरी त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. त्यांनी आपलं सामाजिक कार्य सुरूच ठेवले. या गावातील लोकसंख्या १५ ते २० हजारांपेक्षा कमी आहे. तरीदेखील समस्या भरपूर आहे. ही समस्या कोण सोडवणार? त्या समस्या आपल्या आपल्यालाच सोडवाव्या लागतील हे कौशल्या यांनी ओळखले. त्यामुळे २००१ साली कौशल्या यांनी ‘जनार्थ’ सामाजिक संस्थेची स्थापना केली. या गावातील महिलांचे जगणे म्हणजे केवळ ‘चूल आणि मूल’. या गावात महिलांचे सक्षमीकरण करणे गरजेचे होते. महिला संघटना बनविण्यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या. समाजातील लोकांनी विरोध केला. गावाच्या दबावाला बळी पडून घरातल्या लोकांनीही त्यांना विरोधच केला. मात्र, कौशल्या यांनी महिलांना संघटित केलेच. घरगुती हिंसा, गावातील इतर पातळीवरचा अन्याय याविरोधात संघटितपणे आवाज उठवला. पण, त्याची जबर किंमत कौशल्या यांना मोजावी लागली. गावातल्या काही प्रस्थापितांनी त्यांच्यासकट त्यांच्या कुटुंबावर खोटी पोलीस केस टाकली. जवळ जवळ दहा महिने त्या तुरुंगात राहिल्या. पण, तुरुंगातदेखील त्या शांत बसल्या नाहीत. तुरूंगात सोबत असलेल्या महिलांचे त्यांनी समुपदेशन केले. त्यांना धीर दिला. तुरूंगातून सुटल्यावर नवे आयुष्य जगण्याचे बळ दिले. तसेच त्यांचे पुन्हा समाजात कसे पुनर्वसन करता येईल, महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली. जेलमधील समस्या जेलप्रमुखपर्यंत पोहोचू लागली.

 

त्यानंतर त्यांची शिक्षा पूर्ण झाली. तुरुंगातून पुन्हा गावाकडे आल्या तेव्हा, त्यांना दिसले की, गावातल्या समस्या अधिकच बिकट झाल्या आहेत. पाण्याची समस्या सर्वात मोठी होती. पाणी मिळविण्यासाठी तीन ते पाच किलोमीटरवर चालत दुर जावे लागे. कौशल्या यांना कळले की, केंद्र सरकारने गावाला पाईपलाईन टाकण्यासाठी ३ लाख, ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पण, गावात तर पाईपलाईन टाकलीच नव्हती. मग, हा पैसा गेला कुठे? ही तपासणी करण्यासाठी माहितीच्या आधिकाराचा उपयोग करून कौशल्या यांनी पंचायत समितीच्या बैठकीत आवाज उठवला. हे सर्व प्रकरण गावातील नागरिकांना समजले. यासाठी तालुकास्तरावर तातडीने बैठक घेण्यात आली. दहा दिवसांत हे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिला. त्यामुळे गावातले पाण्याचे काम सुरू झाले. पण, त्यानंतर कौशल्या यांंचा अपघात झाला. हा अपघात म्हणजे विरोधकांचा हल्लाच होता. यामध्ये कौशल्या यांना अपंगत्व आले. पण, त्या खचल्या नाहीत. आज त्या नवी मुंबई येथील ‘भूमी’ नावाच्या सामाजिक संस्थेत त्या कार्यरत आहेत. सकारात्मक सामाजिक बदल घडावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, त्यासोबत कौटुंबिक बदल घडवून आणणेही गरजेचे आहे. तेव्हाच सामाजिक परिवर्तन घडवून येईल, अशी आशा कौशल्याताई व्यक्त करतात.

 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि सुनील खंडाळे, पुणे

 

‘विद्यानगरी’ म्हणून पुणे या शहराची ओळख करून दिली जाते. या शहरात मातंग समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विकास करता यावा म्हणून अण्णा भाऊ साठे ‘मॅटन्स चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ या सामाजिक संस्थेच्यावतीने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या सामाजिक संस्थेच्यावतीने विविध प्रकारसे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील तरुण मुलांना याचा मोठा फायदा झाला. २००४ मध्ये शिक्षणामध्ये मुलांना गोडी निर्माण करण्यासाठी ‘बॅक टुऊ स्कूल यशोदा’ या उपक्रमामार्फत कार्य सुरू केले. त्याचा परिणाम म्हणून शाळेतली विद्यार्थ्यांची गळती थांबली. महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता त्यांनी उद्योगाची संकल्पना साकारली. त्यामुळे महिलांना मसाले, अगरबत्ती इत्यादींचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले. अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा घराघरात प्रसार झाला पाहिजे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या सोबत अण्णा भाऊ साठेंच्या विचारांवरच्या पाच हजार कॅसेट तयार करून मोफत वाटण्यात आल्या.

