अयोध्येत श्रीराम मंदिर बांधकामास प्रारंभ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2020
Total Views |
ram mandir_1  H


३० ते ४० महिन्यात उभे राहणार भव्य मंदिर!

नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे. मंदिराची उभारणी प्राचीन भारतीय मंदिर बांधणी पद्धतीप्रमाणे करण्यात येत असून यामध्ये लोखंडाचा अजिबात वापर केला जाणार नाही. मंदिर ३० ते ४० महिन्यात उभे राहिल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन सोहळा झाला होता. त्यानंतर मंदिर उभारणीच्या कामास वेगाने प्रारंभ झाला आहे. अतिशय भव्य असणाऱ्या या मंदिराची उभारणी करताना विशेष काळजी घेतली जात आहे.


मंदिराचा पाया अतिशय मजबूत असावा यासाठी जन्मभूमीस्थळाच्या मृदा परिक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारची रुरकी येथील केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान (सीबीआरआय) आणि आयआयटी मद्रास येथील तज्ज्ञांसोबत मंदिराचे बांधकाम करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे अभियंते काम करीत आहेत. मृदा परिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाया खणण्याच्या कामास प्रारंभ होणार आहे. मंदिराच्या बांधकामास एकुण ३० ते ४० महिन्यांचा कालावधी लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे.



मंदिराची उभारणी प्राचीन भारतीय मंदिर निर्माण पद्धतीप्रमाणे करण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये सीमेंट – काँक्रीट, लोखंडी सळया यांचा वापर केला जाणार नाही. उभारणीसाठीच्या दगडाच्या शीळांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्ट्यांचा वापर केला जाणार आहे. याच पद्धतीचा वापर करून प्राचीन काळापासून भारतात मंदिरांची उभारणी केली जात आहे. यामुळे भुकंप, चक्रीवादळ, महापूर आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमध्येही मंदिराला धक्का पोहोचत नाही. त्यासाठी ट्रस्टतर्फे देशभरातील भाविकांना ताब्याच्या पट्ट्यांचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पट्ट्यांवर भाविक आपले कुटुंब, आपल्या भागातील मंदिरे अथवा आपल्या गावाचे नाव कोरू शकतात. यामुळे राष्ट्रीय एकात्मताही अनोख्या पद्धतीने साधली जाईल, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.









@@AUTHORINFO_V1@@