मालीचे तख्तपालट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2020   
Total Views |
Ibrahim Boubacar _1 
 
 

कधीकाळी फ्रेंचांची वसाहत असलेला आफ्रिकेतील माली हा ९५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेला देश. मात्र, फ्रेंचांपासून स्वतंत्र मिळवल्यानंतरही कायमच अशांत राहिला. त्याला कारण होते, दहशतवाद. धर्माच्या नावाखाली माजवलेली हिंसा. ही हिंसा वरकरणी धर्माच्या बुरख्याआड असली तरी खरे कारण राजसत्ताप्राप्ती हेच होते. आताही माली देशाच्या सैन्यातील एका तुकडीने देशाचे राष्ट्रपती इब्राहिम बाऊबकर कीता आणि पंतप्रधान बाऊबो सिसे यांना शस्त्रास्त्राच्या बळावर जेरबंद केले आहे. त्यांच्यासोबतच काही महत्त्वाच्या मंत्रिगणांना त्यांनी बंधक बनवले आहे. 
 
 
या अनुषंगाने राष्ट्रपती इब्राहिम बाऊबकर कीता यांनी म्हटले आहे की, “माझ्या शासन कार्यकाळात रक्तपात हिंसा व्हावी, असे मला वाटत नाही. आज आपल्याच सैन्यातील काही लोक शस्त्राच्या बळावर माझ्या शासन कारकिर्दीचा अंत करू पाहत असतील तर माझ्याकडे काही पर्याय नाही.” अशाच प्रकारची भूमिका मालीचे पंतप्रधान बाऊबो सिसे यांनीही घेतली आहे. त्यामुळे माली देशाचे सरकार कोसळले आहे.
 
 
 
जगभरात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. संयुक्त राष्ट्राने या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची बिनाशर्त मुक्तता करा, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेची निंदा केली. देशामध्ये पुन्हा कायदा-सुव्यवस्था आणि संविधानात्मक परिस्थिती निर्माण करण्याची संयुक्त राष्ट्राने मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्राने मालीमधील सर्व पक्षांना एकत्रित येऊन शांतीपूर्ण निर्णय घ्यावा, असेही सांगितले. तसे पाहायला गेले तर मालीमध्ये ही परिस्थिती अचानक उद्भवली असावी, असे जागतिक घडामोडींचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांचे अजिबात मत नाही. माली देश नेहमी अंतर्गत कलहामध्ये धुमसतच होता. मुस्लीमबहुल असणार्‍या या देशात इस्लाम धर्माचा झेंडा घेऊनच काहीजण आपापसात हिंसात्मक हाणामार्‍या करतच होते.
 
 
 
‘अन्सार दिन’ नावाचे दहशतवादी संघटन यात अग्रेसर. ‘अन्सार दिन’चा अर्थ मुस्लिमांचे मदतगार. स्वत:ला मुस्लिमांचे मदतगार आहे असे मानणारी ही संघटना या मुस्लीम देशात मुस्लिमांनाच कायम त्रास देत राहिली. कारण, हा देश जरी मुस्लीमबहुल असला तरी देशातील जनता ‘रॅडिकल इस्लाम’नुसार जगत नव्हती. ‘रॅडिकल’ म्हणजे अतिकट्टरपंथीय. तसेच देशातले बहुसंख्य नागरिक मुस्लीम असले तरी ते सुफीवादी. ‘अन्सार दिन’ या दहशतवादी संघटनेला हे अजिबात मंजूर नाही. कारण, ‘अन्सार दिन’ ही संघटना ‘अल कायदा’शी संबंधित आहे. ‘अल कायदा’ शरिया कायदा मानते. इस्लाम असलेल्या आणि नसलेल्या देशांमध्येही शरिया कायदा प्रस्थापित व्हावा, असे ‘अल कायदा’ संघटनेचे म्हणणे आणि मानणे. ‘शरिया’ लागू व्हावा यासाठी इस्लामचे राज्य व्हावे, असेही या संघटनेचे म्हणणे. अर्थात, जी राष्ट्रे मुस्लीमबहुसंख्य नाहीत, तिथे ‘शरिया’ कायदा लागू होणारच नाही. मात्र, ९५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असूनही मालीसारख्या देशात शरिया कायद्याचे राज्य नाही. त्यामुळे ‘अन्सार दिन’सारख्या संघटनांच्याद्वारे मालीमध्ये शरिया कायदा लागू व्हावा, यासाठी दहशतवाद पोसला गेला.
 
 
 
२०१२ साली मालीमध्ये त्यासाठी मोठी हिंसाही झाली होती. ‘अन्सार दिन’ संंघटनेने ‘शरिया’ कायदा लागू करा, असे म्हणत माली देशाचे सरकार शस्त्रहिंसेच्या बळाने पाडलेही होते. त्यानंतर पुन्हा संविधानात्मक पद्धतीने निवडणुका झाल्या आणि मालीमध्ये जनजीवन सुरळीत झाले. मात्र, नुकतेच पुन्हा जनरल चीक फंटामादी डेमबेलेच्या नेतृत्वामध्ये इथे सैन्याने विद्रोह करत राष्ट्रपती, पंतप्रधानाना बंदी केले. या विद्रोही सैनिकांसारखे प्रवक्ते कर्नल इस्माइल वेगने म्हटले आहे की, “आम्हाला सत्तेची भूक नाही. देशाला अराजकतेपासून वाचवण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे.” या सैन्य दलाने मालीतील इतर राजकीय पक्षांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रणही दिले आहे. मात्र, कुणीही त्यांचे आमंत्रण स्वीकारलेले नाही. दहशतवादाच्या विळख्यात अडकलेल्या या देशामध्ये गरिबी आणि त्यानुसार येणारे सर्वच भोग जनता भोगत आहे. कोणतीही योजना सुरू करण्याचा विचार केला की, इथे पहिला प्रश्न केला जातो की, हे इस्लामला धरून आहे का? या पार्श्वभूमीवर मालीचे तख्तपालट इस्लामला धरून आहे का? तर यावर मालीमधल्या बहुसंख्यकांनी विद्रोही स्वरूपात केलेल्या तख्तपालटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मालीचे तख्तपालट इतर मुस्लीम देशांसाठी धोक्याची घंटाच आहे.


@@AUTHORINFO_V1@@