नियम आहेत ‘साक्षी’ला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2020
Total Views |


Sakshi Malik_1  

 

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणार्‍या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी निवड न झाल्याच्या नाराजीतून काही खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने क्रीडाविश्वातील वातावरण तप्त होण्यास सुरुवात झाली आहे. ‘अर्जुन पुरस्कारा’च्या यादीत आपल्या नावाचा समावेश न करण्यात आल्याने २०१६ची रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने तीव्र शब्दांत समाजमाध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करत साक्षी मलिकने हा मुद्दा माध्यमांमध्ये चर्चेत आणला. माध्यमांमध्ये हा मुद्दा चर्चेत आल्याने यावरून अनेकांकडून मतमतांतरे व्यक्त करण्यात आली. मात्र, क्रीडा पुरस्कारासाठी निवड न झाल्याने थेट पंतप्रधानांना समाजमाध्यमांतून सवाल करणे हे कितपत योग्य आहे, हा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणार्‍या ‘राजीव गांधी खेलरत्न’ आणि ‘अर्जुन पुरस्कारा’साठी खेळाडूंची निवड करण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने काही नियम बनविले आहेत. या नियमावलींच्या आधारावरच पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड करण्यात येते. हे नियम विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बनविलेले नाहीत. आधीपासूनच ही नियमावली तयार करण्यात आली असून याच आधारावर वर्षानुवर्षे खेळाडूंची पुरस्कारांसाठी निवड करण्यात येत आहे. यंदाही क्रीडा मंत्रालयाच्या समितीने याच आधारावर खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली. मात्र, ‘अर्जुन पुरस्कारा’साठी निवड न झाल्याच्या नाराजीतून साक्षी मलिकने थेट पंतप्रधानांना समाजमाध्यमावरून सवाल केला. “मी असे कोणते पदक जिंकून आणू की जेणेकरून मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल?” असा सवाल तिने पंतप्रधानांसह क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना केला. थेट पंतप्रधानांना सवाल केल्यामुळे काही माध्यमांनीही हा मुद्दा लावून धरत हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविण्यास सुरुवात केली आणि यावरून वातावरण तप्त झाले. साक्षीने सवाल उपस्थित जरूर केला, मात्र नियमांबाबत एक अवाक्षरही काढले नाही. पुरस्कारांसाठी निवड होण्यासाठी काही नियम देखील असतात, याची देखील तिला आठवण करून देण्याची वेळ आल्याचे क्रीडा समीक्षकांचे म्हणणे आहे.
 

शहाणपण देगा देवा...
 

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा ‘राजीव गांधी खेलरत्न’ आणि ‘अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड न झाल्याच्या नाराजीतून २०१६ सालची रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने केंद्र सरकारविरोधात आपली नाराजी प्रगट केली. केंद्र सरकारच्या विरोधात खेळाडूंचा नाराजीचा सूर असल्याचे भासवत काही माध्यमांनी याचा बाऊ करण्यास सुरुवात केली. पुरस्कारासाठी निवड न झाल्याची नाराजी साक्षीने उघडपणे बोलून दाखविली असली तरी २०१७ सालची ‘वेटलिफ्टिंग’मधील विश्वविजेती मीराबाई चानू हिने मात्र या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात अद्यापपर्यंत तरी कोणतेही भाष्य केलेले नाही. साक्षीप्रमाणेच मीराबाई चानू हिचीदेखील अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. साक्षीने या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आगपाखड केली असली तरी, मीराबाई चानूने मात्र या मुद्द्यावरून अद्याप मौन बाळगले आहे. याबाबत क्रीडा समीक्षकांनाही थोडे आश्चर्य वाटते. पुरस्कारासाठी निवड न झाल्याने दोन्ही खेळाडूंनी खरे तर याबाबत भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र, एकच खेळाडू याबाबत उघडपणे केंद्र सरकारविरोधात थेट नाराजी व्यक्त करत आहे. दुसरी खेळाडू मात्र मौन बाळगून आहे, यामागे नक्कीच कारण असावे, असा अंदाज क्रीडा समीक्षकांचा आहे. काही जाणकारांच्या मते, हे पुरस्कार जाहीर करतानाच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या समितीने या दोघींना हा पुरस्कार न देण्यामागचे कारण स्पष्ट केल्याने मीराबाई चानूने याविरोधात थेट उघडपणे भाष्य करणे टाळल्याचे सांगण्यात येते. क्रीडा क्षेत्रातील देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून गणला जाणारा ‘खेलरत्न पुरस्कार’ या दोघींना याआधीच मिळाला आहे. त्यामुळे हा पुरस्कार देता येणार नसल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे कदाचित याबाबतची नियमावली आणि क्रीडा मंत्रालयाचे स्पष्टीकरण लक्षात घेऊन मीराबाई यांनी साक्षीप्रमाणे भूमिका घेणे टाळले असावे. क्रीडा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिल्यानंतर एका खेळाडूला शहाणपण सुचते, मात्र दुसर्‍याला नाही, असाच मतप्रवाह यानंतर समीक्षकांचा क्रीडा क्षेत्रात आहे. त्यामुळे याविरोधात थेट भूमिका घेत पंतप्रधानांना सवाल विचारणे साक्षीचे हे वागणे कितपत योग्य, याचाही विचार होणे गरजेचे आहे.

 

- रामचंद्र नाईक

 
@@AUTHORINFO_V1@@