‘कोरोना’ आणि मानसिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |
2_1  H x W: 0 x



कोरोनाच्या साथीमुळे समाजात जो भयगंड (fear factor) तयार झाला, त्याचा संधीसाधू लोकांनी लगेच फायदा घेण्यास सुरुवात केली. बाकीच्या व्यवसायांबद्दल माहिती नाही. परंतु, वैद्यकीय व्यवसायाबद्दल मी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की, लोकांच्या मनातील भीती व भयगंड हा वैद्यकीय व्यवसायाला अतिशय पूरक ठरतो. जगातील प्रत्येक माणसाला स्वत:च्या तब्येतीची काळजी असते. प्रत्येकजण मृत्यूला घाबरतो. प्रत्येकाला असे वाटत असते की, आपल्याला काहीही आजार होऊ नये. प्रत्येकाला असे वाटते की, आपण जास्तीत जास्त वर्षे तरुण राहावे, दिसावे. थोडक्यात काय तर, प्रत्येकजण तब्येतीच्या व आरोग्याच्या बाबतीत आत्मकेंद्री असतो आणि याचाच फायदा औषधे व प्रसाधने, निर्माण करणाऱ्या कंपन्या घेतात. काही अपप्रवृत्ती जोपासणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व अपप्रवृत्ती बाळगणाऱ्या डॉक्टरांच्या संगनमताने मग या औषध निर्माण करणाऱ्या काही कंपन्या आजारांचा बागुलबुवा तयार करतात व त्यानुसार अनेक प्रकारची औषधे लोकांच्या माथी मारत राहतात. या मागे त्यांचे भरपूर अर्थकारण असतो.


यासंदर्भात एक उदाहरणच द्यायचे तर अगदी साधे उदाहरण पाहूया. टीव्हीवरील जाहिरातीत आपण पाहतो की, मूल लहान असले की, त्याच्या वाढीसाठी कॅल्शियम द्या, असे सांगतात. मूल वयात यायला लागले की, त्याला हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम द्या, असे सांगतात. तसेच, पूर्वी दूरदर्शनच्या जमान्यात एक साधारण ५० वर्षांची स्त्री जाहिरातीत सांगत असे की, ‘हाडे ठिसूळ होऊ नयेत, म्हणून मला कॅल्शियमची गरज आहे,’ कालांतराने दुसऱ्या एका जाहिरातीत एक ४० वर्षांची महिला सांगत असे की, ‘आता ४० वर्षांची झाल्यामुळे मला कॅल्शियमची गरज आहे.’ आता हल्ली जाहिरातीत एक ३० वर्षांची मुलगी सांगते की, ‘आता मी ३० वर्षाची झाले व हाडे ठिसूळ होऊ नयेत, म्हणून मला कॅल्शियमची गरज आहे.’ म्हणजेच थोडक्यात काय, तर तुम्ही आयुष्यभर उगाचच कॅल्शियम खात राहा व आमचा फायदा करा, असाच या कंपन्यांचा मनसुबा असतो. खरेतर सकस आहार, भाज्या, फळे, कडधान्ये, दूध, मांसाहारी पदार्थ यामध्ये सर्व प्रकारची प्रथिने, क्षार व जीवनसत्वे असतात. परंतु, सर्वांच्या मनात असे बिंबवण्यात येते की, जर तुम्ही ही बाहेरुन तयार केलेली औषधे खाल्ली नाहीत, तर तुमचे आरोग्य धोक्यात येईल, अशाप्रकारे भयगंड मनात तयार केल्यामुळे प्रत्येकजण उठसूठ औषधे खात असतात. म्हणूनच केमिस्टच्या दुकानात नेहमी प्रचंड गर्दी असते. संपूर्ण सकस आहार न खाता लोकही औषधे खाणे पसंत करतात व तिथेच या कंपन्यांचा डाव सफल होतो.


टीव्हीवर त्वचेला गोरेपणा देणाऱ्या क्रिमची जाहिरात तर अगदी ठरलेली. हे क्रिम जर खरच उपयुक्त असते, तर जगात कुठेही कृष्णवर्णीय लोकच राहिले नसते. पण, कुठेतरी याची जाणीव असूनही, आपण या फसव्या जाहिरातींना बळी पडतो व ही उत्पादने खरेदी करुन आपलेच नुकसान करत असतो.


कोरोनाच्या या साथीमध्ये लोकांच्या मनात तयार झालेल्या भीतीचा या कंपन्यांनी आणि काही अपप्रवृत्तीच्या डॉक्टर व रुग्णालयांनी फायदा न घेतला तर नवलच. पुढील भागात आपण या भयगंडावरच माहिेती घेणार आहोत.
(क्रमश:)



- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.) 



@@AUTHORINFO_V1@@