अलविदा प्रणवदा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |
Pranab Mukharjee_1 &

 


भारताचे तेरावे महामहिम राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर असताना जुलै २०१२ ते जुलै २०१७ या पाच वर्षांच्या कार्यकाळात ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचं, एकसंघतेचं आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेललं होतं, त्याचप्रमाणे १९६९ सालापासूनची पुढली ३७ वर्षे संसदभवनाच्या दोन्ही सभागृहात ज्यांनी सातत्यानं आपल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आणि कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली होती, असे प्रणव मुखर्जी आता आपल्यात नाहीत!

 
 
प्रणव मुखर्जी हे अवघ्या ३४ वर्षांचे तरुण असताना, १९६९ सालच्या जुलै महिन्यात पश्चिम बंगालमधून राज्यसभेची निवडणूक जिंकून जेव्हा दिल्लीला आले होते, तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था राष्ट्रपती भवनालगतच्या ‘साऊथ अव्हेन्यू’वर अशा ठिकाणी केलेली होती, जिथून त्यांना राष्ट्रपती भवनातल्या घोड्यांची पागा दिसत असे. राष्ट्रपतींच्या सेवेत असलेल्या सांडणीस्वारांच्या त्या रुबाबदार घोड्यांची किती काळजी घेतली जाते, त्यांची एकूणच कशी चंगळ असते, ते प्रणव मुखर्जी नेहमीच आपल्या बाल्कनीत बसून न्याहाळत असत. त्या घोड्यांची ती ऐट पाहून एकदा ते मिश्कीलपणे आपल्या बहिणीला, अन्नपूर्णाला म्हणाले, “दीदी, पुनर्जन्म ही गोष्ट खरी असेल, तर मला पुढला जन्म राष्ट्रपती भवनातल्या अश्वपथकाचा अश्व म्हणून घ्यायला नक्की आवडेल!” त्यावर ती हसली आणि उत्तरली, “अरे दादा, तू तर याच जन्मी राष्ट्रपती भवनात जाणार आहेस आणि तेही प्रत्यक्ष राष्ट्रपती होऊन!” त्यांच्या बहिणीचे ते वेड्या मायेपोटी काढलेले उद्गार तब्बल ४३ वर्षांनी तंतोतंत खरे ठरले होते!


प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ २५ जुलै, २०१२ रोजी पूर्ण होत असल्याने त्या सर्वोच्च पदासाठी सत्ताधारी काँग्रेस आणि अन्य डाव्या पक्षांच्या आघाडीने ‘युपीए’ने माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव जेव्हा निश्चित केलं, तेव्हा त्या विरोधात भाजप आणि अन्य पक्षांच्या आघाडीनं ‘एनडीए’ने पूर्व लोकसभा अध्यक्ष पूर्णो संगमा यांचं नाव जाहीर केले. त्यावेळी शिवसेना ही मात्र प्रणव मुखर्जी यांच्या बाजूने उभी असेल असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बेधडक जाहीर केल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी मुंबईच्या आपल्या दौर्‍यात १३ जुलै २०१२ रोजी शरद पवार यांच्यासमवेत ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुखांची सदिच्छा भेट घेतली. बंगालचा ‘रॉयल टायगर’ आणि ‘महाराष्ट्राचा ढाण्या वाघ’ यांची ती ग्रेट भेट होती, असंच जणू ते चित्र होतं. संविधानानुसार निवडणूक पार पडली. प्रणव मुखर्जी हे त्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून देशाचे तेरावे राष्ट्रपती झाले. प्रणव मुखर्जी यांचा पाच वर्षांचा तो कार्यकाळ तसा आव्हानात्मक राहिला. कारण, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं होतं, त्याच ‘एनडीए’ने दोन वर्षांनी २०१४ साली भाजपच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन केली होती. तरीही काँग्रेसशी कायम एकनिष्ठ राहिलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कधी संघर्ष झाल्याचं चित्र दिसलं नाही. प्रणव मुखर्जी यांनी जेव्हा राष्ट्रपतीपदाचा कारभार हाती घेतला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तींचे दयेची याचना करणारे काही अर्ज त्यांच्या कार्यालयात फार आधीपासूनच निर्णयाअभावी पडून होते. त्यातच त्यांच्या कार्यकाळात नव्या दया अर्जांचीही भर पडली होती. अफझल गुरु आणि अजमल कसाब यांचे दयायाचना अर्ज त्यात होते. प्रणवदा यांनी एकूण ३४ पैकी ३२ अर्ज फेटाळून लावले आणि त्या ३२ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फर्मावलेली फाशीची शिक्षा अंमलात आणण्याचा मार्ग सुकर केला. अफझल गुरु आणि अजमल कसाब हे तेव्हाच फाशी गेले. प्रणवदा यांनी २५ जुलै, २०१७ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रं रामनाथ कोविंद यांच्या हाती सोपवली, तेव्हा दयेचा एकही अर्ज त्यांनी निर्णयाविना मागे शिल्लक ठेवला नव्हता!


