अण्णा भाऊ साठेंच्या विचारांसाठी कार्य करत राहणार...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2020   
Total Views |


Dr. Pallavi Saathe-Patole


अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील चरित्रनायिकेप्रमाणे समाजकार्य, साहित्यसेवा करणार्‍या डॉ. पल्लवी साठे-पाटोळे. त्यांच्या जीवनाचा घेतलेला संक्षिप्त मागोवा...


‘अण्णा भाऊ साठे सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल संस्था’ -अध्यक्ष, ‘जायंट्स ग्रुप सातारा’- उपाध्यक्ष, ‘रेशीमगाठी’ (वधू-वरसूचक संस्था), संस्थापक, पिंकॅथॉन मॅरेथॉन स्पर्धेच्या ‘सातारा शहर अ‍ॅम्बॅसीडर’, तसेच सातारा शहरातील कित्येक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या जबाबदार्‍या, साहित्यिक चळवळी, उपक्रमांचे दायित्व, त्याचबरोबर स्वत:चा धन्वंतरी दवाखाना, जिथे गरजूंना आरोग्यसेवा प्रदान करण्यात येते. पेशाने डॉक्टर असल्याने शहरातील सेवावस्तीमध्ये आरोग्य शिबिरे घेणे, महिलांच्या आजारासंदर्भात जागृती करणे, आरोग्याच्या सशक्तीकरणासोबतच महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कार्य करणार्‍या डॉ. पल्लवी साठे-पाटोळे.


 
महिला सशक्तीकरणाचे एक वास्तव स्वरूप, नव्हे अण्णा भाऊ साठेंनी त्यांच्या साहित्यात वर्णन केलेली संघर्षशील आणि परिस्थितीवर विजय मिळवणारी संवेदनशील, समाजशील नायिकाच जणू डॉ. पल्लवींच्या रूपाने समाजाला पाहायला मिळत आहेत. विविध आयामांतून समाजासाठी काम करताना डॉ. पल्लवी यांनी आपली वैचारिक बैठक कायमच पक्की ठेवली. डॉ. पल्लवी यांच्या आयुष्यात काही प्रसंग असे आले की, ज्यामुळे एखादी व्यक्ती खचून गेली असती किंवा कायमच मनात तिढा घेऊन विद्वेषक मत्सर पसरवत बसली असती. पण, अण्णा भाऊंच्या समाजशीलतेचा वारसा घेतलेल्या पल्लवी यांनी त्या प्रसंगांवर मोठ्या मनाने मात केली. त्यातील एका प्रसंगाचा उल्लेख करायलाच हवा. प्रसंग काही जुना नाही. साधारणत: २०१०-२०११चा. पल्लवी यांनी सातार्‍यामधल्या आपल्या घराजवळील एका गावामध्ये दवाखाना थाटला. दवाखाना म्हणजे, एका व्यक्तीच्या घराची एक खोलीच. त्या खोलीचे रूपांतर दवाखान्यात केले होते. सदर दवाखान्याला लागूनच गोरगरिबांची वस्ती. विविध समाजातील लोक दवाखान्यात येऊ लागले. ते घरमालकांना रूचले नाही. तोपर्यंत या घरमालकाला माहिती नव्हते की, डॉ. पल्लवी या स्वत: मातंग समाजातील आहेत हे. पण, काही दिवसांनी त्यांनी पल्लवी यांची जात माहिती झाली आणि त्यांनी पल्लवी यांना सांगितले की, “तुम्हाला जागा खाली करावी लागेल.” यावर पल्लवी यांनी कारण विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. या प्रसंगाने गावात खूप तणाव निर्माण झाला. जातीय विषमतेचा अनुभव पल्लवी यांच्यासाठी दु:खदायी होता. पण, सुशिक्षित आणि मोठ्या मनाच्या पल्लवी यांनी या प्रसंगात सामोपचाराची भूमिका घेतली. त्या घरमालकाला आपल्या वैयक्तिक पातळीवर समजूत घातली. मात्र, त्याचवेळी कोणताही जातीय विद्वेष पसरणार नाही किंवा या घटनेचा कुणीही फायदा घेणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. या प्रसंगाबद्दल बोलताना पल्लवी म्हणतात, “मला त्यावेळी फार वाईट वाटले, पण नंतर विचार केला की, संवाद आणि संपर्काने अनेक अप्रिय प्रसंगांमध्ये आपण समन्वय साधू शकतो. ‘माकडीचा माळ’ लिहिणारे आणि अनुभवणारे अण्णा भाऊ साठे यांची मी वंशज आहे. त्यामुळे समाजातील विविधता आणि ताणतणाव याचा परिचय आहे. मात्र त्यावर कशी मात करावी हेसुद्धा मला ठाऊक आहे.


