रणजी क्रिकेटचा बादशाह...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2020
Total Views |

mansa_1  H x W:



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी संधी न मिळाल्याने आपले संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी खर्ची घालणार्‍या रणजी क्रिकेटचे बादशाह राजिंदर गोयल यांची कहाणी सांगणारा हा लेख...



क्रिकेटमध्ये पारंगत प्रत्येक खेळाडूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या देशासाठी खेळणे हे एक मोठे स्वप्न असते. आपले हे ध्येय पूर्ण करण्यासाठी देशातील अनेक खेळाडू वर्षानुवर्षे जीवापाड मेहनत करतात. लहानपणापासून क्रिकेटच्या सरावाचे धडे गिरवणारे हे खेळाडू दिवस-रात्र मेहनत करून आपले स्वप्न पूर्ण करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू झाल्यानंतर त्यांचे हे स्वप्न अखेर पूर्ण होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू झाल्यानंतर खेळाडू जगभरात प्रसिद्ध होतात आणि नाव कमावतात. आपल्या देशासाठी खेळताना विविध विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर होते. या विक्रमांमुळे संपूर्ण जगभरात त्यांचे नाव होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मात्र, प्रत्येक खेळाडूंचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काहींचे नाही. ज्यांचे पूर्ण होते ते त्यांचे नावलौकिक होते. मात्र, काहींचे हे स्वप्न पूर्ण होण्यात संपूर्ण आयुष्य खर्ची जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू होण्यासाठी या खेळाडूंनीही तितकीच जीवापाड मेहनत केलेली असते. मात्र, ११ सदस्यांच्या संघात स्थान मिळेपर्यंत अनेकांची कारकिर्दच संपुष्टात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन क्रिकेट खेळण्याची संधी त्यांच्या नशिबी येत नाही. मात्र, यातूनही खचून न जाता ते क्रिकेटच्या खेळावर प्रेम करणे सोडत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी जरी मिळाली नसली तरी त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेक क्रीडाप्रेमींच्या मनात घर करून राहतात. इतकेच नव्हे तर या जगातून निरोप घेतल्यानंतरही त्यांची अनेक खेळाडूंकडून आठवण काढली जाते.




कसोटी क्रिकेट खेळू न शकलेले महान फिरकीपटू गोलंदाज राजिंदर गोयल हे त्यांपैकीच एक म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण, गोयल हे जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकले नसले तरी त्यांनी रणजीमध्ये केलेला विक्रम आजही अनेक वर्षांपर्यंत कायम असून अद्यापपर्यंत तो नावाजलेल्या खेळाडूंनाही मोडता आलेला नाही. गोयल यांनी आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये भारतातील रणजी क्रिकेट स्पर्धामध्ये १८.५८ मात्र, गोयल यांनी रणजी स्पर्धेत असा विक्रम केला आहे की, तो मोडणे आता कोणाच्याही आवाक्यापलीकडचा आहे. राजिंदर गोयल हे डावखुरे फिरकी गोलंदाज. त्यांची कारकिर्द फुलू लागली, त्यावेळी भारतीय क्रिकेट क्षितिजावर बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवासन वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर आदी प्रभावशाली खेळाडू भारतीय संघात होते. त्यामुळे या चौघांनाच प्राधान्याने भारतीय संघात स्थान मिळत गेल्यामुळे गोयल यांची संधी हुकली ती कायमचीच. मात्र, त्यांनी कधीही पर्वा केली नाही. ‘चांगली गोलंदाजी करत राहण्यापलीकडे काय करू शकत होतो?’ असे ते अनेकदा सांगायचे. याच विचारातून ते रणजी का होईना मात्र खेळत राहिले. अगदी विजय मांजरेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर अशा भिन्न वयांच्या फलंदाजांनाही त्यांची गोलंदाजी जरब वाटायची. पारंपरिक फिरकी गोलंदाज चेंडूला भरपूर उंची देतात. पण, गोयल फारशी उंची द्यायचे नाहीत. त्यामुळे चेंडू फलंदाजांपर्यंत झटकन यायचा. इंग्लिश फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांच्या काहीशी जवळ जाणारी ही शैली. या शैलीमुळे क्रीझ सोडून फलंदाजी हे पारंपरिक फिरकी गोलंदाजांविरुद्धचे हुकमी अस्त्र गोयल यांच्यापुढे वापरता यायचे नाही, अशी आठवण गावस्कर नेहमी काढतात. गोयल यांचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरायची. गोयल यांना कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, त्यांच्या गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाज समृद्ध बनले. फिरकी गोलंदाजांचेच नव्हे, तर फिरकी गोलंदाजी प्रभावीपणे खेळून काढणार्‍या फलंदाजांचेही नंदनवन भारत बनला यात गोयल यांच्यासारख्यांचे श्रेय आहे.




गोयल यांची खासियत म्हणजे त्यांनी कशाहीबाबत आणि कोणाहीविषयी कटुता बाळगली नाही. गोयल हरियाणाचे, बेदी दिल्लीचे. दोघांमध्येही अखेपर्यंत उत्तम दोस्ताना होता. ४३व्या वर्षी ते निवृत्त झाले, पण नंतरही निव्वळ खेळाच्या प्रेमापोटी विविध प्रकारे मार्गदर्शक म्हणून काम करत राहिले. स्थानिक क्रिकेट त्यांच्या परीने समृद्ध करत राहिले. गोयल यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना २०१७ साली ‘सी के नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित केले होते. अशा या महान खेळाडूने नुकत्याचा काही दिवसांपूर्वी वयाच्या 77व्या वर्षी त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात अनेक खेळाडूंनी दुःख व्यक्त केले. रणजी क्रिकेटचा बादशाह असणारा हा खेळाडू पुन्हा क्रिकेटविश्वाला मिळणे कठीण असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. गोयल यांच्या कर्तृत्वाला अखेरचा सलाम...

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@