घराण्याचीच चाकरी हवी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |
Rahul Sanjay_1  






नाकर्त्या राहुल गांधींकडे पाहिले की, पक्षाच्या चिंधड्या उडण्याचीच जरा जास्त खात्री वाटते आणि यातून काँग्रेसचा उरला सुरला सांगाडाही लवकरच नष्ट होऊन जाईल, हेही समजते. तथापि, संजय राऊत यांना हे कसे कळणार आणि कळले तरी ते कसे वळेल? ते वास्तवाकडे डोळेझाक करुन घराण्याच्या वारसालाच मसिहा ठरवणार.



‘राहुल गांधींना रोखल्यास काँग्रेस संपेल,’ असे ‘रोखठोक’ भाकित शिवसेनेचे वाचाळवीर खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतेच केले. काँग्रेसमध्ये गांधी-नेहरु परिवाराचे नाव घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवणारे लाचार आणि गांधी-नेहरु परिवारापायी सगळेच संपले तर आपले भवितव्य काय, या भयाण चिंतेने ग्रासलेल्यांत नेतृत्वसंघर्ष सुरु आहे. त्यावरुन गेल्याच आठवड्यात काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत खडाजंगी होऊन अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींनाच पुन्हा एकदा सूत्रे हाती घ्यावी लागली आणि यापुढे त्या पक्षाचे जे काय व्हायचे ते होईलच. मात्र, ‘काँग्रेसला राहुल गांधीच वाचवू शकतील,’ असे भविष्य वर्तवत राऊत यांनी मालक कोणीही असो, आपण त्यांच्या पखाल्या वाहण्यात हात जोडून उभे असल्याचेच दाखवून दिले. कोरोनाच्या भीषण आपत्तीतही मुलाखत-मुलाखत खेळणार्‍या राऊतांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट जागतिक आरोग्य संघटनेचा मार्गदर्शक करुन टाकले होते. तेव्हा पगारवाढीसाठी मालकाला खूश करणार्‍या लोचट चाकराची उपमा संजय राऊत यांना समाजमाध्यमांतून दिली गेली. कारण, राऊतांनी पक्षप्रमुखांची कौतुकस्तुती करण्यात कसलीही कसर सोडली नव्हती, तसलेच काम ते आता राहुल गांधींचे नाव घेऊनही करत असल्याचे दिसते. अर्थात, जनतेने लाथाडलेल्यांच्या पायाशी लोळण घेत शिवसेनेने सत्ता मिळवल्याने संजय राऊतांना राहुल गांधींची ‘महापुरुष’ म्हणून कवने गाणे भागच आहे. मात्र, जिथे असंगाशी संग केल्याने विद्यमान शिवसेना पक्षप्रमुखांनाच आपल्या भवितव्याचा अतापता नाही, तिथे राऊतांनी राहुल गांधींनी काँग्रेसची कमान हाती न घेतल्यास पक्ष संपेल असे म्हणणे म्हणजे आपल्या पायाखाली काय जळतेय ते पाहायचे सोडून नसती उठाठेव करण्यासारखेच.