 
डॉ. पल्लवींची ही भूमिका आज गरजेची आहे. कोणत्याही समाज तोडणार्‍या घटनेला डॉ. पल्लवींची मानसिकता हे उत्तम उत्तर आहे. उच्चशिक्षित आणि बुद्धिमान आणि तितक्याच तर्कशुद्ध विचार करणार्‍या पल्लवी समाज जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. अण्णा भाऊ साठेंचे प्रेरणादायी विचार समाजात रूजावेत म्हणून त्या अनेक उपक्रम राबवतात. शहर ते ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये अण्णा भाऊ साठेंचे साहित्य, त्यांचे कार्य विस्ताराने पोहोचावे म्हणून त्या संवाद-संपर्क साधतात. त्यांच्या प्रयत्नांनी आज कित्येक ठिकाणी अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव सुरू झाला. या जयंती उत्सवाचे स्वरूपही वैचारिक आणि समाजाला धरून असलेले परिवर्तनशील असते.


 
मूळच्या साताराच्या असणार्‍या जयसिंग साठे आणि विजया साठे या उच्चशिक्षित दाम्पत्याच्या कन्या पल्लवी. जयसिंग आणि विजया दोघेही शिक्षक. रयत शिक्षण संस्थेमध्ये ते दोघे कार्यरत. कामानिमित्त दोघांचीही नेहमी बदली व्हायची. त्यामुळे पल्लवी आजी कलावती आणि आजोबा भगवान भिंगारदिवे यांच्याकडे राहायच्या. आजी-आजोबाही सुशिक्षित, आजोबा तर ‘इंटक’ या कामगार संघटनेचे काम करायचे. ते नेतेच होते. भिंगारदिवेंना गावात मान. पण, त्यांचे घर मात्र तत्कालीन मातंग वस्तीमध्येच. आजी-आजोबांच्या घरी सुखासीन जगणे असले तरी आजूबाजूच्या वस्तीचे प्रश्न पल्लवी यांनी लहानपणापासून पाहिलेले. ते प्रश्न पल्लवी यांच्या मनात रूतलेले. मात्र, असे जरी असले तरी लहानपणीच त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवलेले. कारण, लहाणपणी आजी ज्या डॉक्टरांकडे न्यायची, ते डॉक्टर सेवाभावी. त्यांना पाहून पल्लवी यांनी ठरवले की, आपणही डॉक्टर व्हायचे. ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले. पुढे इंजिनिअर असलेल्या अमोल पाटोळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. समविचारी जीवनसाथीदार मिळाल्याने डॉ. पल्लवी यांच्या कर्तृत्वाला आकाशच मिळाले. आज त्या समाजासाठी आरोग्यसेवा, साहित्यसेवा करत आहेत. डॉ. पल्लवी यांसारख्या सुकन्या केवळ एका समाजाच्या नाहीत, तर देशाच्या सुकन्या आहेत. त्या म्हणतात, “अण्णा भाऊ साठेंच्या विचारांसाठी कार्य करत राहणार...”

 
@@AUTHORINFO_V1@@