ध्येयवादाचे नि:स्पृह जीवन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020   
Total Views |
dinkar damle_1  






दिनकर दामले, ठाण्याच्या सामाजिक वर्तुळात आदराने घेतले जाणारे नाव. वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही समाजभान जपणारे, त्यासाठी ध्येयनिष्ठ जीवन जगणार्‍या दिनकर दामले यांच्याविषयी...



साठच्या दशकात पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या भेटीने दिनकर दामले यांचे जीवनच बदलले. त्याचे झाले असे की, जनसंघाची कार्यकारिणी पुण्याला होती. त्यावेळी दीनदयाळजींनी ओंकारेश्वराच्या मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दिनकर आणि इतर तीन-चार जण दीनदयाळजींना घेऊन ओंकारेश्वराच्या मंदिरात गेले. दर्शन घेतल्यानंतर दीनदयाळजींनी सगळ्यांना प्रश्न केला, “ओंकारेश्वर मंदिराकडे पाहा. काय दिसते?” कुणी सांगितले, कळस दिसतो, कुणी देव्हारा, कुणी मंदिराचा रम्य परिसर. यावर दीनदयाळ म्हणाले, “अरे तुम्हाला मंदिराचा पाया दिसला नाही? ज्याच्यावर हे मंदिर उभे राहिले आहे. तो मजबूत आहे, टिकून आहे, त्याने आपले सत्व सोडले नाही म्हणून हा कळस डौलाने उभा आहे.” यावर आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो, खरेच आम्हाला पाया दिसलाच नाही. पाया खंबीर म्हणून सगळे आहे. पुढे दीनदयाळजी म्हणाले, “आपणही पाया आहोत. आपण आपले सत्व जपले पाहिजे, आपल्या प्रामाणिक विचारांशी खंबीर राहिलो, तर येणार्‍या काळात आपल्या विचारांचा आपल्या ध्येयाचा मूर्त कळस असाच डौलाने उभा राहिला. त्यामुळे पायाचा पत्थर बनणे हे भाग्यच आहे,” असा संकल्प दिनकर यांच्या मनात रूजला.

त्यामुळेच की काय, जनसंघातर्फे दोन वेळा नगरसेवक झाल्यानंतर दिनकर दामले यांनी ठरवले की, आता पुन्हा निवडणूक लढवायची नाही. कारण, कितीही वाटले तरी राजकीय पार्श्वभूमी सोडून समाजाशी जनसंपर्क करता येत नाही. केवळ मत देणार्‍या वस्त्यांशी संपर्क जोडण्यापेक्षा ‘सब समाज को साथ लिये’ची संकल्पना राबविण्यात खूपच अडथळे येतात. त्यांनी ठरवले आणि शांतपणे नगरसेवक पदाच्या तिसर्‍या निवडणुकीला नकार दिला. ऐंशीचे दशक होते ते. २०२०चे राजकारण सुरू आहे. त्यानुसार कुणालाही वाटेल की, दोन वेळा नगरसवेक झाल्यानंतर माया गोळा केली असेल किंवा पुढे आमदार वगैरे व्हायचे असेल म्हणून या नगरसेवकाने तिकिटाला नकार दिला. इथे सांगावेच लागेल की, दिनकर हे लोकप्रिय नगरसेवक होते. ‘सत्ता सेवा का साधन हैं’ असे त्यांचे प्रामाणिक मत होते. त्यामुळे नगरसेवक असतानाही घर चालवण्यासाठी ते आणि त्यांची पत्नी वडे-भजी वगैरे विकत असत. अशातच मग शववाहिनी निर्मितीचे कंत्राट मिळाले. नवीन व्यवसाय सुरू झाला. ठाणे शहरात विद्युत शववाहिनी आणली ती दिनकर दामले यांनी. त्यानंतर घराची थोडी आर्थिक घडी बसली. कदाचित दिनकर यांनी पैशांची श्रीमंती मिळवली नसेल, पण माणसं जोडण्याची आणि समाजाचा गोतावळा जमवण्याच्या श्रीमंतीमध्ये ते नक्कीच सर्वात श्रीमंत आहेत. ठाण्याच्या विविध सामाजिक संस्थांचे दायित्व त्यांनी भूषवले आहे. वयाच्या ८०व्या वर्षीही दिनकर रा. स्व. संघाच्या शाखेत जाणे, कितीही व्यस्त असले तरी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे, समाजोपयोगी योजना राबलषणे, यामध्ये ते व्यस्त आहे.


