काँग्रेसचे वर्तमान आणि शिवसेनेचे भविष्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2020
Total Views |


Maharashtra_1  



आज जे काँग्रेसचे वर्तमान आहे, तेच शिवसेनेचे भविष्य आहे. २०१४ साली या देशात एका नव्या राजकारणाची सुरुवात झाली. कर्तृत्व आणि नेतृत्वाचा कस लागणार्‍या या राजकारणाचे धुरंधर नेते म्हणून नरेंद्र मोदी समोर आले. आता त्यांनी खेचलेल्या निकषांच्या रेषा इतक्या ठळक आहेत की घराण्यांचे कितीही कौरव एकत्र आले त्या पुसता येणार नाहीत.

काँग्रेसमध्ये सध्या जे काही चालू आहे ते फारसे अनपेक्षित नाही. ‘हिंदू’ या दैनिकामध्ये एक अर्कचित्र प्रकाशित झाले आहे. गांधी टोपी आणि नेहरू जॅकेट घातलेले काँग्रेसचे कार्यकर्ते सोनियांच्या अंगावर कागदी विमाने टाकत आहेत आणि या कागदी विमानांची शांतीची प्रतीके असलेली पांढरी कबुतरे होऊन ती क्रमाने सोनिया गांधींच्या हातावर जाऊन बसत आहेत. काँग्रेसमधल्या बंडाळ्यांच्या वास्तव कथा सांगणारे हे अर्कचित्र आहे. काँग्रेसमध्ये जे तीन-चार गट पडल्याचे सांगितले जात आहे, ते खरे नाही. काही लोकांनी हायकमांडपर्यंत आपला आवाज पोहोचावा आणि तो एकदाचा पोहोचला. हायकमांडने एखादा कटाक्ष जरी टाकला तरी चिडीचूप व्हावे, असा हा किस्सा असतो. शरद पवारांसारख्यांनी थोडेफार पंख पसरले आणि बाहेर जायचे ठरविले तरी काँग्रेसच्याच जुन्या पिंजर्‍यात त्यांना परत जावे लागते. महाराष्ट्रात सध्या काहीही घडले तरी त्यावर रंजक भाष्य करून चॅनेल्सना जगविणार्‍या संजय राऊतांनी यावर स्वत:ची टिप्पणी केली असली, तरीही अशाच घटनाक्रमाचे बळी असलेल्या शरद पवारांनी मात्र अद्याप एकही शब्द काढलेला नाही. त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. सध्या महाराष्ट्रात जी काही तीन पायांची शर्यत सुरू आहे, ती संपेल आणि त्यांचा पक्ष या शर्यतीतून बाहेर पडेल. त्या रात्री शपथविधीला पोहोचलेल्या आमदारांचे यानंतर काय होईल, ते राष्ट्रवादी सोडून पटकन कुठे जातील, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे पवार चूप आणि राऊत नेहमीप्रमाणे सुटलेले अशी ही स्थिती आहे. पवार वगैरे मंडळींना माहीत आहे की, काँग्रेसमध्ये क्रमांक एकसाठी कधीही स्पर्धा नसते; ती असते ती नेहमी क्रमांक दोनसाठीच. पवारांसारख्या मंडळींनी आपल्यासाठी नंतरच काँग्रेसला राम-राम ठोकला, त्याचे हेच कारण मुळात पंतप्रधानपदाची शर्यत सुरू होते वयाच्या साठीनंतरच. वयाच्या सत्तरीकडे जाऊनही आणि भाट-चमच्यांनी कितीही बिरूदावल्या लावल्या तरीही हे पंतप्रधान पद पवारांकडे आले नाही. पवारांनी महाराष्ट्रात केल्या तशा करामती तिथेही केल्या असत्या तरी पंतप्रधानपद सोनिया गांधींकडेच गेले असते. युती-आघाड्यांच्या या राजकारणाला अटलजी ‘कही की इट कही का रोडा भानुमतीने कुणबा जोडा’ असे म्हणायचे.