 

कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून ३५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १३५० लोकांनी त्यांचा फायदा घेतला. पाच हजार लोकांना मोफत मास्कचे वाटप केले. ११०० लोकांना मोफत धान्याचे वाटपदेखील करण्यात आले. दोन हजार लोकांना मोफत सॅनिटायझर दिले. स्वारगेट येथे अभ्यासिका सुरू करण्यात आली. येथे १३० विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत. समतेचा प्रसार करण्यासाठी अण्णा भाऊ आयुष्यभर झटले. समतेचा, माणुसकीचा पुरस्कार त्यांनी केला. ही समता आणि न्यायपूर्ण वातावरण समाजात निर्माण करण्यासाठी सुनील खंडाळे काम करत आहेत.

 

अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ, मुंबई

 

हसरा चेहरा आणि सर्वांना मदत करणारे, मदत मागण्या अगोदरच मदत देणारे संतोष थोरात. माणसातली माणुसकी प्रत्येकानी चांगले जीवन जगावे, माणसाने जगावे पण चांगल्या मनाने. या अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणादायी विचारांवर त्यांचे समाजकार्य सुरू आहे. वस्तीपातळीवरील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून त्यांनी जय अंबेनगर, गोवंडी, मुंबई येथे ‘प्रथम’ नावाची अभ्यासिका सुरु केली. या कार्याला कुणाचीही मदत नसताना त्यांनी हे मोठे कार्य सुरू केले. संतोष सांगतात की, ”लहानपणापासून मला शिक्षण मिळाले नाही. माझे स्वतःचे शिक्षण ७ पर्यंत झाले. घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी घराची जबाबदारी स्वीकारली. काम करताना तीन वेळा मृत्यूच्या दारातून परत आलो. कदाचित मला समाजासाठी चांगले काम करण्यासाठी देवाने मला जीवन दान दिले असावे.” घरातील आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणून संतोष यांनी लहानपणीच व्यवसाय सुरु केला. अपार कष्ट केले. पेपसीच्या बाटल्या विकण्याचा धंदा केला. पण त्यातून काहीच अर्थाजन होत नसे. एक वेळचे खायलाही मिळत नसे. मग त्यांनी दारुच्या अड्ड्यावरही काम केले. तरीही परिस्थिती साथ देत नव्हती. मग शेवटी चहाचा व्यवसाय व्यवसाय सुरू केला. पण उधारींने तोटाच होई.

 

जगायचे कसे? चांगले काम मिळण्यासाठी तर शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मग संतोष यांनी मुक्त विद्यापीठामधून बी.ए, प्रवेश घेतला. पण पाठ्यपुस्तकात शिकवली जाणारी समाज व्यवस्था आणि वास्तव यात त्यांना अंतर जाणवले. त्यातच आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडावे लागले. पण त्यावेळी त्यांनी एक ठरवले की, समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. त्यामुळे त्यांनी अभ्यासिका सुरु केली. आज त्यांच्या अभ्यासिकेत एकूण ३५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. ही नुसती अभ्यासिका नाही. मुलांना शाळेत जाण्या अगोदर ‘रोटी बँके’च्या मदतीने पोटभर अन्न दररोज दिले जाते. संतोष प्रत्येक दिवाळीला २५० मुलांना नवीन कपडे देतात. संतोष सांगतात, “मी अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी वाचली, तेव्हा माझ्या जीवनात सामाजिक परिवर्तन झाले. तेव्हापासून मी लोक कल्याणसाठी प्रयत्न करत आहेत.”

 

मन हे प्रत्येकाचे वेगळे असते,पण त्यामध्ये असावी लागते माणुसकी, हे संतोष भाऊनी सामाजिक परिवर्तनातून दाखवून दिली. ‘माणुसकी’ म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे माणसातील माणूस निस्वार्थीपणे ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. या माणुसकीसाठी संतोष काम करतात. त्यांनी वनवासी आणि वडार समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली. आज त्यांच्या अभ्यासिकेमधली पहिली पिढी शिक्षण क्षेत्रात ८० ते ९० टक्केने पास झाली. संतोष यांचे हे कार्य म्हणजे लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तची खरी आदरांजली आहे. अण्णा भाऊंच्या विचारांवर काम करणाऱ्या शेकडो संस्था आहेत. या संस्थांनी, व्यक्तींनी अण्णा भाऊंची विचारज्योत तेवत ठेवली आहे.

 

- डॉ. राहुल जैनर

 
@@AUTHORINFO_V1@@