शेकडो शिवसैनिक 'बंधना'तून मुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020
Total Views |

Khed_1  H x W:
 
 
 
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचा आणि ८० टक्के समाजकारणाचा विसर पडल्याने सामान्य शिवसैनिक पक्षापासून दुरावत चालला आहे. त्याच्याच परिणामी त्याची किंमत शिवसेनेला आगामी काळात मोजावी लागणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत खेड तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करत याचे संकेत दिले आहेत.
 
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदुत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडलेला दिसतोय. ८० टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेची सामाजिक बांधिलकीही लोप पावत असल्याचे चित्र कोविडच्या संकटात व कोकणच्या निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेची कोकणवासीयांच्या प्रति निष्क्रीयता दिसून येत आहे, त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला या निष्क्रियतेची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रविण दरेकर यांनी खेड येथे दिला.
 
 
खेड येथे भाजपच्या खेड तालुकाच्या वतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात प्रवीण दरेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष डॉ विनय नातू, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस राजुभाई रेडीज, चिटणीस संजय बुटाला, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, मंगेश मोहिते, खेड तालुका अध्यक्ष अनिल भोसले, महिला तालुका अध्यक्ष संजीवनी शेलार, केदार साठे आदी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनिकेत कानडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर, हेमंत भोसले, रोहन राठोड, अविनाश माने, सुनील महाडिक, प्रवीण चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
 
 
यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, शिवसेनेला हिंदुत्व व सामाजिक बांधिलकी या दोन गोष्टीमुळे वेगळा जनाधार प्राप्त झाला होता. परंतु या दोन्ही गोष्टींचा आता शिवसेनेला सोयीस्कर विसर पडल्यामुळे जनतेच्या मनात शिवसेनेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. राममंदीर कधी होणार असे विचारणाऱ्यांना भूमिपूजनाची तारीख निश्चित करून आम्ही चोख उत्तर दिले आहे. कोकणात शिवसेनेला पर्याय म्हणून सामाजिक बांधिलकिची मोठ्या प्रमाणावर जाण असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा कोकणात जनाधार वाढत आहे. कोविडच्या संकटात तसेच कोकणच्या निसर्ग वादळात भाजपने केलेले सेवाभावी कार्य अतुलनीय होते. तसेच हिंदुत्वाची भूमिका कोणत्याही परिणामांची पर्वा न करता ताकदीने पुढे नेण्याचे काम भाजप करीत असल्याने हिंदुत्वाच्या आधारे जनाधार वाढविणे फलदायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
कोविडच्या संकटात मुंबईकर चाकरमान्यांचे आपल्या गावी जाताना अतोनात हाल होत आहे. त्यांच्यासाठी एसटी सेवा पुरविण्यात शिवसेनेचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोकणच्या चाकरमान्यांच्या मनात शिवसेनेविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे दरेकर यानी सांगितले. निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त लोकांना एक महिना लोटूनही सर्वांना मदत मिळाली नसून अनेकांचे विविध प्रश्न आजही प्रलंबित आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारविषयी कोकणवासीयांचा नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे. कोविड आणि निसर्ग चक्रिवादळाच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदधिकारी तसेच दोन्ही विरोधी पक्षनेते यांचा सक्रिय सहभाग असल्याने भाजपविषयी कोकणच्या जनतेमध्ये आपुलकीचे नाते निर्माण होताना दिसत असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, भाजपबद्दल विश्वास असल्यानेच चांगले कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. खेडमध्ये एका चांगल्या कार्यकर्त्याचा संच भाजपमध्ये आला आहे. भाजप तळागाळात काम करणारा पक्ष असल्याने येथे सर्व कार्यकर्त्यांना पाठबळ आणि सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
खेडची भूमी जलदगतीने परिवर्तन करणारी आहे. कधीकाळी येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. नंतर मनसेलाही जनतेने संधी दिली. आगामी काळात खेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देताना दरेकर यांनी भाजपत प्रवेश केलेले अनिकेत कानडे व वैभव खेडेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी १४ दिवस क्वारंटाईनाचा नियम फार त्रासदायक आहे. सध्या चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, त्याला त्याच्या व परिवाराच्या उदरनिर्वाहाची काळजी आहे. अशामध्ये १४ दिवस क्वारंटाईन करणे योग्य ठरणारे नाही. त्यामुळे ग्रामस्थांची काळजी घेत त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेत त्यांच्याशी समन्वय साधणे सरकारच्या पातळीवर गरजेचे आहे, तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा सुलभ प्रवास व गावी जाण्याची, राहण्याची व्यवस्था यामध्ये महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांच्या मनात महाविकास आघाडी सरकराविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@