निर्लोभ नि:स्वार्थी वृत्तीने समाजासाठी काम करण्याची वृत्ती त्यांच्यात कशी निर्माण झाली? तर दिनकर यांच्या आईचे वडील गोपाळ चितळे हे अकोल्याचे संघचालक. १९३०चे दशक होते ते. चितळे यांच्या घरी रा. स्व. संघाचे गोळवलकर गुरूजी यायचे. त्यांचे आणि आजोबांचे संवाद ऐकण्याचे भाग्य दिनकर यांना लाभले. तसेच एकदा सायंशाखेला डॉ. हेडगेवारांचाही आशीर्वाद त्यांना मिळालेला.

दामले कुटुंब मूळ रेवदांड्याचे. दत्तात्रय आणि मनोरमाबाई दामले यांना दहा मुले. त्यापैकी एक दिनकर. आईने मुलांना संस्काराने श्रीमंत बनवले. सर्व मुलांनी सायंकाळी रामरक्षा म्हटलीच पाहिजे हा नियम. दहा-अकरा वर्षांच्या दिनकर यांना वाटले की, रामरक्षा म्हणजे रामाची स्तुती. ती दररोज का करायची? दोन दिवस त्यांनी रामरक्षा म्हटली नाही. आईला कळले. आईने त्यादिवशी संध्याकाळी जेवण दिले नाही. रात्रीचे १२-१ वाजले, इतक्यात आईने त्यांना जवळ घेतले. ती म्हणाली, “ते प्रभू श्रीराम आहेत. आपल्या स्तुतीचा किंवा निंदेचा त्याला लोभ नाही. रामरक्षा प्रभू रामाच्या स्तुतीसाठी नाही, तर त्या रामरक्षेचा अर्थ समजून आपल्या अंत:करणाच्या शुद्धीसाठी रामरक्षा म्हणायची असते.” आईही त्यादिवशी जेवली नव्हती. पुढे दिनकर यांनी कधीही रामरक्षा चुकवली नाही. गांधींचा मृत्यू झाला तो दिवस त्यांच्यासाठी खूप विचित्र होता. त्यावेळी ते १४ वर्षांचे होते. गांधींच्या मृत्यूचे दु:खद वातावरण सगळीकडे होते. त्यावेळी ते नेहमीप्रमाणे सायंशाखा घ्यायला गेले. वाटेत त्यांना ओळखीचे गृहस्थ भेटले. नेहमीच हसून बोलणारे ते गृहस्थ म्हणाले, “तू बामणाचा पोर ना? गांधीला का मारले?” असे म्हणून त्यांनी एक मोठा दगड त्यांच्यावर भिरकावला. तो माणूस, त्याच्यासोबतची माणसे दगड भिरकावतच होती. दिनकर पळत होते आणि समोरून आई आली. तिने पटकन दिनकर यांना सांभाळले. दिनकर म्हणतात, “त्यावेळी पहिल्यांदा कळले की, मी ब्राह्मण आहे.” दिनकर दामले यांच्या आयुष्यात अशा खूप घटना आहेत, ज्या आजच्या समाजाला मागचा इतिहास सांगतील. दिनकर यांच्या ध्येयपूर्ण आयुष्याला नमन...!






@@AUTHORINFO_V1@@