नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'मन की बात'मध्ये सुरक्षा दलांतील श्वानांच्या बहादुरीचा उल्लेख केला मात्र, विशेष नाव घेऊन बीड पोलीस दलातील रॉकीच्या शौर्याचा गौरव केला. महाराष्ट्र बीड पोलीस दलातील शोधपथकात असलेल्या रॉकी हा श्वान आता जगात नाही. रविवार, १६ ऑगस्ट रोजी त्याला अंतिम निरोप देण्यात आला होता. रॉकीने एकूण ३६५ प्रकरणांत महत्वाची भूमिका निभावली होती.
बीड पोलीसांनी सन्मानपूर्वक रॉकीला निरोप दिला. दीर्घकाळ प्रकृतीच्या कारणांनी तो अस्वस्थ होता. सुरक्षादलांमध्ये ड्रग्ज, विस्फोटके आणि अन्य तपासासाठी श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच बहादूर श्वानांचा गौरव आपल्या मन की बात या कार्यक्रमात केला.
सैन्याने सुरक्षादलांजवळ असलेल्या बहादूर श्वानांच्या बलिदानाचाही उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, "कित्येक बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये तसेच अन्य महत्वाच्या प्रकरणांत त्यांची भूमिका महत्वाची राहिली. काही दिवसांपूर्वी आपल्या देशातील सुरक्षा दलांमध्ये असणाऱ्या श्वानांबद्दलची विस्तृत माहिती ऐकायला मिळाली."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ६८ व्या मन की बात कार्यक्रमात आज देशवासीयांशी संवाद साधला. आत्मनिर्भर भारतात खेळण्यांचे क्षेत्र महत्वाची भूमीका निभावणार आहे. असहकार आंदोलनात महात्मा गांधीजींनी भारतीयांमध्ये आत्मविश्वास जागृत ठेवण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन केले होते. आज आत्मनिर्भर भारत आंदोलनही त्याच प्रकारचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील अन्य महत्वाचे मुद्दे
जनतेने संयम दाखवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून सण उत्सव साजरे करत जनतेने एक संयमाची भावना जागृत केली होती. संकट ओळखूनच लोक आपापली कामे मार्गी लावत आहे. जनतेचा हा संयम अभूतपूर्व आहे. ज्या प्रकारे गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा केला गेला, ऑनलाईन दर्शन आणि पूजन आदी कार्यक्रम झाले हा आदर्श जनतेने दाखवला. पर्वांमध्ये पर्यावरण संदेश : बिहारच्या थारू समुदायाने प्रकृतीला आपल्या जीवनाचा हिस्सा मानला आहे. ६० दिवसांच्या या सणातही संयम दिसला. ओणमही साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या योगदानामुळेच आपले सण रंगीत झाले आहेत. ऋग्वेदात अन्नदात्याला नमन करण्यात आले आहे.
खेळण्यांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता : कोरोना काळात देशाने एकत्र लढा दिला आहे. या वेळात मुलांचे आयुष्य कशाप्रकारे व्यथित होत असेल. खेळण्यांसंदर्भात रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते. खेळणे तेच चांगले जे अर्धवट असेल. मुले खेळता खेळता ते पूर्ण करतील. जागतिक खेळण्याची बाजारपेठ हे ७ लाख कोटी इतके आहे. भारताचा हिस्सा यात सर्वात कमी आहे. याला पूर्णपणे विकसित करणे गरजेचे आहे.
जन आंदोलन व्हावे : खेळण्यांमुळे लहानपण खुलले पाहिजे. कॉम्प्युटर गेम्सचा जमाना आहे. मात्र, त्यात बहुतांश संकल्पना भारतीय आहे. आत्मनिर्भर भारत टॉय इंडस्ट्रीजशी महत्वाची भूमिका असणार आहे. असहकार आंदोलन गांधीजींनी ज्या प्रकारे देशव्यापी केले होते, त्याप्रकारे आत्मनिर्भर भारत आंदोलन व्हायला हवे.
पोषणाचे महत्व असूद्या : कोरोना संकटात आहार-पोषणाची महत्व तितकेच अधोरेखित झाले आहे. सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून ओळखला जातो. जेवण किती आहे, त्यापेक्षा त्यातून विटामिन-प्रोटीन मिळतात हे समजून घेणे आवश्यक आहे. रेशन कार्डाप्रमाणे न्युट्रीशन कार्ड बनवण्याचे प्रयत्नही सरकार करत आहे.