सह्याद्रीची लेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2020   
Total Views |
rfo sheetal rathod _1&nbs




सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये निर्भीडपणे वनसंवर्धानाचे काम करणार्‍या वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल अमरसिंग राठोड यांच्याविषयी...
 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  वन अधिकार्‍यांच्या आयुष्याला वणव्यात स्वत:ची राख होण्याचे किंवा वनतस्करांचा सावज होण्याचे ग्रहण लागलेलेच असते. त्यातही महिला वन अधिकार्‍यांच्या सेवेत बर्‍याच अडचणींचे काटे पेरलेले असतात. या अडचणींवर मात करुन वनतस्करांच्या मुसक्या आवळणारी आणि वन गुन्हेगारांवर जरब बसवणारी एक ’सह्याद्रीची लेक’ आहे. सह्याद्रीच्या खोर्‍यात राबणारी कुशल आणि कार्यशील अधिकारी म्हणून त्यांची आज ओळख तयार झाली आहे. वन विभागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही कर्तव्यदक्षतेने काम करू शकतात, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. अशी ही ’सह्याद्रीची लेक’ म्हणजे सातार्‍याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात शीतल यांचा जन्म झाला. शेतीवर उदरनिर्वाह असणार्‍या कुटुंबात जन्म झाला असला, तरी त्यांचे वडील हे उच्चशिक्षित होते. त्यामुळे आपल्या मुलांनाही उत्तम शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. शीतल यांनी वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यांनी विज्ञान शाखेतून ’एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी’ ही पदवी मिळवली. त्यानंतर अनेक नोकर्‍या त्यांच्यासमोर चालून आल्या. मात्र, आयुष्यात काहीतरी आव्हानात्मक करण्याची ओढ त्यांच्या मनात होती. याच दरम्यान त्यांनी आवड म्हणून शिक्षणशास्त्राची पदवी मिळवली. ‘सेट’ची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर काही वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरीही केली. याच कालवधीत २०११ साली ’एमपीएससी’ची परीक्षा देण्याचे त्यांनी ठरवले आणि पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.
 
 
२०१२ साली राज्य आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘पीसएआय’ क्षेत्राकडे न वळता त्यांनी आपल्या विज्ञान शाखेची पार्श्वभूमी ओळखून वन विभागात रुजू होण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात पालनपोषण झाल्याने निसर्ग आणि जंगलाशी त्यांची ओळख होतीच. २०१४-१५ मध्ये वन विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट, २०१५ साली त्या वन विभागात रुजू झाल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सामाजिक वनीकरणाअंतर्गत त्यांनी वर्धा जिल्ह्यात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑगस्ट, २०१८ मध्ये त्यांची बदली सातार्‍यात झाली आणि सातार्‍यामधील त्यांची सुरू असलेली कारकिर्द सध्या गाजत आहे.
 
 
सातार्‍याला लागूनच असलेल्या सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये वन संवर्धनाचे काम करणे कठीण आहे. इथल्या डोंगररांगा, उंच कडे, खोलगट दर्‍या तुमची शारीरिक आणि मानसिक अग्निपरीक्षा घेत असतात. त्यामुळे अशा वनक्षेत्रात रुजू झाल्यानंतर शीतल यांनी सर्वप्रथम हा परिसर पिंजून काढला. तेथील पर्यावरणीय परिसंस्थेची माहिती करुन घेतली. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्यास प्राधान्य दिले. जंगलतोड, वन्यजीवांची शिकार आणि तस्करी यांची माहिती जाणून घेतली. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जंगलातून होणारी वनतस्करी, अवैध वृक्षतोड रोखताना त्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. सुरुवातीच्या काळात शिकारी आणि विद्युत कुंपणांवर त्यांनी बेधडक कारवाई केली. त्यांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे परिसरामध्ये त्यांचा दबदबा निर्माण झाला आणि वनतस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
 
 
‘लॉकडाऊन’ मधील कालवधी हा त्यांच्या कार्यकुशलतेची परीक्षा घेणारा ठरला. कारण, या कालावधीत रात्रीच्या गस्तीवेळी त्यांनी शिकारी, लाकूड तस्करांचा सामना करावा लागला. एप्रिल महिन्यात त्यांनी मध्यरात्री शिकार्‍यांचा पाठलाग करुन सात जणांना गजाआड केले. त्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जंगलात गस्त घालताना त्यांना काही संशयित दिसले. वनअधिकार्‍यांना पाहिल्यानंतर संशयितांनी दुचाकीवरुन पळ काढला. रात्री सुमारे तीन तास पाठलागाचा खेळ संपल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली. याच महिन्यात त्यांनी कळंबे येथील एका घरावर छापा टाकून सशाचे मांस शिजवत असतानाच आरोपीला रंगेहाथ पकडले. अंधाराचा आसरा घेऊन सुरू असलेल्या लाकूड तस्करीलाही आळा घातला. वन वणव्यास कारणीभूत असणार्‍या आरोपींना वेळीच अटक केल्याने वणवा भडकण्याच्या घटनांमध्ये घट झाली. शिवाय वणवा लावण्यार्‍यांवरही जरब बसला. जून महिन्यात त्यांनी शिकार्‍यांविरोधात केलेली जिल्ह्यातील आजतागायतची सर्वात मोठी कारवाई प्रचंड गाजली. या कारवाईत त्यांनी सातार्‍यातील पाडळी येथे शिकारीच्या साहित्यांसह १२ जणांच्या टोळीला अटक केली. शिकारी जाळे लावून जंगलात दबा धरुन बसलेल्या टोळीला वनकर्मचार्‍यांनी वेढा घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरल्या जाणार्‍या दहा जाळ्या, पाच वाहने असे साडेचार लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
 
 
वनसंवर्धनाच्या कामाबरोबरच त्यांनी लोकसहभागातून डोंगररांगामध्ये मातीचे बंधारे उभारुन जलसंधारणाची कामेही केली आहेत. या सर्व कामात उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे त्या सांगतात. शिवाय वन विभागातील आपल्या सहकार्‍यांशिवाय ही कारवाई करणे शक्यच नसल्याची कबुली त्या देतात. वन विभागातील या धाडसी कामाला त्यांचे पती संजीव चव्हाण आणि कुटुंबीयांची साथ मिळाली आहे. त्यांची मुलगी ऐंजल आणि मुलगा प्रिन्स या दोघांनाही आपल्या आईच्या कामाचे कौतुक आहे. वन विभागातील त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा! 

@@AUTHORINFO_V1@@