केईएम आणि नायरमध्ये ३२० जणांवर होणार चाचणी!
मुंबई : कोरोनावर तयार करण्यात आलेल्या लसीची उपयुक्तता सिद्ध करण्याच्या चाचणीसाठी मुंबईत अनेकजण उत्सुक असले तरी सुरुवातीला ३२० जणांवर चाचणी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देश कोरोनाची लस विकसित करत आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोरोना लसीच्या मानवी चाचण्या मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये होणार आहेत. ऑक्सफर्डच्या या लसीचे ३२० जणांना डोस दिले जाणार आहेत. सध्या मानवी चाचणीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
ऑक्सफर्डच्या या कोरोनाचा लसीच्या मानवी चाचणीत सहभागी होण्याकरिता अनेक जण स्वतःहून केईएम हॉस्पिटलला फोन करत आहेत. मात्र केईएम आणि नायरमध्ये होणाऱ्या या मानवी चाचणीला थोडा विलंब होत आहे. कारण या दोन्ही रुग्णालयाच्या नीतीविषयक समितीने या चाचणी संदर्भात अजून माहिती मागवली आहे. जेव्हा आवश्यक असलेली माहिती मिळेल तेव्हा समिती त्यावर चर्चा करणार असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले. या लसीची अजून भारतातील कोणत्याही केंद्रावर चाचणी सुरू झालेली नसून सर्वजण याबाबतच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस दिला जाईल. स्वयंसेवकांची निवड सरसकट केली जात आहे. त्याची आधी वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर त्यांची लसीचा डोस देण्यासाठी निवड केली जाते.