गुन्हेगारीचे प्रमाणपत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |
Cricket_1  H x




दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून जगभरात जशी पाकिस्तानची ओळख आहे, तशीच ओळख पाकिस्तानने क्रिकेट जगतातही निर्माण केली आहे. पाकिस्तान आणि फसवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पाकिस्तानच्या खेळाडूंनी आतापर्यंत अनेकदा क्रिकेटच्या नियमांचा भंग करत प्रतिस्पर्धी संघाची फसवणूक केल्याची उदाहरणे आहेत. कोरोना काळात क्रिकेटविश्वाची गाडी पुन्हा एकदा रुळावर येत असतानाच, पाकिस्तानच्या खेळाडूंनी नियम मोडल्याने क्रिकेटच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या कृत्याने पाकिस्तानने आपल्या गुन्हेगारीचे पुन्हा एकदा प्रमाणपत्रच सादर केले आहे.


पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने इंग्लडविरूद्ध सुरु असलेल्या पहिल्याच ‘टी-२०’ सामन्यादरम्यान चेंडू चमकविण्यासाठी लाळेचा वापर केला. कोरोना महामारीच्या काळात थंडावलेले क्रिकेटविश्व पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही विशेष नियमावली तयार केली होती. ज्यामध्ये चेंडू चमकाविण्यासाठी खेळाडूंना लाळेचा वापर करता येणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांदरम्यान एक मालिकाही पार पडली. दोन्ही संघातील एकाही खेळाडूकडून चुकून एकदाही असा प्रकार घडला नाही. मात्र, पाकिस्तानने आपल्या पहिल्याच सामन्यादरम्यान असे कृत्य करत खेळाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोहम्मद आमीर चेंडू चमकविण्यासाठी लाळेचा वापर करत असल्याचे एकदा कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर पंचांनी याची दखल घेत चेंडूचे निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, आमीरची लबाडी सुरुच राहिली. जवळपास तीन ते चार वेळा आमीरचे हे कृत्य सुरु राहिल्याने आयसीसीने याची दखल घेत कारवाईसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सूचना केल्या आहेत. मात्र, पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड कारवाई करण्याऐवजी सवयीप्रमाणे चुकून हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण देत आमीरवर कारवाई होण्यापासून प्रयत्न करत आहेत. आधी गुन्हेगारीचे प्रमाणपत्र सादर करायचे आणि मग कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्न करायचे, अशी लबाडी केवळ पाकिस्तानसारख्या देशांनाच शक्य आहे. अशा देशांकडून कारवाईची अपेक्षा करणेही व्यर्थच, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.


शिक्षेचे मानकरी


पाकिस्तानच्या खेळाडूंनी क्रिकेटविश्वात लबाडी करण्याची ही काही तशी पहिलीच वेळ नाही. ज्या मोहम्मद आमीरने चेंडू चमकविण्यासाठी अनेकदा लाळेचा वापर करत नव्या वादाला तोंड फोडले, त्याच आमीरची क्रिकेटविश्वातील अख्खी कारकिर्दच वादग्रस्त राहिली आहे.


सध्या इंग्लडसोबत सुरु असलेल्या ‘टी-२०’ मालिकेच्या पहिल्याच सामन्यादरम्यान त्याच्या या लाजिरवाण्या कृत्यामुळे हा वाद उभा राहिला, त्याच इंग्लडच्या धर्तीवर मोहम्मद आमीरवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१२ साली इंग्लंडविरूद्ध कसोटी सामन्यादरम्यान त्याने अनेक ‘नो-बॉल’ फेकल्याचे समोर आले होते. चौकशीदरम्यान ‘मॅच फिक्सिंग’मधून त्याने हे ‘नो-बॉल‘ फेकल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर आजीवन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची बंदी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी घालण्यात आली होती. मात्र, ‘मॅच फिक्सिंग’मागील सूत्रधार माजी खेळाडू असून आमीरचा यात वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा निर्णयांमुळे प्रतिभावान तरुण खेळाडूची कारकिर्दच संपुष्टात येत असल्याने पाच वर्षांची बंदी कायम ठेवत आयसीसीने आमीरला क्रिकेटविश्वात पुनरागमनाची संधी दिली होती. क्रिकेटविश्वात पुनरागमन केल्यानंतर आमीरने वयाच्या २७व्या वर्षीच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. कसोटी क्रिकेट खेळणे आपल्या गोलंदाजीला अनुसरून नसल्याचे कारण त्याने पुढे केले होते. मात्र, कसोटी सामन्यादरम्यानच ‘मॅच फिक्सिंग‘मध्ये नाव खराब झाल्याने त्याने या क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्ती स्वीकारल्याचे बोलले जाते.



कसोटी क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा करत नाही, तोच आमीर पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करत त्याने पाकिस्तानच्या लबाडीचे प्रमाणपत्रच सादर केले आहे. केवळ आमीरच नाही तर यापूर्वी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही याच इंग्लंड दौर्‍यादरम्यान चेंडूचा चावा घेताना कॅमेर्‍यात कैद झाला होता. केवळ चेंडूच नाही, तर बुटांच्या साहाय्याने खेळपट्टी बिघडविण्याच्या प्रयत्नांतही आफ्रिदीचे नाव समोर आले होते. अनेक सामन्यांनंतर चेंडू पाहणीत चेंडूवरील धाग्याची शिलाई कुरतडण्याचा प्रयत्न झाल्याचे अनेक प्रकार पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यांदरम्यान घडलेले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचे खेळाडू हे शिक्षेचे मानकरी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



- रामचंद्र नाईक





@@AUTHORINFO_V1@@