समाजाभिमुख शिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2020
Total Views |
Education_1  H





आमची शिक्षणव्यवस्था कोरोनामुळे होणार्‍या सामाजिक बदलांना सामोरे जाण्यासाठी कशी बदलता येईल, याचा विचार केवळ राज्य अथवा केंद्रीय व्यवस्थेवर न सोडून देता, स्थानिक शिक्षण संस्थांना सहभागी करून एकंदरच शिक्षण समाजोपयोगी कसे करता येईल, याचा विचार आपण करायला पाहिजे.






गेल्या जवळपास सहा महिन्यांत कोरोनाने सर्व जगाचा चेहरामोहरा पार पालटून टाकला. कोरोनाचा प्रादुर्भाव या पुढेही दोन वर्षे राहील, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. या दोन वर्षांमध्ये जग कसे बदलत जाईल, याची दखल घेऊन राष्ट्रीय तसेच व्यक्तिगत स्तरांवर आपण पुढच्या योजना आखायला पाहिजेत. तसेच एक चांगली घटना या दरम्यान शिक्षणक्षेत्रात घडली. केंद्र शासनाने नवे शिक्षण धोरण जाहीर केले. त्यानुसार पदवी परीक्षेतील लवचिकतेबरोबरच अभ्यासक्रमातही आवडीचे विषय निवडताना स्थानिक पातळीवरील तंत्रे आणि छंदांच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. आजवर वर्ग आणि खासगी क्लासेसमधून दिल्या जाणार्‍या चाकोरीबध्द शिक्षणाला वर्गबाह्य (Extra-mural) प्रशिक्षणाची जोड देऊन ते समाजाभिमुख करण्याची आवश्यकता त्यात प्रतिबिंबीत होते. आता प्रश्न असा आहे की, आमचे अध्यापक, प्राध्यापक लोक या परिवर्तनाला योग्यरित्या कितपत सामोरे जाऊ शकतील? आजवर वर्ग आणि क्लासेसमधूनतीच ती सोडविलेली (solved) उदाहरणे आणि चाकोरीबद्ध अभ्यासक्रम हा वर्ग रेटत राहिला आहे. तो नव्या अपेक्षित बदलांना सामोरे जाण्याची मनोवृत्ती कशी आत्मसात करू शकेल?



‘कोरोना’चा सामना

कोरोनाचे दूरगामी परिणाम अभ्यासणे, त्याचा विविधांगी अभ्यास करणे यातून ती शैक्षणिक कोंडी कशी फोडता येईल हे पाहू. कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर अंदाज वर्तविले जात आहेत. ते आपल्या शिक्षकवृंदांनी जिल्हा अथवा शहर पातळीवर का वर्तवू नयेत? त्यासाठी उपयुक्त असलेली आलेख आरेखनाची (Curve fitting) सांख्यिकीय तंत्रेआणि पर्याय नेहमीच्या अभ्यासक्रमात शिकविले जातात. आपले शिक्षकवृंद यात भर घालू शकतील. आजकाल प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमधून गणित, विज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान इ. छंद जोपासणारी मंडळे असतात. त्यांनी आपापसात क्षेत्रवार वाटणी करून जिल्हा अथवा शहरागणिक असे विश्वसनीय अहवाल तयार केले, त्यांचे निकाल एकमेकांशी आणि वास्तवातील संख्यांशी जुळतात का, हे जरी तपासत राहिले तरी एक वर्गबाह्य प्रशिक्षणाचा अनुभव शिक्षकवृंद आणि सहभागी विद्यार्थ्यांना मिळू शकेल. यात विषयागणिक मंडळांशी संबंधित विद्यार्थी जे काम करतील, त्यांना गुण देण्यासाठी स्थानिक शिक्षणसंस्था सहभागी असतील. यातून जी सांख्यिकीय माहिती गोळा होईल ती शासनालासुद्धा पुढच्या योजनांसाठी कामी पडू शकेल. कोरोनातून मुक्त झालेले जे लोक आहेत, त्यांनी काय औषध योजना केली, योग, आयुर्वेदिक, होमियोपॅथी आणि अ‍ॅलोपॅथीचे उपचार करून बरे झालेल्यांच्या औषधांचे संकलन, अभ्यास आणि योग्य उपाययोजना इ. त्यांच्या संपर्कात न येता केलेला सांख्यिकीय अभ्यास कोरोनाबाबतच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल.




सामाजिक प्रकल्प

कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ झोपडपट्ट्यांमधून जास्त असतो की तेथे राहणारे लोक इतर वस्त्यांपेक्षा लवकर प्रतिकारशक्ती विकसित करतात किंवा उच्चभ्रू वस्त्यांमधून कोरोनाचा फैलाव कोणत्या कारणाने झपाट्याने होऊ लागला, अशा समाजशास्त्रीय प्रश्नांची उकल पुढील योजना करण्यासाठी उपयोगी ठरावी. ‘धारावी पॅटर्न’ आता जगात गाजतो आहे. त्यावर ठोकळेबाज उत्तरे शोधण्यापेक्षा असे स्थानिक पातळीवरील अध्ययन अधिक समाजोपयोगी ठरेल. कोरोना विलगीकरण स्थानांचा अभ्यास, वैद्यकीय सेवांचे, सेवा देणारे आणि घेणारे यांच्या प्रतिक्रिया, सर्वसामान्यांचे, छोट्या विक्रेत्यांचे प्रश्न, त्यांच्या असंख्य अडचणी यातून आपल्या समाजाला मार्ग काढायचा आहे. त्याचवेळी एकाकीपणा, विद्यार्थ्यांची आणि पालकांची आजवर कधीही इतकी जवळीक होण्याचे प्रसंग आजवर आले नव्हते. हे पुढे वर्ष-दोन वर्षे चालणार आहे. त्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम, त्यावर काय उपाययोजना करायची हेही आताच ठरवावे लागेल. त्यासाठी निरनिराळ्या पातळ्यांवर तो बदल जाणून घ्यावा लागेल. हे सर्व नव्या अभ्यासक्रमांतर्गत कसे घडवून आणायचे?


