मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक यादरम्यान झाली तर काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होईल, अशी भीती काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. देशातील आजच्या एकूणच राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणे हे घातक ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या पक्ष नेतृत्व संदर्भात मागील काही दिवसांत देशातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याविषयी निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावरून देशभरात काँग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. दिल्ली येथे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पदावर तुर्तास राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर पडदा पडला होता. मात्र पुन्हा त्यावर चर्चा सुरू झाल्याने निरुपम यांनीही ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे.