निशिकांत कामत : दृश्य माध्यमाची भाषा आणि ताकद ओळखलेला दिग्दर्शक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2020
Total Views |

NISHIKANT KAMAT_1 &n


निशिकांतला आता चित्रपट माध्यम खुणावू लागले आणि त्याने आजूबाजूच्या परिस्थितीवर कठोर भाष्य करणारा ‘डोंबिवली फास्ट’ लिहिला. पण, या चित्रपटासाठी त्याला तब्बल दीड वर्षे निर्माताच मिळत नव्हता आणि जेव्हा मिळाला, तेव्हा चित्रपटसृष्टीला दृश्य माध्यमाची भाषा आणि ताकद ओळखलेला दिग्दर्शक सापडला.



चित्रपट माध्यमातील चांगला दिग्दर्शक कसा ओळखला जातो, तर ज्याला पटकथा आणि संकलन या दोन गोष्टींची उत्तम जाण आहे. निशिकांत कामत अगदी तसाच होता. आपल्या करिअरची एक पायरी चढत चढत, कधी थांबत तो आपले कर्तृत्व घडवत/सिद्ध करत पुढे जात होता आणि तो आणखी मोठी झेप घेईल, असा त्याच्याबद्दल विश्वास वाढत असतानाच, त्याचे दुर्दैवाने वयाच्या पन्नासाव्या वर्षी निधन झाले. त्याला चित्रपट माध्यम व व्यवसाय यांची कशा पद्धतीने ओळख होती, हे त्याने दिग्दर्शिलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ (२००४) या चित्रपटात लक्षात येते. त्याच्या कर्तृत्वाची ओळख करून द्यायला हे एकच उदाहरण पुरेसे आहे. संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (२००३) चित्रपटाच्या लोकमान्यता आणि राजमान्यता अशा यशानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील वातावरण एकदमच बदलून गेले होते आणि काही वेगळ्या प्रवाहातील चित्रपट निर्मितीचा विश्वास जागृत झाला. असाच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘भाविका चित्र’ या बॅनरखाली निर्माण झालेला, रमाकांत गायकवाडनिर्मित आणि निशिकांत कामत लिखित व दिग्दर्शित ‘डोंबिवली फास्ट.’ आजूबाजूच्या बदलत्या गतिमान समाजात मध्यमवर्गीय मराठी माणसाची कोंडी एकदाची फुटते आणि तो संतप्त होतो, अशा मध्यवर्ती कथासूत्रावर आधारित हा चित्रपट खूप गाजला. निशिकांत कामतनेच या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखन, साहाय्यक दिग्दर्शक आणि छोट्या छोट्या भूमिका यानंतर निशिकांत कामतने संजय सूरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात’मध्ये भूमिका साकारत मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि मग ‘डोंबिवली फास्ट’सारखा अगदी वेगळा आणि काळाच्या पुढचा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाचे धारदार संवाद संजय पवार यांचे आहेत, तर प्रभावी पार्श्वसंगीत अनिल मोहिले यांचे आहे. या चित्रपटात एकही गाणे नाही आणि त्याची तशी कुठे गरजही भासली नाही. निशिकांत कामतने या चित्रपटात गाण्याला जागा देण्याचा मोह टाळला. पण, वेगळ्या प्रकारच्या पोस्टरनी या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण केली होती आणि ती कल्पकता होती निशिकांतची!




‘डोंबिवली फास्ट’ची मध्यवर्ती ‘थीम’ साधारण अशी आहे. माधव आपटे (संदीप कुलकर्णी) हा मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शहरातील एक मध्यमवर्गीय आणि प्रामाणिक गृहस्थ. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका बँकेतील आपल्या क्लार्कच्या नोकरीसाठी डोंबिवली ते सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस असा फास्ट ट्रेनने रोजच ये-जा प्रवास करतोय. घरी पत्नी (शिल्पा तुळसकर) आणि दोन मुले आहेत. या छोट्याशा कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वप्न मध्यमवर्गीय आहेत. मध्यमवर्गीय संस्कारांचा पगडा त्यांच्यावर आहे. एकूणच आपटे कुटुंबाचा प्रवास सरळ रेषेत सुरु आहे. माधव आपटे बँकेतील आपले काम बरे, आपण बरे आणि दिवसभरातील आपले काम संपवून ते घरी येत असतात. बरं, त्यांचे सगळेच साधे. म्हणजे साधेच कपडे, साधीच बॅग, दोन खणांचा डबा, एका खणात पोळ्या, तर एका खणात भाजी, त्यातच छोट्या वाटीत दही, मुरंबा अथवा चटणी. लोकल ट्रेनमधील गर्दीत जेमतेम मिळणारी चौथी सीट. ती मिळाली तरी त्यात आनंद मानणारा अथवा गर्दीत धक्के खात खात उभ्याने प्रवास करणारा. अगदी रेल्वे स्टेशन ते नरिमन पॉईंट अशा प्रवासातही कंडक्टरची अरेरावी सहन करणारा.




पण, एके दिवशी आजूबाजूचे भ्रष्ट, सवंग, स्वार्थी, निर्दयी जग माधव आपटेवर असे काही आदळते की, नरिमन पॉईंटच्या रस्त्यावर तो पडला असता त्याला कोणीही उभे राहण्यासाठी हात देत नाही. उलट त्याच्यावर आजूबाजूचे जग फिदीफिदी हसत राहते आणि याच क्षणाला माधव आपटे उठतो. त्याचे ‘फ्रस्ट्रेशन’ बाहेर पडते. त्याच्या हाताला क्रिकेटची बॅट सापडते आणि तो जेथे जेथे शक्य असेल त्यावर ती बॅट चालवून मोडतोड करतो. हा ‘क्लायमॅक्स’ पाहून आपण शहारतो, सुन्न होतो आणि या चित्रपटाचा प्रभाव आपल्यावर बराच काळ कायम राहतो. निशिकांत कामतचे हे सर्वात मोठे यश आहे आणि हा चित्रपट म्हणजे निशिकांत कामतची ओळख ! तो घडला रुईया कॉलेजमध्ये. खरंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि काही काळ त्याने गोव्यातही घालवला. पण, रुईयातील ‘नाट्यवलय’साठी त्याने मंजुळा (यात आदिती सारंगधर होती), भाऊ सांगे अण्णा अशा काही एकांकिका बसवत असतानाच तो तेथीलच हॉटेलमध्ये आपला आवडता चहा सातत्याने पिता पिता ‘फोकस्ड’ होत गेला. त्याला आता चित्रपट माध्यम खुणावू लागले आणि त्याने आजूबाजूच्या परिस्थितीवर कठोर भाष्य करणारा ‘डोंबिवली फास्ट’ लिहिला. पण, या चित्रपटासाठी त्याला तब्बल दीड वर्षे निर्माताच मिळत नव्हता आणि जेव्हा मिळाला, तेव्हा चित्रपटसृष्टीला दृश्य माध्यमाची भाषा आणि ताकद ओळखलेला दिग्दर्शक सापडला. आपल्या प्रत्येक चित्रपटासह निशिकांत अधिकाधिक प्रगल्भ तर होत राहिलाच, पण त्याने विविधताही जपली. याच ‘डोंबिवली फास्ट’चा तामिळ रिमेक ’Evano Oruvan'चे दिग्दर्शन केले. त्यात आर. माधवन नायक आहे.



तो दिग्दर्शकाबरोबरच अभिनेताही असल्याने त्या ‘भूमिके’तूनही तो घडला. संजय सूरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात’चा नायक त्याने साकारला. कालांतराने त्याने ‘चल हवा आने दे’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘भावेश जोशी’, ‘फुगे’, ‘ज्युली २’ या चित्रपटातही भूमिका साकारल्या. पण, ते करताना आपल्यातील दिग्दर्शक बाजूला ठेवून त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा कलाकार म्हणून निशिकांत वावरला. हिंदी चित्रपटसृष्टीत निशिकांतने खरंतर पटकथा लेखन विभागातून काम सुरु केले. ‘ज्युली’ या चित्रपटाचा दिग्दर्शक दीपक शिवदासानी यांनी ती संधी दिली आणि निशिकांतने ‘नवीन काही शिकण्याची संधी’ या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले. यातूनच त्याच्या व्यक्तिमत्वाचा सखोलता आली. अभिनय, पटकथा लेखन, दिग्दर्शन आणि संकलनाची जाण असा तो बहुमुखी झाला आणि त्यामुळेच तो अधिकाधिक आत्मविश्वासाने वाढत गेला. ‘डोंबिवली फास्ट’सारखा विचारमंथन करावयास भाग पाडलेला हाच दिग्दर्शक ‘लय भारी’सारखा अतिशोयोक्तीपूर्ण असा मसालेदार मनोरंजक धमाकेदार चित्रपटही तेवढ्याच ताकदीने देऊ शकला आणि त्यानेच मूळ ‘दृश्यम’ या तामिळ चित्रपटाचा अतिशय प्रभावीपणे हिंदीत रिमेक केला. हिंदीत त्याने ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘मदारी’ असे अ‍ॅक्शनपट देताना आपले दिग्दर्शन कौशल्य, कसब दाखवले. हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एकाचवेळी अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण होत असताना, निशिकांत कामतच्या कर्तृत्वाला खूप सकारात्मक संधी होती आणि खुद्द निशिकांत कामतला मराठी, हिंदी तसेच प्रयोगशील-व्यावसायिक असा भेदभाव अजिबात आवडत नव्हता. त्याला एकच माहीत होतं ते म्हणजे, कोणत्याही चौकटीत अडकायचं नाही, यशापयशात थांबायचं नाही. ‘आपण थांबायचे नाही’ नाही हे त्याचे जीवनसूत्र होते. ते त्याने नकळत जणू अंमलात आणले. रुईयात असताना तो नेहमी म्हणायचा, ‘टेन्शन लेने का नही देने का, आपण बाप आहोत म्हणून स्टेजवर आहोत.... ’ आपल्या करिअरभर तो असाच मोकळाढाकळा वागला आणि शेवटी चटका लावून गेला...

- दिलीप ठाकूर
@@AUTHORINFO_V1@@