चरित्रनायक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2020
Total Views |

dr annabhau sathe_1 



लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनाकडे पाहिले तर अत्यंत कठीण अशा जीवनसंघर्षाला तोंड देत त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीने आपण अक्षरशः थक्क होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ते पुढे आले. सर्वसामान्य माणसाचे जगणे व त्यांचा संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय होता. एक विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि संवेदनशील कर्तृृत्व, माणूस म्हणून अण्णा भाऊ आणि त्यांचे साहित्य, विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देते. या अशा चरित्रनायक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे जीवन शब्दांत रेखाटणे अशक्य, तरीही ते शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.



१ ऑगस्ट १९२०ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावात एका अतिशय गरीब मातंग कुटुंबात अण्णा भाऊंचा जन्म झाला. अण्णा भाऊंच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वाळूबाई साठे. या दाम्पत्यास दोन मुले. मोठा शंकर व धाकटा तुकाराम. घरात इन-मीन-चार माणसे. तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आपले अण्णा भाऊ साठे. आत्यंतिक दारिद्य्र, दुःख, वेदनांमध्ये त्यांचे जीवन गेले. बालपणी फकिरा राणू मांगसारख्या क्रांतिकारकाचा सहवास त्यांना पाच वर्षे लाभला. त्यांच्याकडून ते बालपणी घोड्यावर बसणे, तलवार, दांडपट्टा चालवणे आदी शिकले. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि फकिरांची भेटही घडवून आणली. त्यानंतर नाना पाटील अण्णा भाऊंचे अखेरपर्यंत पालक झाले. वाटेगावात जेमतेम दीड दिवसच ते शाळेत जाऊ शकले. गावी पोट भरता येत नसल्याने मुंबईची वाट धरावी लागली जात. पितृसत्ताक व्यवस्थेने अण्णा भाऊंनी शिक्षणाची दारे बंद केली. पण, जीवनाच्या शाळेत संघर्ष करून त्यांनी अक्षरवड विद्यापीठ उभे केले. अण्णा भाऊ केवळ साहित्यिक नव्हते, तर दलित-शोषितांच्या लढ्यातील अग्रणी पुढारी होते. जातीदास्यातून अस्पृश्य म्हणून वाट्याला आलेली अवहेलना, परावलंबित्व, अंकितता, अवमान, दारिद्य्र यांना कंटाळून साठे कुटुंबीयांनी वाटेगाव सोडून महानगरी मुंबईचा रस्ता धरला. अनेक संकटांचा सामना करीत, मोलमजुरीवर उपजीविका भागवत अण्णा भाऊ कापड गिरणीत कामाला लागले.




मुंबईतच हमाल मावसभाऊ साधू साळेंच्या हाताखाली त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पहिल्यांदा बाराखडी गिरवली. पुढे कॉ. अमर शेख, द. ना. गवाणकर, कॉ. हरी जाधव, कॉ. शंकर पगारे, कॉ. के.एम. साळवी आदींनीही त्यांना प्रोेत्साहन दिले व लिहायला-वाचायला शिकवले. लिहिणे म्हणजे नुसते मनाचे रंजन नव्हते. त्यांना आस होती ती समाज बदलण्याची. यातूनच त्यांची कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबरोबर जास्त जवळीक वाढली. कला पथकातून कथा लिहिण्याचा, गाणी लिहिण्याचा क्रम सुरू असताना घरगडी-हमाली, लाकडे फोडण्याचे काम, गिरणीत काम अशी अनेक कामे करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण, स्वाभिमानाने जीवन जगण्याचा खंबीरपणा त्यांनी प्रहार केला. त्यांचे साहित्य सुरुवातीला मौखिक होते. त्यांचा पहिला ‘मच्छराचा पोवाडा’ १९३८मध्ये प्रसिद्ध झाला. कामगारवर्गाचे शोषण मांडणार्या याच पोवाड्याने त्यांना ‘लोकशाहीर’ केले. ते प्रसिद्धीच्या झोतात आले. लोकप्रियता वाढली. पण, ती कधीच त्यांच्यावर स्वार झाली नाही. दडपल्या गेलेल्या लाखो व्यक्तींना लढण्याची प्रेरणा देणारे साहित्य या माणसाने निर्माण केले. उच्चशिक्षित लोक चांगले साहित्य लिहू शकतात, असे मानले जाते. परंतु, केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णा भाऊ मानवजातीच्या कल्याणाची कामना करणारे प्रभावी लेखन करतात. हा मोठा चमत्कार आहे.

‘जग बदल घालून घाव,
सांगून गेले मज भीमराव’


हे त्यांचे शब्द आजही वंचित समाजाला बळ देतात. अन्यायाच्या विरोधात रडायचे नाही, तर लढायचे आहे, असा संदेश ते देतात.



‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसूून ती श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.’ असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सांगताना, जगातल्या श्रमिकांचा त्यांनी सन्मान केला. अनेक परदेशी भाषांमधून त्यांच्या साहित्यांचे भाषांतर झाले आहे. महिलांप्रति मोठा आदर त्यांच्या लेखणीत पदोपदी दिसतो. त्यांनी स्त्रीचे दर्शन त्या काळात सुद्धा सबला, लढाऊ, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी असेच केले. स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, महाराष्ट्राचा पोवाडा, अमंळनेरचे अमर हुतात्मे, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा अशी एकामागून एक सरस पद्यनिर्मिती अण्णा भाऊंनी केली. म्हणून, त्यांचे साहित्य जगात अभिजात साहित्याच्या तुलनेत उजवेच ठरते. आर्थिक कुचंबणा, सामाजिक अप्रतिष्ठा, उच्चवर्णीयांकडून होणारा अन्याय यातूनही माणूसपण जपणार्या अण्णा भाऊंच्या व्यक्तिरेखा सामान्य माणसांच्या जगण्याला बळ देत राहतात. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिरागनगर मुंबईच्या झोपडपट्टीत राहून विपुल व दर्जेदार लिखाण केले. भांडवलशाही व जातीय विषमतने ग्रासलेल्या भारतीय समाजात अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्याचे मूल्यमापन त्यांच्या हयातीत किंवा त्यानंतरही केले नाही.

अण्णा भाऊंचे साहित्य कवडीमोल भावाने विकत घेऊन त्यावर अनेकजण लक्षाधीश झाले. पण, अण्णा भाऊंच्या वाट्याला मात्र, उपेक्षितांचे, दारिद्य्राचे व हलाखीचे जीवन आले. अण्णा भाऊंचे साहित्य केवळ मराठीच नव्हे, तर जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे. एवढेच नव्हे, तर १९४०च्या दशकामध्ये मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये अण्णा भाऊ आपल्याला कलाकार, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक, चित्रपट, समीक्षक, प्रेक्षक आदी स्वरुपामध्ये भेटतात. त्यांच्या आठ कादंबर्यांवर आठ मराठी चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या ‘माकडीचा माळ’ या कादंबरीवर ‘डोंगरची मैना’, ‘चिखलातील कमळ’ यावर ‘मुरळी मल्हाररायाची’, ‘वारणेचा वाघ’ या कादंबर्यांवर ‘वारणेचा वाघ’, ‘वैजयंता’ वर ‘वैजयंता’ या चित्रपटास तर १९६१-६२ यावर्षाचे ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. ‘अलगुज’ या कादंबरीवर ‘अशी ही सातार्याची तर्हा’ हा चित्रपट काढला व याला १९७३-७४ चे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट क्रमांक तीनचे पारितोषिक मिळाले होते. ‘फकिरा’वर ‘फकिरा’ काढला. ‘फकिरा’ चित्रपटाच्या निमितीमध्ये अण्णा भाऊंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. चित्रपटसुद्धा अत्यंत उत्कृष्ट झालेला होता. ‘फकिरा’ चित्रपट खूप चालला. त्यांनी केलेली ‘सावळा’ची भूमिका उत्कृष्ट ठरली, पण चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत अण्णा भाऊ काहीच कमावू शकले नाहीत, त्याला कारण एक तर त्यांचा स्वभाव मितभाषी होता. व दारिद्य्राने पिचल्यामुळे ते समर्थपणे स्वतंत्र असे चित्रपट काढू शकले नाहीत. याच काळात

‘माझी मैना गावावर राहिली
माझ्या जीवाची होतीया काहिली’


ही लावणी त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली.जो मराठी भाषकांचा भाग महाराष्ट्रात आला नाही, त्याबद्दलची वेदना त्यांनी व्यक्त केली. साहित्यातून नायक निर्माण करणारे ते खरे महानायक होते. श्रमिक, कष्टकरी महिला आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी अण्णा भाऊंनी आपली लेखणी झिजवली. अशा या महानायकाचा मृत्यू 18 ऑगस्ट, १९६९ मध्ये मुंबई येथे झाला. आपण जात, धर्म, विषमतेची जळमटं कापून टाकल्याशिवाय विवेकनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकार आल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत. हे सर्व परिवर्तनाचे शिल्पकार आहेत. आपण महापुरुषांचे मूल्यविचार समजून घेतले पाहिजेत. कारण, त्यांनी संपूर्ण जगाला एक दिशा दिली. कष्टातून उजळलेले हे नंदादीप आपण जपले पाहिजेत.



- डॉ. पल्लवी साठे
7721995356
@@AUTHORINFO_V1@@