नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकरणीच्या बैठकीला सुरुवात होताच बैठकीतील वाद चव्हाट्यावर आला. राहुल गांधी यांनी या बैठकीत ज्या काँग्रेस नेत्यांनी पक्षातील सुधारणेसाठी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे, त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करत आक्षेप घेतला होता. यानंतर आता या आरोपावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संतप्त झाले आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी ट्विट करून राहुल गांधींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे जर मी भाजपाशी कुठल्याही प्रकारची हात मिळवणी केल्याचे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन, असे थेट आव्हानच गुलाम नवी आझाद यांनी दिले आहे. तसेच असे पत्र लिहिण्याचे कारण हे काँग्रेसची कार्यसमिती होती असंही त्यांनी सांगितले.काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे."जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावर भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात आला. आता गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते पूर्णवेळ पक्षाध्यक्षपदाची मागणी करत आहेत, तर त्यांच्यावरही भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात येत आहे. असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही" अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.