युवा मंत्र्याला वाचवण्यासाठी दबाव?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2020
Total Views |

agralekh_1  H x



सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाशी मुंबईतल्या ‘नाईट लाईफ’ची तरफदारी करणार्‍या, रात्रीच्या पार्ट्यांत रमणार्‍या युवा मंत्र्याच्या सहभागाची शक्यता बळावते आणि सदर युवा मंत्र्याला वाचवण्यासाठीच राज्य सरकार व गृहमंत्री मुंबई पोलिसांना तपासाची निराळी दिशा दाखवत असून बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट होते.


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू-आत्महत्या-हत्येबद्दल गेल्या दीड महिन्यांपासून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आतापर्यंत सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत होता, पण दि. २५जुलै रोजी त्याचे वडील के. के. सिंह यांनी बिहारची राजधानी पटना येथे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. सुशांत सिंह राजपूतची तथाकथित प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करताना के. के. सिंह यांनी १५ कोटींच्या अफरातफरीचा आरोप केला. त्यांच्या तक्रारींनंतर बिहार पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल किंवा एफआयआर दाखल केला व दि. २७ जुलै रोजी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठन केले. एसआयटीची स्थापना झाली व हे पथक पुढील तपासासाठी मुंबईत दाखलही झाले, पण गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलिसांनी त्यांना कसलेही सहकार्य केलेले नाही, असा दावा बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी रविवारी केला. बिहार पोलीस मुंबईत येऊन चार दिवस झाले तरी मुंबई पोलिसांनी अजूनही त्यांच्याकडे सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवाल, त्याची डायरी व घटनास्थळावरुन जप्त केलेल्या साहित्याची यादी यापैकी काहीही सोपवलेले नाही.



वस्तुतः एका राज्याचे पोलीस दुसर्‍या राज्यात एखाद्या प्रकरणाच्या चौकशीसाठी जातात, तेव्हा संबंधित राज्य सरकार व पोलीस अधिकारी सहकार्य करतात किंवा त्यांनी सहकार्य करावे, असा संकेत आहे. पण दुर्दैवाने मुंबई पोलीस बिहार पोलिसांना कसलेही सहकार्य करत नसून त्यांच्या तपासकामात अडथळाच उभा करत आहेत. एकूणच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलीस व मुंबई पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसत असून हे संघराज्यीय व्यवस्थेविरोधात आहे. अर्थात, मुंबई पोलिसांचा लौकिक पाहता, ते स्वतःहून बिहार पोलिसांच्या तपास आडकाठी आणत नसून त्यांच्यावर कुठूनतरी दबाव आल्याचे स्पष्ट होते आणि हा दबाव राज्य सरकारमधीलच व मुंबईत राहणार्‍याच एका युवा मंत्र्याकडून आणल्याची चर्चा-आरोपदेखील सुरु आहेत. सदर युवा मंत्र्याला वाचवण्यासाठीच राज्य सरकार व गृहमंत्री मुंबई पोलिसांना तपासाची निराळी दिशा दाखवत असून बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समजते.



दरम्यान, बिहारमध्ये आपल्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवरुन कारवाई करु नये म्हणून रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून तिथे तिचे वकील सतीश मानशिंदे हे आहेत, तर बिहार पोलिसांची बाजू प्रसिद्ध विधिज्ञ मुकूल रोहतगी मांडतील. तथापि, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यावरुन अंमलबजावणी संचालनालय किंवा ईडीने आपले काम सुरु केलेले आहे. त्यानुसार सुशांत सिंहच्या बँक खात्याशी व पैशाशी संबंधित व्यवहारांची चौकशी ईडीद्वारे होत आहे. त्याआधी ईडीने हे प्रकरण हाती घेण्यापूर्वी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्याला कारण मुंबई पोलिसांचा विचित्र व दबावाखाली सुरु असलेला कारभार. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनी अजूनही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात प्राथमिक चौकशी अहवाल किंवा एफआयआर दाखल केलेला नाही. तर त्यांनी केवळ अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावरुनच हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, असा सूर अनेकांनी लावला होता. पण सध्या तरी त्याबाबतची एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.



असे असले तरी बिहार पोलीस किंवा राज्य सरकार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तसे सूतोवाच दिले असून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र सीबीआय चौकशी नाहीच, अशी भूमिका घेतलेली आहे. पण यातला राजकारणाचा भाग म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभूत पुत्र पार्थ पवार यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी तसे पत्रच थेट अनिल देशमुख यांच्या हाती सोपवले. अर्थात, पार्थ पवारांना हे पाऊल उचलण्यासाठी मार्ग दाखवणारे कोणीतरी असेलच, फक्त ते कोण आणि कशासाठी करत आहे, हे येणार्‍या काळातच समोर येऊ शकते. पण यावरुन सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाशी मुंबईतल्या ‘नाईट लाईफ’ची तरफदारी करणार्‍या, रात्रीच्या पार्ट्यांत रमणार्‍या युवा मंत्र्याच्या सहभागाची शक्यता बळावते आणि त्या व्यक्तीला शह देण्यासाठीच तर पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही ना, असा मुद्दाही उपस्थित होतो.



जवळपास दीड महिन्यांपूर्वी झालेल्या सुशांत सिंहच्या मृत्यू-आत्महत्या-हत्या प्रकरणानंतर सुरुवातीला नेपोडटिझ्म हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. दरम्यानच्या काळात बॉलिवूड माफिया व अंडरवर्ल्ड किंवा सीमेपलीकडील व्यक्तींची नावेही घेतली गेली. कंगना राणावत(रणौत) या अभिनेत्रीने या प्रकरणात हिरिरीने आपले म्हणणे मांडले. नंतर रिया चक्रवर्तीने मौन सोडले व आता तर तिच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. पण याच कालावधीत दुसर्‍या बाजूला या सगळ्या प्रकरणातला राजकीय आयाम दुर्लक्षित राहिला होता. तो आता हळूहळू पुढे येत असल्याचे व याचे लागेबांधे एका मंत्र्यापर्यंत पोहोचत असल्याचेच सध्यातरी दिसते. बिहार पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतल्याने व बिहार सरकारची हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची तयारी असल्याने यासंबंधित घडामोडी व प्रसंग आणखी उलगडत जाणार आहेतच. पण सध्या तरी मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांची जी अडवणूक केली जात आहे, ती अशोभनीय अशीच म्हणावी लागेल. हा प्रकार मंत्रिमंडळातील एका तरुण मंत्र्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या दबावाखाली होत असून यामुळे मुंबई पोलिसांचीच नाचक्की होत आहे. पण हा प्रकार मुंबई पोलिसांच्या व महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेचे राज्य अशा गौरवाला कलंकित करणारे ठरते. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी राजकीय दडपण झुगारण्याचे धाडस दाखवायला हवे. तरच त्यांच्यावर होणारे आरोप थांबतील अन्यथा सत्ताधार्‍यांबरोबर तेही बदनामच होतील.

@@AUTHORINFO_V1@@