कार्यक्रमातून प्रबोधनाकडे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2020
Total Views |
Vedh_1  H x W:





वादळ येते ते केव्हातरी शमणारे असते. संकटे येतात तीसुद्धा कधीतरी नाहीशी होणारी असतात. पण, आलेली संकटे माणसाला खंबीर बनवून जातात. म्हणून त्यापासून काही बोध घेणे आवश्यक असते. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांचे गणपती असोत किंवा घरगुती गणपती असोत, अनेकांनी त्यापासून बोध घेतला आहे, असे सध्या तरी दिसत आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना विषाणू नावाच्या संकटाने सर्व प्रकारचे निर्बंध आणले. गणेशमूर्ती आमगनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी ढोलपथक हे समीकरण झाले होते. त्यामुळे किमान १५ दिवस अगोदर ढोलपथकांच्या तालमी सुरू व्हायच्या. बरोबर तिन्हीसांजेला त्यांची तालीम सुरू व्हायची. दिवेलागणीच्या वेळेला होणारा त्यांचा आवाज आजूबाजूच्या रहिवाशांना त्रासदायक ठरायचा. त्यामुळे पथकवाल्यांच्या नावाने बोटे मोडायला सुरुवात व्हायची. येथूनच गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या नापसंतीला सुरुवात व्हायची. पुढे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचा धांगडधिंगा सर्वश्रुत आहेच. परंतु, यंदा कोरोना नावाच्या संकटाने सर्वांना विचार करायला आणि कार्यक्रमात बदल करायला भाग पाडले. खरेतर जनतेच्या प्रबोधनासाठी, स्वातंत्र्याच्या जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणला. मात्र, स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचे बदलत जाणारे स्वरूप लक्षात घेतले असता लोकमान्यांना खरोखरच यातना होत असाव्यात. म्हणूनच त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षातच कोरोना नावाचे संकट जगावर घोंगावले आणि त्याचा नि:पात होण्यासाठी अनेक सण-उत्सवांबरोबरच गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातही बदल करावा लागला. त्या बदलाचे अगदी ९९ टक्के जनतेने स्वागत केले, असे जाणवते. महापालिकेच्या निर्बंधामुळे का होईना, मंडळांनी आणि भाविकांनी बदल स्वीकारले. अगदी मूर्तीच्या उंचीपासून मंडपाच्या आकारापर्यंत आणि आगमन ते मूर्ती विसर्जनाच्या स्थळापर्यंत अनेकप्रकारे बदल करण्यात आले. त्यामुळे उत्सवपासून लांब गेलेल्या मंडळींनासुद्धा गणेशोत्सव हवाहवासा वाटू लागला, हे त्या बदलाचे यश आहे. यंदा अनेक सार्वजनिक गणेशमूर्तीही दीड दिवसाने विसर्जित करण्यात आल्या. ज्यांनी परंपरा आणि भक्तिभाव म्हणून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली असेल, त्यांनी योग्य निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. लोक संकटापासून काही शिकले आणि त्यांनी स्वतःत बदल घडवून आणले. हेच प्रबोधन पुढे प्रवाहित व्हावे हीच सदिच्छा!

इशारे नकोत, कृती हवी!

पावसाळा हा ऋतू सर्वांना हवाहवासा असला तरी अनेकांना काळजीत टाकणारा असतो. कारण, त्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असते. प्रत्येक श्वास त्यांच्यासाठी नवीन जीवन असते. मुंबईत अशा अनेक इमारती जीर्ण झालेल्या आहेत. त्यांमध्ये राहणार्‍या प्रत्येक रहिवाशाच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. मृत्यूला कवटाळूनच ते जगत असतात. प्रत्येक पावसाळ्यात इमारत किंवा इमारत कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडतात. सरकार मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देते. महापालिका वारंवार इशारेही देते. पण, कालांतराने सर्वकाही शांत होते. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या!’ यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळून मृत्यूच्या घटना घडल्या नव्हत्या. परंतु, ऑगस्टच्या सुरुवातीला एका घराचा भाग नाल्यात कोसळून चौघी वाहून गेल्या, त्यामुळे एकीचा झालेला मृत्यू ही पावसाळ्यातील पहिली घटना. त्यानंतर २७ ऑगस्टला नागपाड्यात इमारतीच्या भाग कोसळून दोन मृत्यू झाले. नागपाड्यातील सुकलाजी स्ट्रीटजवळील कोसळलेली इमारत म्हाडाची उपकरप्राप्त इमारत आहे. इमारत जुनी झाल्याने म्हाडाने २०१७ साली या इमारतीच्या पुनर्विकासासाठी बिल्डरला एनओसी दिली होती. २०१९ मध्ये म्हाडाने संबंधित बिल्डरला एनओसी देऊनही इमारतीचा पुनर्विकास का केला नाही, याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र, त्यानंतरही या इमारतीच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईत २०१३ ते २०१९ या सात वर्षांत तब्बल ३,९४५ इमारती व इमारतींचे भाग कोसळून ३०० रहिवाशांना जीव गमवावा लागला आहे, तर १,१४६ जण जखमी झाले आहेत, तर अशा दुर्घटनांमध्ये मागील वर्षभरात ५० हून अधिक रहिवाशांचा बळी गेल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. अंधेरी पूर्व येथे बिल्डरच्या दुर्लक्षामुळे पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास गेली १२ वर्षांहून अधिक काळ रखडला आहे. तेथे अनेक वसाहती जीर्ण असून कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. म्हाडाने बिल्डरला रहिवाशांच्या स्थलांतराची नोटीस दिली आहे. मात्र, बिल्डर सुस्त आहे. भविष्यात तेथे जीवितहानी झाल्यास इशारे देण्यात येतील. पण, त्याचा उपयोग नाही. आता कृतीच आवश्यक.



- अरविंद सुर्वे


@@AUTHORINFO_V1@@