प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालमधल्या वीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूरजवळच्या मिर्‍हाटी नावाच्या अगदी लहानशा खेड्यात ११ डिसेंबर, १९३५ रोजी जन्मले होते. त्यांच्या मातोश्री राजलक्ष्मी या पूर्व बंगालमधल्या होत्या आणि स्वतंत्रता संग्रामात गांधीजींच्या चळवळीत अग्रभागी राहिलेल्या त्या स्वतंत्रता सेनानी होत्या. प्रणव मुखर्जी यांचे पिताश्री कामदा किंकर मुखोपाध्याय अर्थात के. के. मुखर्जी हेही काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. १९५४ ते १९६४ या काळात ते पश्चिम बंगाल विधान परिषेदेत आमदार होते. प्रणवदा यांच्यावर गांधीजींच्या विचारांचे संस्कार त्यांच्या आईवडिलांमुळे झाले होते. रवींद्रनाथ टागोर यांचं ‘शांतिनिकेतन’ त्यांच्या गावाजवळच होतं. टागोरांच्या प्रगल्भ विचारांचा आणि साहित्याचा प्रभाव प्रणवदा यांच्यावर बालपणापासून होता. वीरभूम जिल्ह्यातल्या सुरी येथील विद्यासागर कॉलेजमधून ते पदवीधर झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी ‘अर्थशास्त्र’ आणि ‘राज्यशास्त्र’ या दोन विषयात एम. ए. केलं. कायद्याची पदवीदेखील त्यांनी प्राप्त केली. सुरुवातीला ते डाक आणि तार खात्याच्या अकाऊंटंट जनरलच्या कचेरीत अप्पर डिव्हिजन क्लार्क होते. काही काळ त्यांनी २४ परगणा जिल्ह्यातल्या ईश्वरचंद्र विद्यासागर कॉलेजमध्ये अध्यापन केलं. त्याशिवाय कोलकात्याहून प्रकाशित होत असलेल्या ‘देशेर डाक’ या बंगाली नियतकालिकासाठी ते लिहीतही असत. मिदनापूर मतदारसंघाच्या १९६९ सालच्या पोटनिवडणुकीत, माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांनी त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. त्या सभांमधून प्रणवदा यांनी अस्खलित बंगालीत ओजस्वी भाषणं करताना आपल्या अभ्यासू वृत्तीची आणि अमोघ वक्तृत्त्वाची चुणूक दाखवून सगळ्यांनाच चकित केलं. खुद्द इंदिराजीदेखील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी त्याच वर्षी प्रणवदांना थेट राज्यसभेवर निवडून आणलं. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय प्रवासाला तेव्हा खर्‍या अर्थानं सुरुवात झाली. दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात त्यांचा प्रभाव दिसू लागला.


