चीनशी बैठकीनंतर प्रश्न सुटला नाही तर लष्करी पर्याय तयार : जनरल बिपिन रावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2020
Total Views |
Bipin Rawat_1  


भारत-चीन वादावर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे मोठे विधान!

नवी दिल्ली : लडाख परिसरातील सीमेवर चीनकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात सध्या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही तर भारताला लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे, असे विधान संरक्षण दलांचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत यांनी व्यक्त केले. रावत यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'शांततेने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जर चीनशी बाचतिक करून हा वाद मिटवला गेला नाही तर लष्करी पर्यायही खुला आहे.’


१५ जून रोजी गलवानमध्ये भारत-चीन संघर्षानंतर लडाखमधील वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यासाठी भारत-चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये दोनदा बैठक झाली. या बैठकी ३० जून आणि ८ ऑगस्ट रोजी चिनी भागातील मोल्दो येथे झाल्या होत्या. या बैठकांनंतरही चीन फिंगर एरिया, देप्सांग आणि गोगरा येथून माघार घेण्यास तयार नाही.


भारत-चीन संघर्षादरम्यान बिपीन रावत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे. त्यांनी म्हटले की, लडाखमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीसंदर्भातील मुद्दा लष्करी चर्चा किंवा राजनैतिक पातळीवर न सुटल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय सैन्य आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.


जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. पँगाँग तलावाच्या परिसरात असणाऱ्या फिंगर ५ परिसरात चीनने मोठ्याप्रमाणावर सैन्य आणि युद्धसामुग्री तैनात केली आहे. चिनी सैन्याने या भागातून निघून जावे, अशी मागणी भारतीय सैन्याने वारंवार केली आहे.


एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सातत्याने बोलणी सुरु आहेत. मात्र, लडाखच्या अनेक भागांमध्ये भारतीय हद्दीतील सैन्य मागे घेण्यास चीन अद्याप तयार नाही.









@@AUTHORINFO_V1@@