काँग्रेसमधला नेतृत्वपेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2020
Total Views |


Congress_1  H x
 



गांधी घराण्याला केंद्रस्थानी ठेवूनच काँग्रेसमध्ये सर्व घडामोडी होताना दिसतात व त्यामुळे पक्ष मात्र गलितगात्र झाल्याचे दिसते. तथापि, ही फक्त सुरुवात आहे, हा काँग्रेसचा वर्तमान नसून एका घराण्याचे तळवे चाटणार्‍या पक्षाचे काय होते, हे दाखवणारा ट्रेलर आहे. कारण, घराण्याच्या पुण्याईवर विसंबल्याने काय होते, हे दाखवणारा संपूर्ण पिक्चर तर अजून बाकी आहे.


पक्षाला उभारी देऊ शकणारा अध्यक्ष नसल्याने दिशाहीन झालेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी परिवर्तनाची मागणी करणारे पत्र नुकतेच कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदर सिंह हुड्डा, पी. जे. कुरियन यांच्यासह २३ नेत्यांनी हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले. पाच माजी मुख्यमंत्री, अनेक माजी मंत्री व खासदारांचा समावेश असलेल्या या ‘लेटर बॉम्बमुळे सोनिया गांधींनी तातडीने काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी यांनी आपण हंगामी अध्यक्षपद सोडण्यास तयार असल्याचेही सांगितले. मात्र, सोनिया गांधींनी अध्यक्षपद सोडल्यास पक्षाची जबाबदारी कोणाकडे द्यायची, हा प्रश्न पुन्हा एकदा काँग्रेससमोर उभा राहतो. कारण, अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये पडलेले अनेक गट व त्याबाबतची अनिश्चितता.


 
काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला तरी अध्यक्षपदावरुन चार गट पडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. एका गटाच्या मते, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, दुसर्‍या गटाच्या मते, प्रियांका गांधींनी पक्षाचा वारसा पुढे चालवावा, तिसर्‍या गटाच्या मते, सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावे (आणि त्या पुढील सहा महिन्यांसाठी हंगामी राहतील असे सोमवारी ठरलेही) तर चौथ्या गटाच्या मते गांधी-नेहरु घराण्याबाहेरचा माणूस नेतृत्वपदी यावा, अशी विभागणी झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, यातून सनदशीर मार्गाने केलेल्या स्वातंत्र्यलढ्याची पुण्याई गाठीशी असलेल्या पक्षाची एका कुटुंबाभोवतीच फिरल्याने चालू घडीला काय दशा झाली, याचा नमुनाही दिसून येतो. त्याचवेळी लोकमान्य टिळकांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकाच घरात सगळे महापुरुष जन्म घेऊ शकत नाहीत,’ असे टिळक म्हणाले होते आणि आताच्या काँग्रेससमोर गांधी घराण्यामुळे उद्भवलेल्या नेतृत्वपेचातून त्याचा हुबेहुब दाखला मिळतो.


 
सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात पूर्णवेळ आणि पक्षाला प्रभावी नेतृत्व प्रदान करणार्‍या अध्यक्षाची मागणी करण्यात आली. तथापि, या पत्रात कोणीही अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचे नाव घेतले नाही. कदाचित ते पक्षाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, याबाबत त्यांच्या मनात खात्री असावी. दुसरीकडे राहुल गांधीसुद्धा पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचेच दिसते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्ष खचलेला व कार्यकर्ते निराश झालेले असताना त्यांना धीर द्यायचा सोडून राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हे पाहता दुसरा गट प्रियांका गांधींनी काँग्रेसाध्यक्ष व्हावे, असे म्हणताना दिसतो. मात्र, हे सोनिया गांधींना कितपत मान्य होईल, हा एक कळीचा प्रश्न. कारण काँग्रेस पक्षावर गांधी-नेहरु घराण्याचाच ताबा राहावा, अशी सोनिया गांधींची प्रथमपासूनची इच्छा आहे, पण तो ताबा मुलीकडे नव्हे तर मुलाकडे असावा, असेही त्यांना वाटते. अशा परिस्थितीत तिसरा पर्याय पुढे येतो, तो म्हणजेच सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे व सध्यातरी त्याच पुन्हा एकदा हंगामी अध्यक्षा झाल्या. पण, सोनियांचे वय व प्रकृती पाहता त्या अध्यक्षपदी किती काळ राहतील, हे सांगता येत नाही. म्हणूनच काही नेते राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा देत गांधी-नेहरु घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणा व्यक्तीला अध्यक्षपदी आणण्याचे म्हणत आहेत. पण, जर्जरावस्था झालेल्या काँग्रेसमध्ये तसे नेतृत्व शिल्लक तरी आहे का? कारण, गांधी घराण्यातील व्यक्तीला स्पर्धा नको म्हणून संबंधितांचे पंख छाटण्याचे काम आधीच केलेले आहे.