इंदिरा गांधी यांनी त्यांना १९७३ साली आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात प्रणवदांना औद्योगिक विकास खात्याचं उपमंत्रिपद दिलं. १९७९ साली ते काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतले उपनेते झाले. वर्षभरानंतर १९८० साली ते राज्यसभेतल्या काँग्रेस पक्षाचे नेते झाले. १९८० पासून पुढील दोन वर्षे ते वाणिज्य खात्याचे केंद्रीय मंत्री होते. १९८२ साली त्यांनी प्रथमच भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. संसदेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी केलेलं तर्कशुद्ध विवेचन हे त्यांचा अर्थकारणाचा अभ्यास किती गाढा होता, याचंच द्योतक होतं. ‘इट वॉज द लाँगेस्ट बजेट स्पीच डिलिव्हर्ड बाय द शॉर्टेस्ट फायनान्स मिनिस्टर’ असं इंदिराजी त्यावेळी विनोदानं म्हणाल्या होत्या. कारण, प्रणवदा हे अवघ्या पाच फूट एक इंच उंचीचे वामनमूर्ती होते. ते अर्थमंत्री असतानाच्या काळात भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रथमच भरघोस कर्ज मिळालं. ज्यामुळे अनेक सरकारी प्रकल्प मार्गी लागू शकले. ते अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. न्यूयॉर्कमधून प्रसिद्ध होत असलेल्या ‘युरोमनी’ या अर्थ-वाणिज्यविषयक नियतकालिकानं केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रणव मुखर्जी यांना १९८३-८४ सालचे जगातले सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं. त्याचवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी इंदिराजींची हत्या झाली. त्यावेळी प्रणव मुखर्जी आणि राजीव गांधी हे पश्चिम बंगालचा दौरा करत होते. हत्येची बातमी कळताच दोघेही एकमेकांसोबत तातडीने दिल्लीला आले. प्रणवदा हे इंदिराजी यांचे उजवे हात होते. त्यांची इंदिरानिष्ठा वादातीत होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्यानंतर पंतप्रधानपद त्यांच्याकडे जाईल, असं इतरांप्रमाणे त्यांनाही नक्कीच वाटत होतं. तथापि, त्यांच्या नावाचा विचारही झाला नाही. काँग्रेस पक्षानं इंदिराजी यांचे चिरंजीव, राजीव गांधी यांना पंतप्रधान केलं. त्यामुळे प्रणवदा यांची पंतप्रधान होण्याची दुसरी संधी हुकली. राजीवजी यांच्या नव्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे ते दुखावले आणि काँग्रेसपासून दुरावले. १९८६ साली त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला, मात्र त्याला जनाधार मिळाला नाही. कालांतरानं राजीव गांधी आणि प्रणवदा यांच्यात मनोमिलन झालं. प्रणवदा काँग्रेसमध्ये परतले. १९९१ साली सोनिया गांधी यांनी जेव्हा पंतप्रधानपद नाकारलं, तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्याकडे ते चालून जाईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात व्यक्त होत असताना पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. पंतप्रधान या नात्यानं नरसिंह राव हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने त्यांनी प्रणव मुखर्जी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असलेलं नियोजन मंडळाचं उपाध्यक्षपद दिलं. त्यांनीच पुढे प्रणवदा यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खात्याचं मंत्रिपद दिलं. प्रणवदा यांनी ते वर्षभर सांभाळलं. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना प्रणव मुखर्जी हे काही काळ काँग्रेसचे सरचिटणीस होते. काही काळ ते पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. सुमारे सात वर्षे ते काँग्रेसचे लोकसभेतले नेते होते. केंद्रात २००४ साली काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन होत असताना, प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधानपदाने तिसर्‍यांदा हुलकावणी दिली. डॉ. मनमोहन सिंग हे त्यावेळी पंतप्रधान झाले. त्यांनी प्रणवदा यांना संरक्षणमंत्री केलं. दोन वर्षांनी प्रणवदा हे परराष्ट्रमंत्री झाले. डॉ. मनमोहन सिंग दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा प्रणव मुखर्जी हे त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात वर्ष २००९ पासून पुढील तीन वर्षे अर्थमंत्री होते.


दि. २५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ अशी पाच वर्षे ते भारताचे राष्ट्रपती होते. तेव्हा सुरुवातीची दोन वर्षे काँग्रेस पक्षाचे डॉ. मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदावर होते आणि त्या पुढली तीन वर्षे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर होते. त्या दोन्ही पंतप्रधानांबरोबर त्यांचे संबंध कायम सौहार्दाचे राहिले. ते राष्ट्रपती असतानाच्याच काळात संसदेतले त्यांचे अत्यंत आवडते आणि दीर्घकालीन सहकारी सुशीलकुमार शिंदे यांचा ७५वा वाढदिवस २०१६ सालच्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा साजरा झाला, तेव्हा त्या दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी ते मुद्दाम सोलापूरला आले होते.


ते राष्ट्रपती असतानाच्याच काळातच १८ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांच्या सुविद्य पत्नी शुभरा मुखर्जी यांचं निधन झालं. देशाच्या त्या ‘प्रथम महिला’ होत्या. त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शुभरा मुखर्जी यांच्याशी घनिष्ठ मैत्री असलेल्या, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या आज ५५ वर्षांच्या असून कथ्थक नृत्यकलेत निपुण आहेत. शर्मिष्ठा या २०१४ सालापासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत. दिल्ली विधानसभेची २०१५ सालची निवडणूक त्या काँग्रेसच्या तिकिटावर लढल्या मात्र पराभूत झाल्या. दिल्ली महिला काँग्रेसच्या त्या अध्यक्ष देखील होत्या. अभिजित मुखर्जी हे प्रणवदा यांचे ज्येष्ठ चिरंजीव आज ६० वर्षे वयाचे असून कोलकताच्या जादवपूर विद्यापीठाचे ते बी. ई( मेकॅनिकल इंजिनिअरिंग) आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, मारुती इंडिया वगैरे मोठमोठ्य सरकारी औद्योगिक उपक्रमांत कामाचा अनुभव घेतल्यानंतर ते ‘स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’चे महाव्यवस्थापक झाले. पुढे नोकरी सोडून ते राजकारणात उतरले. २०१९ सालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केलं. इंद्रजित मुखर्जी हे त्यांचे धाकटे बंधू आणि प्रणव मुखर्जी यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत.


