कोकणची ‘वनरागिणी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2020   
Total Views |
priyanka_1  H x





कोकणभूमीला लाभलेला वन आणि वन्यजीव संपत्तीचा ठेवा जपण्यासाठी कार्यशील असलेल्या रत्नागिरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पंढरीनाथ लगड यांच्याविषयी...



कोकणच्या मातीत वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी झटणारी ही ‘वनरागिणी.’ वन विभागाच्या आपल्या पहिल्याच कार्यक्षेत्रात त्या उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांच्या त्या पाईक आहेत. म्हणूनच वन विभागासारख्या पुरुष अधिकार्‍यांची संख्या अधिक असणार्‍या विभागात ‘त्या’ आज एक सक्षम अधिकारी म्हणून पाय रोवून खंबीरपणे उभ्या आहेत. प्रसंगी वन्यजीवांचा हल्ला झेलून ‘मानव-वन्यजीव संघर्षा’मुळे निर्माण होणारा कठीण प्रसंगही त्या वेळीच सावरतात. शिकार्‍यांना गजाआड करतात. अशी ’कोकणची वनरागिणी’ म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड.


बीडमधल्या मादळमोही या खेड्यात दि. २३ ऑगस्ट, १९८८ साली प्रियांका यांचा जन्म झाला. त्यांची आई शिक्षिका आणि वडील पंढरीनाथ लगड शेतकरी व राजकारणात सक्रिय होते. जातीभेद न करणे, स्त्री-पुरुष समानता या विचारांना प्रोत्साहन देणार्‍या कुटुंबात प्रियांका यांचा जन्म झाला. त्यामुळे मुलींनीही उत्तम शिक्षण घेऊन भविष्यात उज्ज्वल कामगिरी करावी, अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. पंढरीनाथ हे जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती असल्याने त्यांची प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये उठबस होती. प्रियंका पाचवी इयत्तेत शिकत असताना वडील त्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीसाठी घेऊन गेले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांचा रुबाब आणि शिस्त पाहून प्रियांका यांनी मनोमन आपणही शासकीय अधिकारी व्हायचे ठरवले.


बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर बायोटॅक्नोलॉजीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रियांका यांचा राजकारणात प्रवेश झाला. महाविद्यालय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी दोन वर्ष गेवराई गावाच्या पंचायत समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांचे प्रशासकीय अधिकार्‍यांशी जवळचे संबंध आले. आपणही लहानपणी शासकीय अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न त्यांना खुणावू लागले. त्यासाठी त्यांनी राज्य आयोगाच्या परीक्षांना बसण्याचा निर्णय घेतला. एमपीएसस्सीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी योगायोगाने वन विभागात रुजू होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी आव्हानात्मक होता. कारण, वन विभागातील कामाची पद्धत, तिथली प्रशासकीय रचना यांची त्यांना काहीच कल्पना नव्हती.


२०१६-१८ दरम्यान प्रियांका यांचे वन विभागातील प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणादरम्यानच त्यांना वन विभागातील खडतर कामांची जाणीव झाली. या प्रशिक्षणदरम्यान पुरुषांच्या बरोबरीएवढेच प्रशिक्षण महिला अधिकार्‍यांनाही देण्यात येते. त्यामुळे भविष्यातील आपल्या कामामधील आव्हानाची कल्पना त्यांना मिळाली. प्रशिक्षणाअंती त्या २०१८ मध्ये सिंधुदुर्ग वन विभागात रुजू झाल्या. त्या ठिकाणी महिनाभर काम केल्यानंतर १७ मार्च, २०१८ रोजी त्यांची नियुक्ती रत्नागिरीत वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून झाली. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील वन आणि वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी त्या सध्या सांभाळत आहेत.

रत्नागिरीत नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका यांच्यासाठी कोकणची भौगोलिक रचना, इथले सागरी आणि वन अधिवास नवीन होते. याची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना आपल्या स्थानिक अनुभवी वनपाल, वनरक्षक आणि वनमजुरांची मदत मिळाली. पक्षीनिरीक्षणात रस असल्याने त्यांनी स्थानिक पक्षीतज्ज्ञ आणि पक्षीनिरीक्षकांच्या बरोबरीने आपले वनपरिक्षेत्र पिंजून काढले. कातळशिल्प, कासव संवर्धनाच्या कामाची माहिती जाणून घेतली. नियुक्तीनंतर काही दिवसांमध्येच त्यांना बिबट्या बचावाचे प्रकरण हाताळावे लागले. हे प्रकरण हाताळणे त्यांच्यासाठी तसे आव्हानात्मकचे होते. कारण, त्यांच्याकडे बिबट्या बचावाचा काहीच अनुभव नव्हता.

रत्नागिरी वनपरिक्षेत्रातील शेलारवाडी गावात सापळ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे प्रकरण त्यांच्या समोर आले. रात्रीची वेळ आणि त्यातही डोंगराळ परिसर असल्याने बिबट्याला सापळ्याबाहेर काढणे मुश्किलीचे काम होते. अशा स्थितीत बचाव कार्य सुरळीत पूर्ण व्हावे म्हणून, त्यांनी संयम दाखवून बिबट्याला वाचविण्याचे काम सकाळी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पहाटे त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने बिबट्याला सुखरुप सापळ्याबाहेर काढून त्याला जीवदान दिले. पावस मार्गावरील दुचाकीस्वारांवर सातत्याने होणार्‍या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे मानव-बिबट्या संघर्ष चिघळला होता. या परिस्थितीत प्रियांका यांनी त्याठिकाणी सातत्याने गस्त घालून नियोजनात्मक कारवाई केल्याने बिबट्याचे हल्ले कमी झाले. काही महिन्यांपूर्वी बिबट्या बचाव कार्यादरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. रत्नागिरीतील निवळी गावात बिबट्या शिरल्याची वार्ता समजल्यावर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. बिबट्याचा शोध घेत असतानाच बांधामागे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. मात्र, अशा परिस्थितीतही प्रसंगावधान राखून त्यांनी बिबट्या जेरबंद केला. दुदैवाने उपचारदरम्यान हद्यविकाराच्या झटक्याने त्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शल्य अजूनही त्यांच्या मनात आहे.

वन्यजीव शिकारीच्या घटनाही प्रियांका यांनी उघडकीस आणल्या आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी बिबट्याची नखे काढून त्याला पुरल्याप्रकरणी तीन स्थानिक आरोपींच्या मुसक्या आवळल्या. वनसंवर्धनाच्या या कामात त्यांना आई-वडील आणि पती सुरेंद्र भोंडवे यांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्या मानाने वन विभागात नवख्या असल्याने त्यांना आपल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळत आहे. शिवाय, हाताखालील अनुभवी वनकर्मचार्‍यांकडूनही त्या शिकत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!






@@AUTHORINFO_V1@@