दरम्यान, काँग्रेसअंतर्गत या घडामोडी पाहता पक्षात चार गट पडल्याचे दिसते, पण ते तसे नसून त्यात केवळ दोनच गट आहेत. एक म्हणजे गांधी-नेहरु परिवाराचे नाव घेऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवणार्‍या लाचारांचा आणि दुसरा म्हणजे गांधी-नेहरु परिवारापायी सगळेच संपले तर आपले कसे होईल, या भयाण चिंतेने ग्रासलेल्यांचा. राज्यसभेच्या सदस्यपदाची भिक्षा मिळवून काँग्रेसवासी झालेल्या महाराष्ट्रासह देशभरातील काही विचारवंतांचा पहिल्या गटात समावेश होतो, तर मोदींच्या झंझावातातही आपले फुटके-तुटके जहाज सावरत असलेल्या नेत्यांचा दुसर्‍या गटात आणि त्यांनी या अध्यक्षपदावरुन गोंधळ घातल्याचे दिसते. यावरुनच काँग्रेसमधील खरा संघर्ष हा गांधी परिवारातील नसून या दोन गटांतला असल्याचे स्पष्ट होते. आता हा संघर्ष किती दिवस चालेल आणि या दोन गटांपैकी कोण पक्षाच्या नावाखाली स्वहित साधण्यात यशस्वी होतो, हे येत्या काही दिवसांत कळेलच.


 
काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलावरुन वादळ उठलेले असताना राहुल गांधींनी पत्र पाठवणार्‍या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत त्यांच्या निष्ठेवरच सवाल (व नंतर इन्कार) केला. इथेच पक्षाचा विचार करुन का होईना, गांधी-नेहरु घराण्याविरोधात कोणी शब्दही काढला तरी त्यांना कस्पटासमान लेखण्याची राहुल गांधींची वृत्ती दिसून येते. राहुल गांधींच्या आरोपांनतर गुलाम नबी आझाद यांनी आरोप सिद्ध झाल्यास पदाचा राजीनामा देईल, असे म्हटले. कपिल सिब्बल यांनी, “मी राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसचा बचाव केला. भाजप सरकार पाडण्यासाठी मणिपूरमध्ये काँग्रेसचा बचाव केला. गेल्या ३० वर्षांत कधीही कोणत्याही मुद्द्यावर भाजपच्या बाजूने विधान केले नाही. तरी आम्ही भाजपशी हातमिळवणी केलेले?” अशा शब्दांत आपली उद्विग्नता प्रकट केली. नंतर मात्र, राहुल गांधींनी फोन केल्याने सिब्बल यांना ते ट्विट डिलीट करावे लागले.


 
अर्थात, घराणेशाहीची पालखी वाहणार्‍या नेत्यांचे असेच असते. त्यांना आपला राजपुत्र नकटा असला तरी तो कसा राजबिंडा आहे, हेच सांगावे लागते व तो जे सांगेल त्यानुसार वर्तनही करावे लागते. पण, असे सांगणार्‍या भाटांनी यापुढे तरी आपले भवितव्य पाहायला हवे. कारण, देशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, निधर्मी जनता दल वगैरे घराण्याच्या दावणीला बांधलेल्या पक्षांची काय आणि कशी दुरवस्था झाली, हे सगळेच जाणतात. आज काँग्रेसमध्येही तोच कित्ता गिरवला जात असून गांधी घराण्याला केंद्रस्थानी ठेवूनच सर्व घडामोडी होताना दिसतात व त्यामुळे काँग्रेस पक्ष मात्र गलितगात्र झाल्याचे समजते. तथापि, ही फक्त सुरुवात आहे, हा काँग्रेसचा वर्तमान नसून एका घराण्याचे तळवे चाटणार्‍या पक्षाचे काय होते, हे दाखवणारा फक्त ट्रेलर आहे. कारण, घराण्याच्या पुण्याईवर विसंबल्याने काय होते, हे दाखवणारा संपूर्ण पिक्चर तर अजून बाकी आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@