प्रणव मुखर्जी यांनी आयुष्यात अनेक सन्मान मिळवले आणि अनेक संस्थांची सन्माननीय पदं भूषवली. गणित आणि सांख्यकशास्त्र या विषयांचं पदव्युत्तर परीक्षेपर्यंत शिक्षण देणार्‍या कोलकत्याच्या ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ या विद्यापीठसमान संस्थेचे ते अध्यक्ष होते. जागतिक बँक, तसेच आफ्रिकी आणि आशियाई विकास बँका यांच्या नियंत्रण मंडळावर ते सदस्य होते. नेपाळमधल्या काठमांडूपासून ते इस्रायलमधल्या जेरुसलेमपर्यंतच्या आणि बांगलादेशमधल्या ढाक्यापासून ते तुर्कस्तानमधल्या इस्तंबूलपर्यंतच्या अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय ‘डॉक्टरेट’ प्रदान केली. आयव्हरी कोस्ट या पश्चिम आफ्रिकी चिमुकल्या देशानं त्यांना त्या देशाचं सन्मान्य नागरिकत्वच बहाल केलं. भारत सरकारने २००८ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ आणि २०१९ साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव केला.


मला आजही आठवतंय, मी कोलकातात होतो, त्याकाळात प्रणव मुखर्जी हे भारताचे अर्थमंत्री होते. कोलकाताच्या ‘आनंद बझार पत्रिका’ वृत्तपत्र समूहाने पंचतारांकित पार्क हॉटेलमध्ये त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी म्हणजे १९८४ साली मी प्रणवदांना प्रथमच पाहिलं. सत्काराच्या उत्तरादाखल त्यांनी केलेलं भाषण ऐकलं. परंतु, ते बंगालीत बोलल्याने मला फारसं कळलं नाही. कार्यक्रमानंतर चहापानाच्या वेळी मी त्यांना भेटलो. त्यावेळी मी त्यांच्या हातात एक सुंदर, सुबक पाईप बघितला. धुम्रपान करण्यासाठी तो सुलगावलेला नव्हता, पण होता हे नक्की! बंगालमधल्या त्यांच्या पिढीतल्या अनेक उच्चभ्रू मान्यवरांप्रमाणेच तेही धुम्रपानासाठी पाईप वापरत होते. वयाची पन्नाशी उलटताच त्यांनी धुम्रपान करणं पूर्णपणे सोडून दिलं. त्यांच्या निश्चयी वृत्तीचं हेही निदर्शक म्हणता येतं. प्रत्येक वर्षी ते दुर्गापूजा उत्सवात मिर्‍हाटी या आपल्या गावखेड्याला न चुकता भेट देत असत. बहुतकरून त्यांचं वास्तव्य दिल्लीतच असलं तरी त्यांना आपल्या ‘शोनार बांगला’ची ओढ कायम असायची. दक्षिण कोलकतामधल्या लेक रोडवर कवी भारती सरानीमधल्या इमारतीत ते राहत असत. कोलकतात प्रतिवर्षी होणार्‍या विशाल ग्रंथमेळ्यात त्यांची उपस्थिती एक दिवस तरी हमखास असायची. निखिल भारत बांगला साहित्य परिषदेचे ते दीर्घकाळ मानद अध्यक्ष होते. साहित्य, संगीत, कला या क्षेत्रांत ते सहज रमून जात. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि रामकृष्ण परमहंस ही त्यांची दैवतं होती. रोजनिशी लिहिल्याखेरीज ते झोपत नसत. नुकत्याच त्यांनी लिहून पूर्ण केलेल्या आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या शीर्षकाच्या पुस्तकासाठी त्यांना राष्ट्रपती भवनात लिहिलेल्या आपल्या रोजनिशीचा खूपच उपयोग झाला, असं त्यांनीच म्हटलं आहे.


महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचे ते कट्टर पुरस्कर्ते होते आणि इंदिरा गांधी यांच्याशी ते कायम एकनिष्ठ होते. असं असूनही टोकाची वैचारिक भिन्नता असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आमंत्रण स्वीकारून ते ८ जून २०१८ रोजी नागपूरमध्ये दाखल झाले. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला त्यांनी उत्स्फूर्तपणे भेट दिली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासोबत व्यासपीठावर आसन ग्रहण केलं आणि त्या शिस्तबद्ध कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलेले विचार हे अत्यंत परिपक्व, प्रगल्भ, प्रसंगोचित, प्रबोधन करणारे आणि त्यांच्याबद्दलचा आदर वृद्धिंगत करणारे होते.


असं दुर्मीळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने आपल्या देशाची झालेली हानी ही कधीही भरून येणारी नाही!



- प्रवीण कारखानीस


@@AUTHORINFO_V1@@