 
देशाच्या क्षितिजावर आज काँग्रेस शरपंजरी दिसत असली तरीही जे काही कलेवर उरले आहे, त्यात काही राज्यांच्या सत्ता, काही महापालिका, काही जिल्हा परिषदा तर काही ग्रामपंचायतीही आहेत. या सत्तेच्या आधारावर स्वत:चे अस्तित्व टिकवून असलेल्यांचा एक मोठा गटही आहे. दिल्लीतून राजकारण करणार्‍यांच्या तुलनेत हे लोक आजही सक्रिय आहेत. आपल्या भविष्याचे काय, हा या मंडळींना सतावणारा प्रश्न आहे. या प्रश्नापोटी ही मंडळी हे बंडाचे झेंडे फडकवित आहेत. उरलेला गट आहे तो दिल्लीत गांधी पुराण सांगून महत्त्वाच्या जागा पटकावून बसलेल्यांचा. महाराष्ट्रात काँगेसचे पानिपत झाले असले तरी जिथे लोक अजूनही कायम आहेत, त्यातल्या एखाद्याला राज्यसभा देऊन पक्ष बळकट करण्यापेक्षा ती कुमार केतकरांच्या पदरात टाकण्यात आली. आता केतकरांनी इमानदारीत इतकी वर्षे जे काही केले हे त्याचे फळ आहेच, पण पक्षाला केतकरांचा आणि आता केतकरांना काँग्रेसचा काय उपयोग, हा प्रश्न उरतोच. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची पुण्याई गाठीशी असलेल्या इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या बलिदानाची पुरेपूर सहानुभूती मिळविलेल्या काँग्रेसची आज ही अशी स्थिती का असावी, याचे उत्तर अगदी उघड आहे. न फिरविलेल्या भाकरीची, घोड्याची आणि पानांची गोष्ट पवार उईमपणे सांगतात. मात्र, राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या जागांवर कुणाला बसविण्याची वेळ येते, तेव्हा ती व्यक्ती पवार कुटुंबीयांपैकीच असते.


काँग्रेसचे आज जे सुरू आहे ते आज ना उद्या घराण्यांचे ढोल वाजविणार्‍या सर्वच पक्षांचे होणार आहे. कुठलाही अनुभव नसताना अनुभवाच्या नावाखाली परीक्षा टाळून सोपे पेपर शोधणारे राजपुत्र आणून पक्षाच्या डोक्यावर आणून बसविणे, हा सगळ्याच घराण्याच्या पक्षांचा समान दुवा. आपला वारस कितीही अकार्यक्षम असला तरी तो कसा उत्तम आहे, हे ठणकावून सांगणारे भाट. वारसाच्या क्षमता वाढविण्यापेक्षा प्रश्न सोपे करण्याचा आटापिटा या सगळ्या प्रक्रियेचा जो काही परिणाम व्हायचा तो होतोच आणि शेवटी पक्ष अधोगतीला लागतो. काँग्रेस किंवा अन्य तत्सम पक्ष रसातळाला जात असतील, तर त्याचा खेद-खंत बाळगण्याची गरज नाही. कारण, देशासमोर आज जे प्रश्न उभे आहेत ते याच मंडळींच्या कर्तृत्वामुळे उभे आहेत. हिंदुत्वाची प्रखर अभिव्यक्ती असलेल्या शिवसेनेचेही अखेर तेच होत आहे, ही मात्र खेदाची बाब. तिथे कुमार केतकर असतील तर इथे प्रियांका चतुर्वेदी आहेत. या सगळ्यांची कमाल ही असते की, पक्षनेतृत्वाला हे काय सांगून राज्यसभा, विधानसभा मिळवतात हे कोणालाच सांगता येत नाही. शिवसेनेची लढवय्यी पिढी आता इतिहासजमा तर झालेलीच आहे, पण लोकांमधून निवडून येणार्‍यांपेक्षा मागच्या दाराने विधान परिषदेत अथवा राज्यसभेत पोहोचणार्‍यांचीच चलती आहे. मुलायमसिंह असो, लालू असो अथवा अन्य कोणी, ही सगळीच मंडळी एकेकाळी चळवळीत होती आणि तिथूनच राजकारणात आली. सत्ता मिळविणे हे कुठल्याही राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय; ते असायला हरकत नाही. मात्र, सत्तेबरोबर घराणेशाही आली की ते काय घडवून आणतात, त्याचा सध्या काँग्रेसमध्ये जे सुरू आहे तो उत्तम नमुना मानावा लागेल. काँग्रेसला सल्ला देणार्‍या किंवा माध्यमांत भलतेच काहीतरी बोलून, मनोरंजन करून मूळ प्रश्नांना बगल देणार्‍या संजय राऊत यांच्यासारख्यांना आपण सुपात आहोत याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. २०१४ साली या देशात एका नव्या राजकारणाची सुरूवात झाली. कर्तृत्व आणि नेतृत्वाचा कस लागणार्‍या या राजकारणाचे धुरंधर नेते म्हणून नरेंद्र मोदी समोर आले. आता त्यांनी खेचलेल्या निकषांच्या रेषा इतक्या ठळक आहेत की घराण्यांचे कितीही कौरव एकत्र आले त्या पुसता येणार नाहीत.

 
@@AUTHORINFO_V1@@