दरम्यान, खुर्चीसाठी मतदारांशी, हिंदुत्वाशी व भाजपशी दगाबाजी करुन नवी सोयरीक जुळवल्याने ती निभावण्याचे काम शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने करत आहेत. मात्र, राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा गांधी परिवार व त्यांच्या ताब्यातील काँग्रेसमध्ये त्यामुळे अजिबात फरक पडत नसतो, सुधारणा होत नसते. उलट ज्यांच्या कर्तृत्वामुळे पक्षाची वाताहत झाली, त्यांचीच प्रशंसा केल्याने आणखी चिंधड्या उडण्याचाच धोका बळावत असतो. नाकर्त्या राहुल गांधींकडे पाहिले की त्याची जरा जास्तच खात्री वाटते आणि यातून काँग्रेसचा उरलासुरला सांगाडाही लवकरच नष्ट होऊन जाईल, हेही समजते. तथापि, राऊत यांना हे कसे कळणार आणि कळले तरी ते कसे वळेल? ते वास्तवाकडे डोळेझाक करुन घराण्याच्या वारसालाच मसिहा ठरवणार. काँग्रेस गांधी घराण्याची वैयक्तिक मालमत्ता आहे, असेच संजय राऊत यातून सांगत आहेत. त्याचेही कारण आहे, ते म्हणजे राऊत स्वतःदेखील अशाच घराण्याच्या मालकीच्या पक्षात आहेत. तिथेही पक्षप्रमुखपद असो वा सत्तेचा वाटा असो, तो फक्त घराण्याच्या वारसांनाच मिळत असतो आणि यापुढेही मिळणार. काँग्रेसला राहुल गांधीच वाचवू शकतात, तसेच शिवसेनेवरही भावी काळात केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंचाच ताबा असेल, असे त्यांना म्हणायचे आहे. नुकताच शिवसेनेच्या संजय जाधव या परभणीच्या खासदाराने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होत राजीनामा दिला. तो राजीनामा पक्षप्रमुख मंजूर करतील न करतील, हा भाग वेगळा, पण तुमची कामे होत नसतील, मित्रपक्ष कुचंबणा करत असतील, तरी ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही ते सहन करणे भाग आहे, असेही संजय राऊत यांना यातून सुचवायचे असेल. जसे राहुल गांधींनी पक्ष रसातळाला नेला तरी त्यांनी पक्षाचे नेतृत्व न केल्यास काँग्रेस संपेल, असे राऊत म्हणतात, तसाच्या तसा प्रकार आपल्या पक्षालाही लागू होतो आणि हे इतरांनी लक्षात ठेवावे, हे सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.


पक्ष नेतृत्वासाठी राहुल गांधीच योग्य असल्याचे सांगताना संजय राऊत यांनी गांधी घराण्याने काँग्रेससाठी रक्त सांडल्याचा शीळापाका दाखलाही दिला. तसेच राहुल गांधींव्यतिरिक्त अन्य कोणात पक्ष चालवण्याची कुवत नसल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, पूर्वजांनी बलिदान देऊन पक्ष वाढवल्यावरुन आजच्या पिढीची कर्तबगारी ठरत नसते. तो भूतकाळ झाला आणि आजचा वर्तमानकाळ त्या पुण्याईवर वाटचाल करणारा नाही, तर स्वतः कर्तृत्व गाजवण्याचा आहे. पण, राहुल गांधींनी २०१९ची लोकसभा निवडणूक असो वा विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका असो, प्रत्येकवेळी आपण लायक नसल्याचेच दाखवून दिले. सुदृढ लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष असणे गरजेचे असते, तर राहुल गांधी यांनी ती भूमिका वठवण्यासाठीही कधी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. काँग्रेसची संघटना बांधण्यात, वाढवण्यात ते जसे अपयशी ठरले तसेच मागील सहा वर्षांत त्यांनी केंद्र सरकारला केवळ विरोधासाठी विरोध केला. मुद्द्यांच्या वा तत्त्वाच्या आधारे सरकारवर टीका करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा आकस, द्वेष आणि देश आमचाच या अहंकारापायी राहुल गांधींनी तोंड उघडले. ट्विटरवरुन ट्विट करायचे वा एखादा सत्य आणि तथ्याचा लवलेश नसलेला व्हिडिओ प्रदर्शित करायचा, यालाच त्यांनी पक्षकार्य, विरोधकांचे कर्तव्य मानले. म्हणूनच राहुल गांधी पक्षाला निवडणुका जिंकवून देण्यात जसे अयशस्वी झाले तसेच ते विरोधक म्हणूनही अयशस्वीच ठरले. तेव्हा संजय राऊत यांनी अशा व्यक्तीलाच पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वपदी आणण्याची वकिली करणे म्हणजे मूर्ती नाही, पण घरचा धोंडा असल्याने माथा टेकवा असे सांगण्यासारखेच. दरम्यान, राहुल गांधींना रोखल्यास काँग्रेसचे काय होईल, त्याचा विचार करण्यापेक्षा राऊतांनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलेले बरे. कारण, ‘डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते’ आणि यासारख्याच अनेक वक्तव्यांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी सुत जुळवल्यानंतर जनमनातून उतरलेल्या शिवसेनेचा आलेख आणखी ढासळत असून संजय राऊतांना न रोखल्यास तिची अवस्था नक्कीच काँग्रेससारखी किंवा त्यापेक्षाही वाईट होईल.





@@AUTHORINFO_V1@@