राहुल गांधीनी सांगितल्यास महाविकास आघाडी सोडू : विजय वडेट्टीवार

    24-Aug-2020
Total Views |
Vijay vadettivar_1 &


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती; राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले मत


नागपूर : आज काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे बोलले जात आहे. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती आहे. सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले आहे.


गांधी परिवारातील व्यक्तीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा. राहुल गांधी यांनी चर्चा करुन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनवण्यासाठी संमती दिली होती. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सरकारमधून बाहेर पडत सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत, असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.


दरम्यान, राहुल गांधी यांना थेट अध्यक्ष बनवण्याची जोखीम काँग्रेस पक्ष सध्या घेऊ इच्छित नाही. तर, दुसरीकडे प्रियांका गांधीनीदेखील आगामी अध्यक्ष गांधी कुटुंबातला नसावा असे म्हंटले होते. सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास डॉ. मनमोहन सिंह, ए. के. अँटनी किंवा मुकुल वासनिक यांपैकी एका नेत्याला पक्षाचा अंतरिम अध्यक्ष बनवण्यात येऊ शकते, असे अनुमान लावले जात आहे. त्यानंतर करोनाचे संकट दूर झाल्यानंतर पक्ष पुन्हा राहुल गांधी यांच्या हाती पक्षाचे नेतृत्व सोपवेल असेही म्हटले जात आहे.


काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावे, यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आग्रही आहेत.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, असे या पत्रात म्हटले आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.