क्रीडाक्षेत्रावर कोरोनाचा मोठा परिणाम होणार आहे. पुढे ढकलल्या गेलेल्या २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये तो परिणाम दिसेल असे वाटते. एक वेळ वैयक्तिक खेळांमध्ये प्रावीण्य मिळविणे शक्य होऊ शकेल, पण सामूहिक खेळांतील प्रावीण्याचे काय? त्यासाठी आजकाल उपलब्ध असलेले आणि डोळे आणि अंगठ्यांच्या भरवशांवर खेळले जाणारे गेम्स पुरे पडणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण शरीराचा वापर करयाला लावणारे आणि एकत्र न येता योग्य तो सराव करून घेणारे सामूहिक ‘व्हर्च्युअल गेम्स’ प्रगत करावे लागतील. आयटी, एई आणि क्रीडाक्षेत्रातील तज्ज्ञ आणि शिक्षकांसाठी ते मोठे आव्हान आहे.


तंत्रज्ञान क्षेत्रात तर हजारोंच्या संख्येने आयात होणार्‍या चिनी उत्पादनांना पर्यायी तंत्रज्ञान शोधण्याचे मोठे आव्हान लाखोंच्या संख्येत असलेल्या सर्व स्तरांतील तंत्रप्रशिक्षण संस्थांपुढे आहे.


सामाजिक स्तरावर जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न शासकीय प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनात ढिलाई येईल हे नागरिक धरून चालले आहेत. मात्र, असेच चालू राहिले तर पुढे जाऊन त्याचे असंतोषात रूपांतर होईल. तेव्हा उपस्थिती कमी ठेवूनसुद्धा प्रशासनाची कार्यक्षमता वाढवित राहण्याचे आव्हान केवळ शासकीय व्यवस्थेवर टाकून चालणार नाही. त्यासाठी हजारोंच्या संख्येने असलेल्या मॅनेजमेंट(व्यवस्थापकीय) शिक्षणसंस्थांनी पुढे आले पाहिजे. त्यांचे प्रयत्न व्यवस्थापन शिक्षण लोकाभिमुख करण्यात योगदान करतील. असे लोकोपयोगी अनेक प्रकल्प स्थानिक स्तरांवर घेता येतील. मला तर व्यक्तिगत स्तरावर नव्या शैक्षणिक धोरणाला धरून प्रत्येक क्षेत्रात आव्हाने आणि मार्ग दिसत आहेत.




तत्त्वज्ञानाच्या बदलत्या कक्षा

कोरोनाचा अजाणतेपणी आमच्या भावनिक जीवनावर परिणाम होतो आहे. आपापसातील भावनिक नाती बदलत आहेत. कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त झाली, तर दोन हात अंतर ठेवून तिला कसे सावरायचे? मृत संस्कार हे सर्वच समाजांमध्ये महत्त्वाचे मानले जातात. त्यासाठी उपस्थित राहणे, कुटुंबाला भावनिक आधार देणे इ. करण्याचे सामाजिक बंधन होते. आज कोरोनाने मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना घरी न आणताच परस्पर दहन केले जाते. त्याचा भावनिक धक्का बसतो. त्याला केवळ वास्तवतेचा मुलामा न देता खरे सांगायचे तर नवे जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रगत करण्याचे आव्हान, शिक्षण क्षेत्रात जे तत्त्वज्ञान शाखेशी संबंधित आहेत त्यांच्यापुढे आहे. त्या आव्हानांची त्यांना जाणीव व्हायला पाहिजे. इथेच शिक्षण लोकाभिमुख होण्याचा कस लागेल.


आमची शिक्षणव्यवस्था कोरोनामुळे होणार्‍या सामाजिक बदलांना सामोर जाण्यासाठी कशी बदलता येईल, याचा विचार केवळ राज्य अथवा केंद्रीय व्यवस्थेवर न सोडून देता, स्थानिक शिक्षण संस्थांना सहभागी करून एकंदरच शिक्षण समाजोपयोगी कसे करता येईल, याचा विचार आपण करायला पाहिजे. नवी शिक्षण नीति त्या बदलासाठी उत्प्रेरक (catalytic) बनविण्याची गुरूकिल्ली तसे पाहिले तर स्थानिक शिक्षण संस्थांच्या प्रत्यक्ष सहभागात आहे.




- डॉ. प्रमोद पाठक
(लेखक रसायन तंत्रज्ञ आणि प्राच्यविद्या विशारद आहेत.)


 
@@AUTHORINFO_V1@@