सेक्युलर बुरख्याआडचे भामटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020
Total Views |


Delhi Riots_1  



पैसे आणि राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्यासाठीच दिल्लीत दंगल घडवल्याची कबुली नुकतीच ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांसमोर दिली. मात्र, दादरीमध्ये अखलाखच्या हत्येनंतर छाती पिटणार्‍या काँग्रेसी, डाव्या कम्युनिस्ट पक्षांतील सेक्युलर बुरख्याआडच्या भामट्यांना दिल्ली दंगलीत मारल्या गेलेल्या आयबी अधिकारी अंकित शर्मा नि कित्येक हिंदूंच्या खुनाचा निषेधही करावासा वाटत नाही.


पैसे आणि राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्यासाठीच दिल्लीत दंगल घडवल्याची कबुली नुकतीच ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांसमोर दिली. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या निरनिराळ्या ठिकाणी उसळलेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार म्हणून ताहिर हुसैन अटकेत असून, आताच्या जबाबातून त्याची हिंदुद्वेषी, हिंदुविरोधी, हिंदुद्रोही मानसिकताच स्पष्ट होते. धक्कादायक म्हणजे, ताहिर हुसैन आम आदमी पक्षाचा दिल्लीतील निलंबित नगरसेवक असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या छायेखाली सुमारे तीन वर्षांपासून तो अशी योजना प्रत्यक्षात आणण्याचा विचार करत होता. केजरीवालांनी राजकारणातील घाण साफ करण्यासाठी आपण पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याची घोषणा केली होती. मात्र, ताहिर हुसैनसारख्यांना आपल्या पक्षात ओढून अरविंद केजरीवालांनी राजकारणातील घाण साफ करण्याऐवजी ते आणखी घाण केल्याचेच इथे दिसते. तसेच केजरीवालांना आपल्या पक्षाचा दिल्लीतच राहणारा एक नगरसेवक कोणता मनसुबा घेऊन वावरतो, याचा सुगावा लागला नव्हता का? की तशी माहिती असूनही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले? झाली तर हिंदूंचीच हानी होईल आणि यातून आपले सेक्युलर-धर्मनिरपेक्षतावादी राजकारण आणखी चमकवता येईल, असा काही त्यांचा इरादा होता का? असे प्रश्नही उपस्थित होतात. कारण, ताहिर हुसैन, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया व आपच्या अगदी आतल्या गोटातील माणूस होता आणि अशा माणसाच्या समाजशांती भंग करणार्‍या योजना वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याच नसतील, यावर विश्वास ठेवता येत नाही. सध्यातरी अरविंद केजरीवाल व कंपनीने ताहिर हुसैनला पक्षातून निलंबित करून स्वतःला शुद्ध ठरवण्याचा प्रकार केला आहे. पण, याचा हिशोब त्यांना निवडणुकीच्या रिंगणात कधी ना कधी चुकता करावाच लागेल.

 
दरम्यान, ताहिर हुसैन याने पोलिसांसमोर आणखी बरीच माहिती उघड केली आहे. त्यानुसार २०१७ पासून हिंदूंना अद्दल घडवण्याचा त्याचा विचार होता व यासाठी त्याला खालिद सैफी आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांनी मदत केली. तथापि, २०१९च्या ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० भारतीय संसदेने निष्प्रभ केले, नंतर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिर उभारण्याच्या बाजूने निकाल दिला, तर पुढे केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर केला. परिणामी, इतक्या सर्व मुस्लीमविरोधी घडामोडी पाहून डोक्यावरून पाणी जात असल्याचे समजले व काहीतरी केले पाहिजे, अशी भावना ताहिर हुसैनच्या मनात उचंबळू लागली. खालिद सैफीसमोर त्याने आपल्या मनातील खदखद ओकलीही आणि त्याच्याच साहाय्याने ताहिर हुसैन याने उमर खालिदची भेट घेतली. उमर खालिद जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा माजी नेता असून, ‘तुकडे तुकडे गँग’चा सन्माननीय सदस्य म्हणून कुप्रसिद्ध आहे. उमर खालिदने ताहिर हुसैन व खालिद सैफीला या भेटीत मी मारण्यासाठी (हिंदूंना) आणि मरण्यासाठी (धर्मासाठी) तयार असल्याचे सांगितले व त्यांनी मिळून एक षड्यंत्र रचले. ताहिर हुसैनची यात महत्त्वाची भूमिका होती व ती निभावताना त्याने आपल्या घराच्या उंचीचा फायदा घेत छतावर काचेच्या बाटल्या, पेट्रोल व अ‍ॅसिडचे कॅन, दगड-विटा गोळा करून ठेवल्या. तसेच शाहीनबागेत बसलेल्या मुस्लीम बायकांच्या जमावाप्रमाणे दिल्लीत अन्यत्र तसलाच प्रकार सुरू करण्याची तयारीही या लोकांनी केली होती. जेणेकरून या बायकाही हिंदुविरोधी दंगलीत भाग घेतील. मात्र, आपला हिंदुविरोधी संताप, चीड बाहेर काढण्यासाठी त्यांना एका चांगल्या संधीची प्रतीक्षा होती आणि ती त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍या वेळी मिळाली. ट्रम्प यांच्या दौर्‍याच्या आधी दोन दिवस ताहिर हुसैन, उमर खालिद, खालिद सैफी, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘जामिया को-ऑर्डिनेशन कमिटी’ व अन्य मुस्लीम संघटनांनी दिल्ली पेटवली.


