‘ड्रीम ११’ मध्येही चीनची हिस्सेदारी?? आयपीएल पुन्हा वादात...

    20-Aug-2020
Total Views |

Dream 11_1  H x
 
नवी दिल्ली : ‘कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (सीएआयटी) पुन्हा एकदा बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मते आयपीएलच्या प्रमुख प्रायोजक कंपनीतही चीनची हिस्सेदारी असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, ‘आयपीएलच्या नव्याने निवडण्यात आलेल्या ड्रीम ११ या मुख्य प्रायोजक कंपनीतही चीनची हिस्सेदारी आहे.’ असे नमूद केले आहे.
 
 
‘ड्रीम ११ कंपनीत टेनसेंट ग्लोबल या चायनिज कंपनीची महत्वाची हिस्सेदारी आहे. या आशयाचे त्यांनी लिहिले आहे. “ड्रीम ११ कंपनीला मुख्य प्रायोजक करणे हे भारतीय लोकांच्या चीनविरुद्ध असलेल्या भावनांकडे दुर्लक्ष करण्यासाठीची एक पळवाट आहे.” असे सीएआयटीने मत व्यक्त केले. सीएआयटी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आघाडीवर आहे.
 
 
ड्रीम ११ने मंगळवारी झालेल्या आयपीएल मुख्य प्रायोजक पदाची बोली जिंकली होती. त्यांनी ही बोली २२२ कोटीला जिंकत चायनिज मोबाईल फोन कंपनी व्हिवोची जागा घेतली. आता ड्रीम ११ ही दोन वर्षे तरी आयपीएलचे प्रायोजक राहणार आहे. सीमेवरील भारत आणि चीनमध्ये घडलेल्या हिंसक झडपेच्या घटनेनंतर व्हिवोची ४४० कोटी प्रती वर्षाचा करार रद्द केला होता.
 
 
भारतातील कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचा आयपीएल ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार आहे. ड्रीम ११ मध्ये गुंतवणूक केलेल्या चायनिज कंपनी टेंनसेंट बाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही हिस्सेदारी १० टक्क्याच्या आत आहे. ड्रीम ११ ही एक भारतीय कंपनी असून ती हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी स्थापन केली आहे.