पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात 'वर्तुळ' माहितीपटाची निवड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2020
Total Views |
Vartul_1  H x W


गावाची भीषण वास्तवता मांडणारा माहितीपट; आशिष निनगुरकर यांचे प्रभावी दिग्दर्शन


मुंबई : पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने आयोजित 'पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव'मध्ये येथील हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वर्तुळ' या माहितीपटाची विशेष निवड झाली आहे.


कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा चित्रपट महोत्सव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यंदा या चित्रपट महोत्सवांमध्ये संपूर्ण जगातून आलेल्या लघुपट व माहितीपटांमधून येथील आशिष निनगुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वर्तुळ' या सामाजिक माहितीपटाची विशेष नोंद घेण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवामध्ये 'वर्तुळ' माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार असून त्यावर चर्चासत्र देखील पार पडणार आहे.


काव्या ड्रीम मुव्हीज व सौ. किरण निनगुरकर यांनी 'वर्तुळ' या माहितीपटाची निर्मिती केली आहे. कमीत कमी वेळेत मोठा आशय मांडणाऱ्या या माहितीपटाने आंतराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. अन्न,वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.परंतु आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात माणूस संपूर्ण अडकून गेला आहे. पैशांच्या मागे लागतांना खरं सुख म्हणजे नेमके काय असते? याचा त्याला विसर पडत चालला आहे. श्रीमंत माणसे अधिक श्रीमंत होत आहेत,तर गरीब हे आणखी गरिबीला झुकले आहेत. त्यात गावाकडच्या लोकांची भीषण अवस्था आहे. शहरात मुबलक पाणी,वीज आणि इतर व्यवस्था आहेत याउलट गावाकडे कुठल्याही सुख सुविधा नाहीत.चालायला नीटसे रस्ते देखील नाहीत. पावसाळ्यात गावी राहणाऱ्या लोकांची वाट ही एकदम बिकट होऊन जाते.अशाच एका भीषण गावच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा या माहितीपटात मांडला आहे. त्या गावातील लोकांनी व्यक्त केलेली मनोगते ही भयानक आणि तितकीच वास्तव आहेत. त्यामुळे त्यांचे 'वर्तुळ' कधी पूर्ण होईल अशा आशयाचा हा माहितीपट आहे.


या माहितीपटातून लोकांचे प्रश्न, सामाजिक समस्या, जाणिवा, कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यासारख्या अनेक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.डोळ्यांत अंजन घालणाऱ्या या सामाजिक माहितीपटाची संकल्पना,लेखन व दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांचे आहे. सिद्देश दळवी यांनी "वर्तुळ" या माहितीपटाची छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून अभिषेक लगस यांनी संकलन व पोस्टर डिझाईन केले आहे. या माहितीपटासाठी काव्या ड्रीम मुव्हीजची संपूर्ण टीम तसेच प्रदीप कडू,अशोक कुंदप,आशा कुंदप, प्रतिश सोनवणे,चंद्रकांत कुटे,सिद्धेश दळवी, स्वप्नील निंबाळकर व सुनील जाधव यांनी अनमोल सहकार्य केले आहे.'वर्तुळ' या माहितीपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे.


आशिष निनगुरकर यांनी याआधीही अनेक लघुपट व माहितीपट तयार केले असून त्याची प्रशंसा मान्यवरांनी केली आहे. सामाजिक विषयांवरील त्यांचे लघुपट व माहितीपट अनेक महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. निनगुरकर हे कवी व लेखक असून ते अभिनयही करतात. आत्तापर्यत त्यांनी दोन चित्रपटांचे लेखन केले असून काही चित्रपट व मालिकांमधून अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसेच त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी घरी राहून केलेल्या लघुपटांची परदेशात नोंद घेण्यात आली होती.




@@AUTHORINFO_V1@@