देव, देश अन् धर्मापायी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020   
Total Views |


Manoj Sanap_1  


मनोज सानप आज राजपत्रित अधिकारी आहेत. समाजातील युवकांनी प्रशासकीय सेवेत, सैन्यात अधिकारी व्हावे यासाठी ते कार्य करतात. सामाजिक समरसतेचा वारसा त्यांना चालवायचा आहे.



मनोज शिवाजी सानप सध्या वर्ग-१चे राजपत्रित अधिकारी आहेत. सध्या रायगड जिल्ह्याचे ते जनसंपर्क अधिकारी आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून नियमात्मक काम करतानाही, मनोज यांचे समाजासाठीचे योगदान खूप मोठे आहे. प्रशासकीय पद किंवा सैन्य अधिकारी पदासाठी इच्छुकांना लेखी परीक्षा दिल्यानंतर तोंडी परीक्षेमध्ये हमखास कमी गुण मिळतात किंवा ते अनुत्तीर्णच होतात. कारण, मुलाखत द्यायचे तंत्रच त्यांना माहिती नसते. मनोज सानप हे सुविधांपासून वंचित असलेल्या, गरजू विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र विनामूल्य शिकवतात. आज मनोज सानप यांचे शंभरच्या वर विद्यार्थी सैन्यात अधिकारी आहेत आणि दोनशेच्या वर विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजू आहेत. शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला असा अर्थ देणारे मनोज सानप यांचे कर्तृत्व खरेच लक्षणीय आहे.
 

मनोज यांना तसे तर सैनिक व्हायचे होते. पण, काही कारणास्तव त्यांना सैनिक होता आले नाही. त्यावेळी त्यांनी ठरवले की, ज्या कोणत्या क्षेत्रात जाऊ, तिथे ‘देव, देश अन् धर्मापायी शिर घेतले हाती’ अशीच वृत्ती, असाच संकल्प ठेवायचा. त्यामुळेच शासकीय पदावर विविध जबाबदार्‍या भूषवताना काही ठिकाणी त्रासही झाला. एका ठिकाणी कार्यरत असताना खोटी बिले पास केली नाही म्हणून महिला सहकारीने विभागनिहाय तक्रार केली. यामुळे ते ज्या विभागात कामाला होते तो विभाग, कुटुंब, समाज या सगळ्यांवर या घटनेेचे पडसाद उमटले. दीड वर्षे काटेकोरपणे चौकशी सत्र सुरू होते. पण, मनोज डगमगले नाहीत. कित्येक सहकारी, वरिष्ठ म्हणायचे, “महिलेच्या बाजूनेच निकाल लागतो.” यावर मनोज म्हणायचे, “सत्य आणि न्याय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी चुकीचे वागलो नाही, तर मी का घाबरू? मी नीतिमत्तेने वागत प्रशासनाचे नियमच पाळले आहेत. जिथे समाजाचे देशाचे नुकसान होते, तिथे मी आवाज उठवणार, मग मला कितीही त्रास होवो.” या काळात मनोज यांचे वडील शिवाजी आणि आई सुमन, तसेच पत्नी रेखा हे तिघेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पण, तरीही समाजात कुजबूज असायची, न केलेल्या कृत्याबद्दल मनोज यांना दोषी धरत. मनोज यांचे मन निराशेने भरून जाई. मग वडिलांचे म्हणणे आठवे की, “बाळा फळे लागलेल्या झाडाला लोक दगड मारतात, म्हणून झाड सावली द्यायचे सोडत नाही की, फळे द्यायचेही सोडत नाही, तसेच आपलेही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपला स्वभावधर्म सोडू नये. प्रामाणिकपणे काम करत राहावे. आपण आणि वरचा तो परमेश्वर आपल्या कृत्याला साक्षी असतो. तो बर्‍या, वाईटाला न्याय देतो.” वडिलांचे हे म्हणणे मनोज यांना धीर देत असे. पण, याच काळात वडिलांचे निधन झाले. मग लोकांचा जोर वाढला की बघा, मुलाच्या कर्तृत्वाने वडिलांना त्रास झाला. पण, त्यानंतर काही महिन्यांतच त्या घटनेचा निकाल लागला आणि मनोज पूर्णतः निर्दोष आहेत, हे सिद्ध झाले. त्यावेळी मनोज न जाणे कितीतरी वेळ वडिलांच्या फोटोसमोर बसून रडले. कारण, हा लढा मोठा होता. केवळ पुरुष म्हणून एखादा बिनबुडाचा आरोप होणे आणि त्यात वर्षे वाया जाणे, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक प्रतिष्ठा पणास लागणे, हा मोठा लढा होता. हा लढा मनोज जिंकले.
 
मनोज यांचे वडील शिवाजी सानप हे सामाजिक समरसता मंचचे खंदे कार्यकर्ते. समाजात जातीभेद संपावा, समरसता यावी म्हणून शिवाजी यांनी अख्खी हयात घालवली. सानप कुटुंब कामानिमित्त मुंबई गोवंडीला स्थायिक झालेले. शिवाजी हे एका शाळेचे मुख्याध्यापक, तर सुमन यासुद्धा शिक्षिका. हे कुटुंब जिथे राहात होते, त्याच्या पाठीमागेच अण्णाभाऊ साठे नगर आहे. त्या नगरामध्ये बहुसंख्य वस्ती ही मातंग आणि पारधी समाजाची. सानप कुटुंब वंजारी समाजाचे. पण, ते या अण्णाभाऊ साठे नगराशी एकरूप झाले. मनोज यांच्या मनावर एकदा अशाच एका घटनेचा परिणाम झाला. या वस्तीतील काही महिलांचा घोळका रडत रडत घरी आला. त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांना पोलिसांनी पकडले होते. यावेळी क्षणाचाही विचार न करता शिवाजी म्हणाले, “मी या सगळ्यांना सोडवेन. पण, एक अट आहे, उद्यापासून तुमच्या सगळ्यांची मुले शाळेत यायला हवीत. ते चांगले शिकून मोठे होतील, मी त्याचीही हमी देतो.”
 
मनोज म्हणतात, “बाबा सगळ्या लोकांना सोडवून घेऊन आले. दुसर्‍या दिवशी त्या सगळ्यांची मुलं बाबांच्या शाळेत शिकायला गेली. त्यातली एक-दोन सोडली, तर सगळीच मुले नावारूपाला आली आहेत. चांगली कामे करून कुटुंबाला सांभाळत आहेत. बाबा समरसतेचे पुजारी होते. त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे. समाजाची प्रगती व्हावी, समाज समरस व्हावा, यासाठी मला कार्य करायचे आहे, जमेल तसे मी ते करत असतो.”
 
 

@@AUTHORINFO_V1@@