हिंदूंना मारण्याची तयारी झाल्यानंतर ताहिर हुसैन व इतरांच्या साहाय्याने मुस्लिमांना भडकावले गेले. दंगलीत सहभागी मुस्लिमांनाही हिंदूंवर हल्ल्याची हीच ती वेळ याची जाणीव झाली आणि त्यांनी मुघल सत्ता गेल्याच्या की, काश्मीरचा पाकिस्तान न झाल्याच्या की, अयोध्येतील बाबरी ढाचा पतनाच्या की, ‘सीएए’ आणल्याच्या रागातून तुफान राड्याला सुरुवात केली. अर्थात, मुळातच सहिष्णू व सर्वांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहणार्‍या हिंदूंना याचा पत्ताही लागला नाही नि त्यांचा या दंगलीत बळी गेला. दरम्यान, दंगल घडवण्याच्या या प्रकाराची माहिती ताहिर हुसैन यानेच पोलिसांसमक्ष सांगितली आहे. पण, दंगल घडते वेळी आणि आज दंगल घडून साडेपाच महिने उलटल्यानंतरही इतर वेळी सेक्युलरिझमच्या, धर्मनिरपेक्षतेच्या नावाने तमाशा करणार्‍यांनी थोबाड उघडलेले नाही. दादरीमध्ये अखलाखच्या हत्येनंतर छाती पिटणार्‍या काँग्रेसी, डाव्या कम्युनिस्ट पक्षांतील सेक्युलर बुरख्याआडच्या भामट्यांना दिल्ली दंगलीत मारल्या गेलेल्या आयबी अधिकारी अंकित शर्माच्या खुनाचा निषेधही करावासा वाटत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी अंकित किंवा अशाच कितीतरी भावांच्या बहिणींच्या डोळ्यातील अश्रू पुसावेसे वाटत नाहीत. सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशात ७० वर्षांपर्यंत घातलेल्या धुमाकुळाचा चेहरा हा असा आहे, हिंदुविरोधी केवळ हिंदुविरोधी. ताहिर हुसैन, उमर खालिद, खालिद सैफी आणि अन्य हे याच हिंदुद्वेष्ट्या प्रकारातून निपजलेली विषारी फळे आहेत. मात्र, यांची संख्या इतकीच असेल का? ताहिर हुसैन याने पैसा आणि राजकारणाच्या बळाची भाषा केली, पण असे ताहिर हुसैन अजूनही असतील का? हिंदूंना मारण्यासाठी किंवा त्यांच्या भाषेत धडा शिकवण्यासाठी दबा धरून बसले असतील का? हे प्रश्न नक्कीच उभे राहतात आणि त्याचे उत्तर नक्कीच हो, असेच द्यावे लागेल.
 
 
कारण, समाजमाध्यमांत उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम व्यक्तीची ध्वनिचित्रफित वेगाने पसरत आहे. आमच्याकडे सत्ता आणि पैसा आल्यावर आम्ही अयोध्येतील राममंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधू,” असे तो यात म्हणताना दिसतो. ही ताहिर हुसैनचीच भाषा असून, असेच शब्द ओवेसी बंधू व एमआयएमची नेते मंडळीही वापरताना दिसतात. तथापि, त्यांच्या आर्थिक आणि राजकीय शक्तीवाढीसाठी हिंदूही कसल्या ना कसल्या प्रकारे सहकार्य करत असतात, म्हणूनच दिल्ली दंगलीच्या सच्चाईच्या पार्श्वभूमीवर हिंदूंनी एकजूट होऊन, हिंदुहिताची भूमिका घेणार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता स्पष्ट होते, तर सेक्युलर व धर्मनिरपेक्षतेच्या पडद्याआड चालणार्‍या हिंदुविरोधी कारवायांना पायबंद घालता येईल.

@@AUTHORINFO_V1@@